#MahasaAmini : तिच्या केसातलं मुक्तीचं वादळ...

हिजाब परिधान केला नाही म्हणून इराणमध्ये मारहाण झालेल्या महसा अमिनीच्या निधनाने तिथल्या महिलांचा उद्रेक झाला आहे. इराणमधील याच निर्बंधांना विरोध करणारी इराणी पत्रकार मसीह अलीनिजाद हिला देश सोडावा लागला. इराणमधल्या सामाजिक-सांस्कृतिक वास्तवावर प्रखर प्रकाश टाकणाऱ्या तिच्या लढ्याविषयी आणि आत्मचरित्राविषयी माहिती देणारा ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका नंदिनी आत्मसिद्ध यांचा लेख....;

Update: 2022-09-24 11:00 GMT

स्त्रियांवर येणारी विविध तऱ्हेची बंधनं आणि त्यातून सुटण्यासाठी त्यांनी दिलेला लढा, केलेला संघर्ष ही एक न संपणारी प्रक्रिया आहे. स्त्रिया व मुलींना शिकता येणं हा एकेकाळी भारतातला मोठा संघर्षाचा विषय होता. त्यात पुरुषांनी सक्रिय भाग घेतला होता, हेही नोंदवायलाच हवं. पोशाखावरून, नोकरी करण्यावरून, विशिष्ट क्षेत्रात काम करण्यावरून, वस्तू म्हणून स्त्रीकडे बघण्याच्या विरोधात उभं राहण्यावरून...स्त्रिया कायम या ना त्या लढाईत गुंतलेल्याच असतात. हे केवळ इथे घडतं असं नाही. तर जगात इतरत्रही स्त्रिया आपल्या हक्कांसाठी, मनाजोगत्या कामासाठी इ. झगडतच असतात. मध्यंतरी अरब देशांतील स्त्रियांची बऱ्याच वर्षांची ड्रायव्हिंग करण्यावरील बंदी उठवण्याची मागणी मान्य झाली, तेव्हा जगातील स्त्रियांनीच आनंद साजरा केला.

स्त्रियांवर ही सगळी बंधनं येतात ती पुरुषी वर्चस्वाच्या नजरेतून आणि बहुतेकदा त्याला धर्माचं अधिष्ठान दिलेलं असतं. आजकाल तर जगात सगळीकडेच धर्मवादाचा वाढता पगडा जाणवू लागला आहे. स्त्रियांचं जीवन यामुळे बंदिस्त होत असतं. इराणसारखा देश आज वेगळ्याच वादळात सापडला आहे, तो त्याच्या राजकीय धोरणांमुळे. या देशात जन्मलेली आणि आता अमेरिकेत आश्रय घेऊन वास्तव्य करणारी पत्रकार मसीह अलीनिजाद हिचं अलीकडेच प्रसिद्ध झालेलं आत्मचरित्र इराणमधल्या सामाजिक-सांस्कृतिक वास्तवावर प्रखर प्रकाश टाकणारं आहे. त्याचं 'द विंड इन माय हेअर : माय फाइट फॉर फ्रीडम इन मॉडर्न इराण' हे शीर्षकच तिच्या मनातील मोकळ्या श्वासाचा ध्यास स्पष्ट करणारं आहे...

मसीहचं मूळ नाव मासूमे, पण ती ख्रिस्ताचा निर्देश करणारं मसीह हे नावच लावते. आज ४२ वर्षांची असलेली मसीह अलीनिजाद इराणमधल्या एका लहान गावात जन्मली. तिचा जन्म १९७६ सालचा. ती दोन वर्षांची असताना तिथे इस्लामिक क्रांती झाली आणि पहलवी वंशाच्या शहाची राजवट संपुष्टात आली. ती लहानाची मोठी झाली ती, 'मुलगी सात वर्षांची झाली की तिने हिजाब घेतलाच पहिजे', या नियमाच्या वातावरणात. त्याचा त्रास व सक्ती या गोष्टींविरुद्ध ती अमेरिकेत आश्रय घेतल्यानंतर प्रथम उभी राहिली. तिने २००९ सालीच इराण सोडला आणि आधी तिने ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलं. अमेरिकेत राहू लागल्यावर तिने इराणमधील महिलांना हिजाबची सक्ती केली जाण्याविरुद्ध आंदोलन सुरू केलं. आपले मोकळे सोडलेले केस असणारा फोटो तिने २०१४ साली इंटरनेटवर टाकला आणि ऑनलाइन चळवळ सुरू केली. 'माय स्टील्दी फ्रीडम' ही तिची चळवळ इराणी महिलांनी उचलून धरली आणि त्यातीन 'व्हाइट वेनसडे' मोहीम उदयाला आली. इराणमधील महिला बुधवारी पांढरे कपडे घालून आणि हिजाब झुगारून रस्त्यारस्त्यावर उतरल्या आणि हातात हिजाब फडकावू लागल्या. अटकेची वा निंदेची भीती न बाळगता त्या आजही दर बुधवारी याप्रकारे रस्त्यावर उतरत असतात. मसीहच्या पुस्तकाचं शीर्षक या चळवळीच्या संदर्भातून आलं आहे.

