कल्याण स्थानकावरील एक रात्र

रात्रीचे १२ वाजले की मुंबईतील रेल्वे स्टेशनवरची गर्दी कमी व्हायला लागते आणि अनेकांचा दिवस सुरू होतो. रिक्षा चालकांची आरडा-ओरड ते व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांचे शांत झुरके घेणं हे सगळं सुरू असतं. याबरोबरच अनेक गमतीदार आणि गंभीर गोष्टी या स्टेशनबाहेर घडत असतात. याचाच वेध घेतला आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी....;

Update: 2023-03-05 14:02 GMT

गावाकडे ५ वाजले की शेतात काम करणाऱ्या माय - माऊल्यांना घराची ओढ लागते. तेच चित्र मुंबईत थोडं वेगळं आहे. रात्री ११-१२ पर्यंत मुंबईत गजबजाट पहायला मिळतो. पण १२ वाजून गेले की हा गजबजाट कमी व्हायला लागतो. गर्दीने भरलेलं रेल्वे स्थानक हळूहळू मोकळं व्हायला लागतं. रात्री १:५२ ची कर्जत ट्रेन कल्याण स्थानकावरून गेली की, मुंबईत पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले पण राहण्याची सोय नसलेले आणि गाडी हुकलेले लोक रेल्वे स्थानकावर अंग टाकायला सुरुवात करतात. 



स्थानकाच्या बाहेर पडलं तर सुरू असलेल्या बसस्थानकाच्या बांधकामाच्या पत्र्याच्या आडोशाला गंजाडी गांजा फुंकताना पहायला मिळतात. तर दुसरीकडे रेल्वे स्थानकाच्या बाहेर रिक्षा चालकांचा ओरडा मात्र सुरू असतो. ये भिवंडी जाणे का है क्या? असं म्हणणारे, कहा जाणे का है? असं विचारणारे रिक्षा चालक गेटच्या बाहेर उभे राहून ओरडताना दिसतात. यातील अनेक रिक्षा चालकांचा दिवस रात्री ११ वाजता सुरू होतो, असं उत्तरप्रदेशातून पोट भरण्यासाठी कल्याणमध्ये आलेला राजेश सांगत होता. 



या रिक्षा चालकांचा आवाज सहज पोहचेल इतक्या अंतरावर कल्याण बस स्थानक आहे. या बस स्थानकावर रात्री दीड नंतर बस चुकलेले अनेक प्रवासी भेटतात. तर काही गावाकडून मुंबईत आलेली माणसं दिसतात. पहिल्या लोकलला अजून दोन तास बाकी राहिलेत, असं म्हणून ही आळसावलेली माणसं तिथंच बाकड्यावर आडवी झालेली दिसतात. या बसस्थानकाच्या बाहेर निघाल्यावर समोर आठ - दहा महिला भाजी निवडताना दिसल्या. त्यावेळी रात्रीचे अडीच वाजले होते.



रात्री अडीच वाजता भाजी निवडणाऱ्या त्या महिलांना पाहून जरा आश्चर्य वाटलं. कारण अर्ध्यारात्री या महिला भाजी निवडत होत्या. त्यांच्याशी बोलत असताना त्यातील एक रावेरहून, एक भुसावळ जवळील बुऱ्हाणपूरहून आल्याचं सांगत होती. 

पुढं बोलताना ती महिला म्हणाली, आम्ही दिसभर भाजी गोया करतो आणि आठ दहा जणी दुपारी दोन वाजता रेल्वेत बसतो. रात्री ११ वाजता कल्याणला उतरतो आणि मंग रातभर भाजी निवडायची आणि सकाळी इकून पुन्हा घरला जायचं. एवढं आमचं काम.

 दुसऱ्या एका ६५ वर्षाच्या आजीने सांगितलं की, भाऊ दिवसभर ह्या रानभाज्या गोया करतो. मंग इकाया घिऊन येतो. पोटासाठी कराया लागतं भाऊ. पोरं दारू पित्यात आणि कास्तकरी काम करत्यात. शिकले नाय काय बी. आता करावं लागतंय ढोरासारखं काम. आजी आपलं दुखणं सांगत होती. पुढं आजी म्हणाली ही भाजी इकून हजार - बाराशे मियत्यात. त्यातले ४०० रुपये खर्ची जाती. हातात सात - आठशे राह्यते. तीन दिसाले येतो आम्ही. त्यामुळं कसतरी दिसं काढतो बाबू, आजी सांगत होती. हे बोलताना आजीचा हात मात्र चालूच होता. आजी बरंच बोलत होती. मी मात्र फक्त ऐकत होतो. आजी म्हणाली श्रावणबाळ योजनेतून ६०० रुपयांचा डोल मियतो. पण भाजी घ्यायले गेलं तरी ते पुरत नाहीत, असं म्हणून आजीने थेट महागाईवर बोट ठेवलं. 

