महाराष्ट्राची जबाबदारी का वाढली आहे...?
एका विशिष्ट धर्माला शत्रू म्हणून दाखवून लोकांची डोकी भडकावून आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रश्नांपासून दुर्लक्ष करणाऱ्या लोकांची सत्ता वाढत असताना पुरोगामी महाराष्ट्राची देशामध्ये जबाबदारी वाढतेय का? वाचा महाराष्ट्र दिनानिमित्त आनंद शितोळे यांच्या विचार करायला लावणारा लेख
कोव्हिड महामारीच्या काळात महाराष्ट्राचे नेमके देशातले महत्त्व आणि महाराष्ट्राची भूमिका या बाबी महत्त्वाच्या आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि सर्वात जास्त महसूल संकलन करण्यात महाराष्ट्र सतत आघाडीवर असतो, हेही आपल्याला ठाऊक आहे. यापलीकडे जाऊन महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. अगदी चारशे पाचशे वर्षांचा इतिहास पाहिला तरी महाराष्ट्राने सतत दिल्लीच्या केंद्रीय सत्तेशी टक्कर घेतलेली आहे. आणि सातत्याने संघर्षाची भूमिका घेऊन प्रसंगी दिल्लीची गादी आणि राजधानीचे महत्त्व राखायला पानिपतावर लढाई केलेली आहे. मात्र, आजच्या काळात इतिहासाला कुरवाळत बसण्यापेक्षा त्यापासून योग्य धडा, बोध घेणे जास्त आवश्यक आहे.
अनेक शतक महाराष्ट्र जसा संतांची भूमी म्हणून ओळखला गेला. तशीच महाराष्ट्राची ओळख सुधारणावादी, नव्या वाटा शोधणार राज्य म्हणून आहे. पहिली मुलींची शाळा, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करणारा कायदा, सहकार चळवळ, महिला आरक्षण आणि इतरही अनेक बाबी महाराष्ट्राने देशाला दिल्या. स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत गांधीजीची जन्मभूमी गुजरात असली तरी कर्मभूमी मात्र, महाराष्ट्र राहिली आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढून आजच राज्य निर्माण झालं. मात्र, या सगळ्या कालखंडात महाराष्ट्राचा तोंडावळा सुधारणावादी असला तरीही देशाची मूळ प्रकृती असलेली सहिष्णुता, बंधुभाव, समभाव, धर्मनिरपेक्षता या बाबी महाराष्ट्रात कायमच राहिल्या आणि परिणामत: महाराष्ट्राची सगळ्याच आघाड्यावर प्रगती वेगाने झाली आणि आजच आर्थिक दृष्ट्या भक्कम राज्याच रूप महाराष्ट्राला आलं.
मात्र, गेल्या काही वर्षापासून लोकशाही राज्यव्यवस्था, कल्याणकारी राज्यव्यवस्था, धर्मनिरपेक्ष, समता, बंधुता ही मूल्य अडगळीत जाणार की काय अशी शंका यायला लागलीय. पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल प्रतिगामी होण्याच्या दिशेने होतेय की काय अशी भीती वाटायला लागलीय. हे वार मुळात हिंदीभाषिक पट्ट्यात जिथे धार्मिक, जातीय अस्मिता अतिशय टोकदार आहेत आणि जिथून राममंदिर, रथयात्रा आणि एकूणच उजव्या विचारांचे मूलतत्त्ववादी विचारसरणी असलेले लोक बहुसंख्य झालेत आणि सत्तेत आलेले आहेत.
एका विशिष्ट धर्माला शत्रू म्हणून दाखवून लोकांची डोकी भडकावून त्यांना आरोग्य, शिक्षण, रोजगार, अर्थव्यवस्था या बाबी नजरेआड करून धर्माची अफू देणे हे अतिशय घातक आहे आणि तेच दुर्दैवाने होत आहे. अशावेळी देशातल्या संपूर्ण जनतेचे एक वेगळेच ध्रुवीकरण होण्याची भीती निर्माण झालेली आहे. आणि या ध्रुवीकरणाचा भौगोलिक परीघ पाहता महाराष्ट्र हे मोठं राज्य या वादळाच्या सीमेवर आहे. उत्तरेत हिंदी भाषिक, हिंदुत्त्ववादी, उजव्या विचारांचे प्राबल्य असलेली सरकार आणि जनतेमध्ये महाराष्ट्र आणि उत्तरेला द्रविड संस्कृती अभिमानाने जपणाऱ्या दाक्षिणात्य राज्यांची फळी. महाराष्ट्र, दाक्षिणात्य राज्ये, ओडिशा, आसाम, बंगाल ही सगळी राज्य बिगरहिंदी भाषिक आहेत आणि स्वतःची भाषिक, भौगोलिक अशी पूर्णपणे भिन्न संस्कृती जपून आहेत.
या हिंदी भाषिक आक्रमणाला तोंड देऊन आपली संस्कृती जपणे आणि त्याचवेळी भारताची वैशिष्ट्य असलेली गंगाजमनी परंपरा, बंधुता, सहिष्णुता असलेली संस्कृती जपणे अशी दुहेरी जबाबदारी महाराष्ट्रावर आहे आणि याची सुरुवात तीन भिन्न विचारसरणी असलेल्या मात्र, महाराष्ट्र हित आणि महाराष्ट्राची संस्कृती जपू पाहणाऱ्या पक्षांची राजवट येऊन झालेली आहे. या बिगरहिंदी राज्यांची मोट बांधून आपल्या हिताचे, संस्कृतीचे रक्षण करणे ही मोठी जबाबदारी महाराष्ट्राची येणाऱ्या काळात असेल.