चला, या निमित्ताने महात्मा फुलेंना समजून घेऊया
मनोहर भिडे यांनी महात्मा फुलेंवर केलेल्या टिकेनंतर मराठी अभिनेते किरण माने यांनी महात्मा फुले यांच्या विविधांगी कार्यावर प्रकाश टाकणारी फेसबुक पोस्ट लिहून पुन्हा नव्याने महात्मा फुले समजून घेण्याचं आवाहन केलंय. काय म्हटलंय किरण माने (Kiran Mane)यांनी वाचा जसेच्या तसे…
महामानव परत एकदा समजून घिवूया ! परत एकदा आपण वन ॲन्ड ओन्ली, द ग्रेट महात्मा जोतिबा फुले (Mahatma fule)यांना कडकडीत सलाम करूया.
तुम्हाला माहितीय? महात्मा फुले झोपताना उशाशी दांडपट्टा ठिवून झोपायचे ! कधीबी घातपात झाला तर तयारी असावी म्हणून. त्यांचबी असंच ट्रोलिंग व्हायचं. त्यांनाही धमक्या यायच्या. या भितीमुळं भलेभले मूग गिळून गप्प बसतात. त्याकाळात, आधाराला संविधान नसताना, हा माणूस विरोधकांच्या बेभान, मदमस्त झुंडीबरोबर निडरपणे झुंजत व्हता. एकटा !
...खरंच फुले म्हन्जे 'वन मॅन आर्मी' व्हती राजेहो.
गुलामीत खितपत पडलेल्या बहुजनांच्या या एकांडी हिरोनं अन्यायी व्यवस्थेविरोधात शड्डू ठोकला होता. पाठीशी कोण उभं रहाणार? आपलं शोषण होत आहे हेच बिचार्यांना समजत नव्हतं. हजारो वर्ष 'गुलामगिरी हेच आपलं प्रारब्ध आणि तोच आपला धर्म' हेच मनावर बिंबवलं होतं. अशावेळी फुलेंच्या पाठीशी उभं राहून जीवावर उदार कोण होणार होतं? त्यावेळी 'आय सपोर्ट फुले' करत कुनी हॅशटॅग चालवला असता, तर त्याला फुलेविरोधक हिंस्त्र जनावरांनी अक्षरश: फाडून खाल्लं असतं.
..पण महात्मा फुले एकटे वाघासारखे लढले. तुकोबारायाची आक्रमकता त्यांच्या अंगी रुजली होती. 'दिवार' मधला बच्चन कसा खतरनाक ॲटिट्यूडनं पिटरच्या खिशात चावी ठेवून म्हन्तो "इसे अपने जेब में रख ले पीटर..अब मै ये ताला तेरी जेब से चाबी निकाल ही खोलूँगा.".. टाळ्याशिट्ट्यांचा पाऊस पडतो... पन, शिनेमात अस्लं सोपं असतं भावांनो.. 'नाटक' असतं ते. खर्या आयुष्यात महात्मा फुलेंनी शंभरपट ॲटिट्युडनं हजारो वर्ष जुल्मी 'पीटर'च्या खिशात असलेली सामाजिक-धार्मिक-बौद्धिक शृंखलेची 'चावी' अक्षरश: हिसकावून घेतली ! हिरोच वो.. खराखुरा हिरो !! त्या हिरोला टाळ्याशिट्ट्यांची अपेक्षा नव्हती गड्याहो.. ती 'चावी' मिळवून आपल्या आई-बहीण-मुलींना शिक्षणाची दारं उघडून द्यायची होती... अन्यायी व्यवस्थेची 'दिवार' तोडून महिलांना, बहुजनांना आणि अस्पृश्यतेचे चटके सोसणार्या लोकांना सर्वांसोबत समानतेनं मुख्य प्रवाहात सामील करायचं होतं.
त्यावेळी ज्या लोकांनी फुले दांपत्यावर चिखल, शेणामातीचा मारा केला असेल... त्यांच्या स्वत:च्या घराण्यातल्या लेकीबाळीबी आज फुलेंच्या संघर्षातनं मिळालेल्या स्वातंत्र्याचा-शिक्षणाचा उपभोग घेतायत !
...माझ्या भावांनो आनि बहिणींनो, महामानवांच्या प्रत्येक जयंती-पुण्यतिथीला आपण मिरवणूका काढून जयजयकार करतो. पण आता तेवढंच करून भागणार नाय. या सगळ्यांनी आपल्याला मिळवून दिलेलं सामाजिक आणि बौद्धिक स्वातंत्र्य टिकवून ठेवणं हे आपलं पहिलं कर्तव्य हाय... ते अबाधित राखण्यासाठी न घाबरता मन,मेंदू वापरून फुले वाचणं आणि पुढच्या पिढीपर्यन्त पोहोचवणं याशिवाय पर्याय नाही.
महात्मा फुलेंवर टीका करणार्यांचे मनापासून आभार. टीका आवश्यक असते. सत्य शोधायची उर्मी दाटून येते लोकांमध्ये. फुले तर स्वत: 'सत्यशोधक' होते. काही ना काही निमित्तानं या महामानवांना पुन्हा पुन्हा 'थॅंक्स' म्हणायची, त्यांचे विचार आणि कार्य नविन पिढीत रूजवण्याची संधी मिळते आहे, हे महत्त्वाचं. महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन !
- किरण माने.