आपल्या पूर्वीच्या आणि आताच्या जगण्याबद्दल मसीहने या पुस्तकात मोकळेपणाने लिहिलं आहे. ती एका खेडेगावात वाढली. वडील कोंबड्या, अंडी इ. विकत असत. गरिबी इतकी की, ती लिहिते, एकदा वडिलांनी आणलेली एक पिवळी दांडी सहा तुकडे करून आईने या भावंडांना वाटून दिली. ते होतं केळं. तोवर या कुटुंबात कुणीच खाल्लं नव्हतं. त्याची साल टाकून देण्याऐवजी, मसीहने शाळेत नेऊन दोस्तांना दाखवली होती. लहानपणापासूनच ती धाडसी होती. एका लहान खोलीत हे कुटुंब राहत असे आणि टॉयलेट घराबाहेर होतं. रात्रीच्या वेळी गरज लागली तर तिथपर्यंत जावं लागे, तेव्हा मसीहचा दिवसा धीटपणे वावरणारा भाऊ घाबरत असे. मग मसीहला सोबतीसाठी सोबत येण्याची विनंती तो करे...त्याला एरवी मिळत असलेली मोकळीक बघून मसीहला त्याचा हेवाच वाटात असे. पण अशा प्रकारे तो अंधाराला घाबरतो हे पाहून, तिला धैर्य व ताकद याबद्दलचं वास्तव वेगळंच आहे याचं भान येत गेलं. तसंच तिची आई अंधाराचा सामना कसा करायचा, ते तिला सांगत असे. याबद्दल ती लिहिते, 'ती मला म्हणाली, तू जर भीती बाळगलीस तरच अंधार तुला गिळंकृत करून टाकेल. म्हणूनच तुला आपले डोळे जितके मोठे करता येतील तितके कर आणि अंधाराला सामोरी जा.' मसीह जशी मोठी होत गेली, तशी घरात मिळालेली ही शिकवण तिला ताकद देणारा मंत्रच बनून गेली. ती लिहिते, 'मला समजून आलं की इराणमधली सारी मानवी हक्कांची स्थिती ही माझ्या त्या बालपणातल्या वातावरणासारखी आहे. ती अंधारलेली आहे आणि स्त्रियांनी आपले डोळे जमेल तितके मोठे करून उघडायला हवेत. कारण अंधाराला पळवून लावण्याचा तोच मार्ग आहे.'

स्वतःला पटणारे उपद्व्याप करणाऱ्या मसीहला अनेकदा कठोर शिक्षाही होत असे. बंदी असलेली पुस्तकं इथून तिथे नेणं, सरकारविरोधी पत्रकं छापून वाटणं अशा कारवायांमुळे वयाच्या १८-२९व्या वर्षीच तिला तुरुंगवास झाला. ती सुटली तेव्हा तिच्यात खूप बदल झाला होता. तशात आपल्या प्रियकराशी असलेल्या संबंधांतून तिला दिवस गेले होते. कुटुंबाची व समाजाची मान्यता मिळण्यासाठी तिने लग्न करणं आवश्यक होतं. वडिलांनी लग्नाचा दिवस पक्का केला. तिला लग्न वगैरे करायचं नव्हतं, पण घराण्याच्या इभ्रतीसाठी तुला ते करावं लागेल, असं तिला वडिलांनी निक्षून संगितलं. हा विवाह टिकला मात्र नाही. मसीहच्या नवऱ्याने लवकरच दुसऱ्या एका स्त्रीसाठी पत्नीला सोडून दिलं. घटस्फोटाच्या वेळी तिने नवऱ्याकडून काहीही पैसे नकोत, असं सांगून टाकलं. तिच्या मुलालाही तिच्या ताब्यात देण्यास नवऱ्याने नकार दिला. ही गटना २००० सालातली. मसीह तेव्हा फक्त २४ वर्षांची होती.