या महिलांशी बोलून पुढं निघालो तर काही महिला आणि मुली धावताना दिसल्या. दोन मिनिटापुरतं काहीच सुचलं नाही. तेवढ्यात मागून येणारी पोलिसांची गाडी दिसली. त्यामुळे या महिला आणि मुली धावत होत्या.



रात्र सुरू झाली की अनेकांचा दिवस सुरू होतो. त्यातल्याच या वेश्या व्यवसाय करणाऱ्या कोवळ्या पोरी आणि तिशी - चाळिशीतील महिला. रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभ्या राहून गिऱ्हाईक शोधत असतात. त्यातच एक महिला स्टेशनच्या दारात उभी असलेली दिसली. मी तिच्याकड येत असल्याचं दिसलं तेव्हा तिचा चेहरा खुलला. पण मी तिच्या पुढं जाऊन ताई म्हणून बोललो तर तिचा मुडच बदलला. काय को ताई बोलताय रे? ताई बोलणे का है तो इधर काय को आयला? असं तिने विचारलं. तेवढ्यात मी तिची विचारपूस करायला लागलो तर ती पटकन बोलली, काय को अपना टाईम खराब कर रहा है? निकल जा.... मैं कुछ नहीं बताऊंगी... निकल जा..., असं ती म्हणत होती. पण मी तिथच थांबून तिला पुन्हा विचारलं, मग शेवटी ती आपली कर्मकहाणी सांगायला लागली.

तिचं नाव दिशा (नाव बदलले आहे). तिच्यासोबत बोलताना तिला पश्चिम बंगालमधून फसवून आणल्याचं तिने सांगितलं. त्यावेळी जर तुला फसवून आणलं आहे तर तू पोलिसात का जात नाही? असं विचारलं. त्यावेळी तिने सणकुण शिवी हासडली. म्हणाली वो और ये अंदर से मिले हुये होते हैं. कितनी भी कोशिश की भागने की तो भी भाग नहीं सकती. पहिले कोसिस की थी पर अब भागने का मन नहीं होता. यहाँ से निकलके जाऊँगी भी तो कहाॅं? असा सवाल दिशाने केला. अब आदत हो गयी है रे यार, असं दिशा म्हणाली. लोग बहुत मा×××द होते है. हमें इन्सान समजते ही नहीं, अशी कैफियत दिशाने मांडली. दिशासोबत बोलत असतानाच एकजण आला आणि क्या बोल रहा असं विचारू लागला. मी त्याला योग्य शब्दात समजावलं आणि मी कल्टी मारली. 


त्यानंतर पुढे गेलो तर रात्रीचे साडेतीन वाजले होते. स्टेशनपासून १०० मीटर अंतरावर एक हॉटेल सुरू होतं. पोलिसांची गाडी त्या हॉटेल समोरून गेली पण ना पोलिसांनी हॉटेलवर ना कारवाई केली ना काही दम भरला. बिनदिक्कत हॉटेल सुरूच होतं. काही तरुण पोरं सिगारेटचे झुरके घेत होते तर काही मोठ्याने गप्पा मारत होते. हे सगळं सुरू होतं तेही पोलिसांच्या समोर......

मी तिथून पुन्हा फिरत फिरत स्टेशनच्या बाहेर आलो. स्टेशनच्या बाहेर चहा घेतला आणि पायऱ्या चढलो. तेवढ्यात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी पहिली लोकल आली. या लोकलची वेळ पुकारताच आळसावून पडलेले लोक डोळे चोळत लोकल पकडण्यासाठी धावताना दिसले. आता रात्र सरली होती आणि पहिल्या लोकलसह पुन्हा मुंबई धावण्यासाठी सज्ज झाली होती.



Tags:    

Similar News