नामांतर आंदोलनातले वयाच्या विशीच्या आतले तुरूंगातले दिवस: प्रा. हरी नरके

Update: 2020-07-16 12:30 GMT

१९७८ साली मी इयत्ता नववीत शिकत होतो. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय पुलोद शासनाने घेतला. या निर्णयाला विरोध करण्यासाठी मराठवाड्यात भीषण जाळपोळ आणि हिंसाचार केला गेला. त्यापुर्वी ती मागणी फक्त मराठवाड्यापुरती मर्यादित होती. पण सवर्णांनी बौद्ध आणि अनुसुचित जातींची घरंदारं जाळण्यामुळे हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचा/देशाचा बनला. मी त्यानंतर प्रत्येक नामांतरवादी मोर्च्यांमध्ये सहभागी होऊ लागलो. लॉन्ग मार्च मध्येही मी सामील होतो. तेव्हापासून माझी नामांतर आंदोलनाशी पक्की नाळ जुळली.

त्यापुर्वी महाराष्ट्रात शिक्षकांचा ५४ दिवसांचा राज्यव्यापी संप झाला होता. तेव्हा मी "पुणे दर्शन" हा २०० पृष्ठांचा प्रबंध लिहित होतो. पुढे १९८० साली गुजरातमध्ये राखीव जागा विरोधी हिंसाचार झाला. त्यावेळी पुण्यातल्या आमच्या "दर्पण ग्रुपतर्फे" आम्ही राखीव जागांच्या बाजूने समाजप्रबोधनासाठी पुणे शहराच्या चौकाचौकात पोस्टर प्रदर्शनं आयोजित केली होती. मंदार, सचिन, श्रुती, संतोष, सुनंदन, वर्षा, वंदना, शैलजा, नितीन, पट्या असे आम्ही दर्पणचं काम करायचो. मंदार आमचा नेता होता. आम्ही त्यावेळी पुणे शहरातील नामवंत शाळांमध्ये चालणारे गैरप्रकार यावर अभिरूप न्यायालय नावाचा नाट्यप्रयोग सादर केला होता.

आम्ही सर्वजण पुण्यातल्या आघाडीच्य शाळांमध्ये शिकलेलो होतो. आम्ही प्रत्येकजण त्या त्या शाळेत प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी असल्याने शाळांच्या व्यवस्थापनांची फार मोठी गोची झाली होती. आम्ही बलुतं, उपरा या दलित आत्मचरित्रांवर/फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांवर वादविवाद/ चर्चा करायचो.

तेव्हा आम्ही दर्पणच्या मुलामुलींनी नव्या पेठेतील मनपाची शाळा दत्तक घेतलेली होती. तिथल्या झोपडपट्टीतील गरीब मुलामुलींसाठी मोफत कोचिंग क्लास चालवायचो. आमच्या सदिच्छा शिक्षण संस्थेतर्फे गरिब, गरजु, मागासवर्गीय मुलामुलींना वह्या, पुस्तके, इतर शालेय साहित्य आम्ही मोफत पुरवायचो. सनातनी पुणेरी मंडळी राखीव जागांना कडवट विरोध करायची. टिपीकल पुणेकर विरोधात असूनही आमच्या "आरक्षणवादी पोस्टर प्रदर्शना" ला चौकाचौकात तुफान गर्दी जमायची.

कडाक्याच्या चर्चा व्हायच्या. १९८० साली मी पुणे आकाशवाणी आणि मुंबई दूरदर्शनवर पहिल्यांदा राखीव जागांच्या बाजूने बोललो. आम्ही अधिक पेटून आरक्षण समर्थनपर पथनाट्याचे कार्यक्रम करायचो. "भटक्याविमुक्तांचा एल्गार येत आहे" हे पुस्तक मी स्वखर्चाने प्रकाशित केलं तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. त्या काळात मी लिहिलेले लेख साधना, घोषणा, स्त्री, किर्लोस्कर, मनोहर व इतर अनेक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. जाणत्यांना ते आजही बघता येतील.

मी तेव्हा हडपसरच्या जवळ साडेसतरा नळीला भटक्यांच्या दांगट वस्ती नामक झोपडपट्टीत राहात होतो. तिथल्या शाळेत न जाणार्‍या मुलांसाठी मी बालवाडी चालवायचो. त्या कामावर प्रसिद्ध लेखक ह.मो.मराठे यांनी तेव्हा किर्लोस्कर मासिकात लिहिलेले होते. इतक्या लहान वयात एव्हढे उद्योग आम्ही कसे करीत असू याचेच आज मला नवल वाटते.

 

१९८२ साली माझं वय जेमतेम १९ वर्षांचं होतं. मुंबईत झालेल्या नामांतर सत्याग्रहात मी पुण्याहून जाऊन सहभागी झालो होतो. ह्या नामांतर सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. माईसाहेब आंबेडकर, एस.एम. जोशी, कॉ. शरद पाटील, डॉ. बाबा आढाव, रामदास आठवले, प्रा. अरूण कांबळे आदींनी केलं होतं.

आम्हाला अटक करून कोर्टात न नेता थेट ठाण्याच्या तुरूंगात नेण्यात आलं. ठाण्याचा तुरूंग तसेच मुंबईतले सगळे तुरूंग भरल्यावर मग काहींना येरवडा, नाशिक, कोल्हापूर, औरंगबाद अशा दुसर्‍या तुरूंगांमध्येही पाठवण्यात आले. आम्हाला मात्र ठाण्यात ठेवण्यात आलं. पहिल्याच दिवशी या सत्याग्रहात १६००० लोकांना अटक झालेली होती. तुरूंगात जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. ( त्यानंतर तुरूंगात भाषणं करण्याची अनेक निमंत्रणे आल्याने माझे बरेच तुरूंग बघून झाले.)

बॅ. बाबासाहेब भोसले तेव्हा मुख्यमंत्री होते. अजिबात जनाधार नसलेले, दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या कृपेने मुख्यमंत्री झालेले. काहीसे विक्षिप्त आणि वकीली बाण्याचे. त्यांनी आम्हाला धडा शिकवण्यासाठी २२ दिवस तुरुंगात ठेवले. हे २२ दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक श्रीमंतीचे दिवस ठरले. त्याच आंदोलनात निखिल वागळे, कपिल पाटील, सुनिल तांबे, नितीन वैद्य, प्रतिमा जोशी, सविता कुडतरकर, ज्योती नारकर हा मुंबईचा ग्रुप माझा दोस्त झाला.

मी या सत्याग्रहातला वयाने सर्वात लहान सत्याग्रही होतो. त्यामुळे मला नेत्यांसाठी राखीव असलेल्या बराकीत ठेवण्यात आले होते. त्या बराकीत मी लेखाच्या सुरूवातीला ज्यांचा उल्लेख केलाय. त्या नेत्यांशिवाय डॉ. कुमार सप्तर्षी, अंकुश भालेकर, बाबूराव बागूल, डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गजानन खातू, दिनकर साक्रीकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. विजय मोरे, बापूराव नाईक आणि आणखी सुमारे ८० नेते होते.

या सर्वांचा २४ तास सहवास. दररोज झोपेचे ४/५ तास सोडले तर उरलेले १९/२० तास सतत चर्चा, वादविवाद, चळवळीची गाणी, नेत्यांची भाषणे, परिसंवाद. अतिशय सकस, समृद्ध, श्रीमंत आयुष्य. होय माझी बरीचशी सामाजिक जडणघडण त्या तुरुंगवासातच झाली. (भाग - १ ला, क्रमश:)

- प्रा. हरी नरके

Similar News