आपल्या आयुष्यातील एक एक घटना मसीहने प्रामाणिकपणे आणि थेटपणे लिहिली आहे. तिच्या आयुष्यात असे चढ उतार येतच राहिले. इराणच्या क्रांतीचा आतला चेहरा आणि तिची कार्यपद्धती यावरही तिने प्रकाश टाकला आहे. एका वृत्तपत्रात शिकाऊ पत्रकार म्हणून काम करत, तिने इराणच्या संसदेत बातमीदार म्हणून काम करण्यापर्यंत प्रगती साधली. तिथे एकदा तिने स्पीकरला थेट प्रश्न केला, 'सगळीकडेच क्रांती आपल्या मुलांना गिळंकृत करत असते. तुम्ही नेमके कोण आहात? जे गिळले जातात ते, की जे गिळंकृत करतात ते?' आपल्या मनात जे प्रश्न उभे राहतील, ते विचारताना ती कधीच कचरली नाही. भ्याली नाही. शिरीन इबादी या इराणच्या सामाजिक कार्यकर्त्रीला २००३ साली नोबेल शांतता पुरस्कार मिळाला, त्यानंतर राष्ट्राध्यक्ष खातमी यांना तिने शिरीन इबादीबद्दल सरळ सवाल केला, 'श्री. खातमी, सारं जग शिरीन इबादीचं

अभिनंदन

करतंय. आपल्या एका नागरिकाचं

अभिनंदन

तुम्ही करणार आहात की नाही?' या प्रकाराने अध्यक्ष संतप्त झाले आणि त्यांनी वेळ मारून नेत काहीतरी उत्तर दिलं. पण मसीह अलीनिजाद एक पत्रकार म्हणून चर्चेत आली. तिला सगळेजण ओळखू लागले.

इराणमध्ये सुधारणावादी किंवा कमी सुधारणावादी सरकार आलं, की स्त्रियांच्या पोशाखावरचे निर्बंध सैल वा कडक होतात, अशी एक टिप्पणी मसीहने केली आहे. कारण त्यानुसार महिला बातमीदारांना आपला पोशाख सुधारा, अशा सूचना सरकारकडून किंवा कुणाहीकडून दिल्या जात. एकदा मसीहला, तिच्या हिजाबबाहेर डोकावणारी छोटीशी केसांची बट पाहून एका धर्मगुरूने दटावलं, 'तुझे केस झाकून घे. नाहीतर मी तुला इथून बाहेर काढीन.' मसीह गप्प बसून ऐकून घेणाऱ्यातली थोडी होती! तिने ओरडत त्याला प्रत्युत्तर दिलं, 'केसाच्या दोन बटांवरून एवढं कांड कशाला करताय? तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे.' त्यावर 'तुला धडा शिकवल्यावाचून मी राहणार नाही,' असं म्हणून या धर्मगुरूने तिथून काढता पाय घेतला...अर्थातच मसीहला याची किंमत चुकवावी लागली. तिचा पत्रकार म्हणून असलेला पास गमवावा लागला. तिला संसदेत प्रवेश मिळेनासा झाला. तिने आपलं लेखन तरीही चालूच ठेवलं आणि इस्लामिक रिपब्लिकच्या नावाखाली चाललेल्या सरकारातही कसे घोटाळे आहेत, याचा पर्दाफाश ती करतच राहिली. अधूनमधून ती लंडनला जाऊ लागली आणि लवकरच तिने अमेरिकेत आश्रय मिळवला.

परदेशात असताना तिने मग 'माय स्टील्दी फ्रीडम' हे फेसबुक पेज सुरू केलं. हिजाब न घालता स्त्रियांनी त्यावर फोटो टाकावेत, असं आवाहन तिने केलं. त्याला प्रतिसादही बऱ्यापैकी मिळू लागला. हजारो स्त्रिया त्यात सामील झाल्या आणि सक्तीच्या हिजाबचा निषेध करू लागल्या...

'द विंड इन माय हेअर..' या पुस्तकाचा बराचसा भाग मसीहच्या अशा वेगवेगळ्या स्तरांवरच्या लढ्यांनी व्यापलेला आहे. स्वतःच्या जीवनातली गरिबी, राजकीय दबाव, व्यक्तिगत समस्या अशा साऱ्याबद्दल ती यात लिहिते. मुस्लिम स्त्रीचं आत्मकथन म्हणजे त्यात हिजाबचा प्रत्यक्ष व लाक्षणिक त्याग आणि पश्चिमी मूल्यांचा स्वीकार अशी सांगड घातली जाते. परंतु मसीहने असं काहीएक केलं नाही. तिने फक्त अशी भूमिका घेतली की, हिजाबची सक्ती असू नये. ज्यांना हिजाब वापरायचा नाही, त्यांनी तो का म्हणून वापरावा? एवढंच तिचं म्हणणं आहे. 'हिजाबपेक्षा गंभीर प्रश्न स्त्रियांपुढे नाहीत का?' असाही सवाल नेहमी तिला केला गेला. पण असं म्हणण्यातच स्त्रियांच्या मुक्तीला घातलेला अडसर जाणवतो. इराणमध्ये शहाने आणलेली पश्चिमी संस्कृती आणि जुन्या परंपरांना हास्यास्पद

ठरवण्याचा केलेला प्रयत्न यामुळे हिजाबची सक्ती हा इस्लामी क्रांतीनंतरचा एक महत्त्वाचा विषय बनला, हेही खरंच आहे. म्हणूनच हिजाब न घालण्याची फ्रान्समध्ये केलेली सक्तीही तिला आक्षेपार्हच वाटली. या दोन्ही प्रकारच्या सक्तीला तिने ठाम नकार दिला आहे. कारण ते तिला या लढ्यात अपेक्षितच नाही. तुम्ही कुठलीतरी एकच बाजू घेऊ शकता, या भूमिकेलाच तिचा विरोध आहे. आपली भूमिका स्पष्ट तिने स्पष्ट केली आहे. हिजाब वापरण्याची सक्ती आणि हिजाब न वापरण्याची सक्ती दोन्हीतला दबाव तिला नाकारायचा आहे. स्त्रीला ठरवू द्या, तिला काय करायचं आहे किंवा नाही ते, असं तिचं म्हणणं आहे.

मसीह ग्रामीण भागात आणि तशी गरिबीतच वाढली. तिचा व्यवस्थेतल्या अन्यायाविरुद्धचा संताप यामुळे विशेषच लक्षणीय ठरतो. ती दोन वर्षांची असताना इस्लामी क्रांती इराणमध्ये घडून आली. पुढे घरातले क्रांतीपूर्वीचे जुने फोटो बघताना तिला वेगळंच वाटायचं. कारण त्यात तिची आई स्कर्ट घालायची आणि साधासा स्कार्फ बांधायची. तर वडील लहानशी दाढी ठेवायचे. पण खोमेनी सत्तेवर आल्यानंतर त्यांना दाढी वाढवावी लागली. तर आईला काळी चादर ओढूनच वावरावं लागलं, हे ती बघत होती. त्यात तिचे आईवडील हे खरं तर इस्लामी क्रांतीचे पुरस्कर्ते होते. क्रांतीनंतर आपल्याला चांगली नोकरी मिळेल, संधी मिळेल असं त्यांना वाटायचं. पण त्यापूर्वी समाजातलं समानतेचं वातावरण क्रांतीने संपवलं. स्त्रिया जिमला जायच्या, न्यायाधीशही बनू शकायच्या. पण क्रांतीने लोकांचा भ्रमनिरास केला. मसीह याबद्दल लिहिते, 'क्रांतीला पाठिंबा देणाऱ्या लोकांना राजकीय स्वातंत्र्य हवं होतं. ते त्यांना मिळालंच नाही, पण शिवाय त्यांचं सामाजिक स्वातंत्र्यही हरपलं.' क्रांती आली आणि स्त्रियांविरुद्ध गोष्टी घडू लागल्या. अगदी पहिलं बंधन आलं ते सात वर्षांवरील मुलीं व स्त्रियांनी सक्तीने हिजाब वापरण्याच्या नियमाचं. आम्हाला आमची शरीरं नियंत्रित करण्याचा प्रयत्न झाला व आजही तो चालू आहे, अशी मसीहची भावना आहे. हिजाबबद्दलची तिची अशी तीव्र प्रतिक्रिया तिच्या प्रतिकारातून प्रकटली आणि तीच तिच्या या आत्मकथनात प्रतिबिंबित झाली आहे.

नंदिनी आत्मसिद्ध

Tags:    

Similar News