'कोपले ट्रोलर्स सनातनी हे लोक। आता मज भिक कोण घाली॥'
अभिव्यक्ती युट्यूब चॅनलने संविधान प्रचारक आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर यांची मुलाखत घेतली या मुलाखतीवर ट्रोलर्स तुटून पडले.ज्ञानेश्वर महाराजांनी लेखाच्या माध्यमातून ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. हा लेख नक्की वाचा...;
७ जुलै रोजी मी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालो होतो. त्यावेळी अभिव्यक्ती युट्यूब चॅनलसाठी रविंद्र पोखरकर यांनी माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा एक तुकडा त्यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर शेअर केला. त्यानंतर त्यांनी लगेचच पूर्ण मुलाखत त्यांच्या चॅनेलवर अपलोड केली. त्यावर काही सनातनी ट्रोलर्सनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी संतांनी दाखवलेल्या मार्गाने जातोय याचं समाधान वाटलं. मला बळ मिळालं. 'निंदकाचे घर असावे शेजारी।' असं तुकोबाराय म्हणतात. सोशल मिडियावर असे 'निंदक ट्रोलर्स' मिळालेले पाहून मला समाधान वाटलं. आपण संतांचे बोट धरुनच चालतोय ही माझी समज पक्की झाली. या निंदक ट्रोलर्सचे खूप आभार.
या मुलाखतीत मी पालखी सोहळ्यातल्या जातीभेदाविषयी बोललेलो आहे. त्यातला एक शब्दही खोटा नाही. वारकरी संतांची विचारसरणी समतेची आहे. त्यांनी जातीविषमतेच्या विरुद्ध बंड केलं. नामदेवरायांपासून तुकोबारायांपर्यंत अनेक संतांच्या अभंगातून त्याचे दाखले मिळतात. 'वर्णाभिमाने कोण झाले पावन।' असा प्रश्न तुकोबारायांनी विचारला आहे. संतांचा हा समतेचा विचार पुढच्या काळात मात्र काही वारकऱ्यांना पेलवला नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वारकऱ्यातली अस्पृश्यता. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात १९७७ पूर्वी दलित दिंड्या घोड्यांपुढे चालत होत्या. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात रथापुढे २४, २५ आणि २६ या क्रमांकावर रोहिदास, चोखामेळा आणि अजामेळा या तीन दलित दिंड्या चालत होत्या. त्या दिंड्या अनुक्रमे चर्मकार, महार आणि मातंग समाजातल्या वारकऱ्यांच्या होत्या. या दिंड्यातील दलित वारकऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळत होती याचे अनेक दाखले आहेत. या दिंड्या मुख्य पालखी सोहळ्यापासून तोडून घोड्यांच्या पुढे चालवल्या जात. त्याविरुद्ध १९७७ साली सत्याग्रह झाला. या सत्याग्रहाचे त्यावेळच्या चर्मकार समाजाच्या हराळे वैष्णव दिंडीने काढलेले पत्रक खाली दिलेले आहे. ते वाचा म्हणजे १९३० सालच्या आळंदी संस्थानच्या घटनेतच या दिंड्यांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जात होती हे दिसून येईल. १९७७ साली सत्याग्रह झाल्यानंतर पुढे तीन - चार वर्षे कोर्टात संघर्ष होऊन दलित दिंड्यांना न्याय मिळाला. यावेळी वारकरी संप्रदायातून बाबा महाराज सातारकर आणि पांडुरंग सदानंद गुरुजी यांनी दलित दिंड्यांची बाजू घेतली. त्यावेळी बहुतेक सनातनी वारकरी मुखंड दलित दिंड्यांच्या आणि वारकऱ्यांच्या विरोधात होते.
माझ्या व्हिडीओला जे लोक ट्रोल करत आहेत त्यांची मला कीव वाटते. त्यापैकी काहीजणांची भावना प्रामाणिक आहे ते फक्त अज्ञानातून बोलत आहेत. त्यातले फार कमी जण वारकरी आहेत. ते गैरसमजातून रेटून खोटं बोलत आहेत. पालखी सोहळ्यात आम्हाला जातीभेदाचा अनुभव आला नाही, असं म्हणून ते बुद्धीभेद करत आहेत. वास्तविक पाहता आजही दलित दिंडी प्रमुखाच्या नेतृत्वात सवर्ण वारकरी नाहीत हे वास्तव मान्यच करावं लागतं. दलितांच्या दिंड्या स्वतंत्र आहेत. अस्पृश्यता पाळली जात होती त्या काळात दलित दिंड्याना कोणतेही मान मिळाले नाहीत. स्वाभाविकच दलित दिंड्यांना परंपरेची मानाची कीर्तनं आणि जागराची सेवा आजही मिळू शकत नाहीत हे वास्तव आहे. फक्त एकदा जेजुरी मुक्कामी कीर्तनाची सेवा दलित दिंडीला नाईलाजाने द्यावी लागली होती असं पंढरीनाथ आबनावे यांनी वार्षिक रिंगणच्या चोखोबारायांच्या अंकात दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं.
काही ट्रोलर्स म्हणत आहेत की १९७७ पूर्वीचा हा 'इतिहास' आता सांगू नका. मलाही इतिहासाची मडी उकरण्यात आजीबात रस नाही. पण अस्पृश्यता अजून इतिहासजमा झाली नाही म्हणून त्याचं विश्लेषण सतत करावं लागतं. त्यासाठी इतिहासाचे दाखले द्यावे लागतात. ते दाखले तुमच्या जातीय मानसिकतेचे पितळ उघडे पाडतात म्हणून त्यावर बोलायचं नाही असं होऊ शकत नाही. अस्पृश्यता इतिहासजमा झाली असती तर सनातनी ट्रोलर्सची ही टोळधाड निर्माणच झाली नसती.
मी जन्मजात आणि परंपरागत वारकरी आहे. मी संतांचा समतेचा विचार मानतो. त्यामुळे समतावादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी माझा संवाद - संपर्क आहे. तो संपर्क मी लपवत नाही. पण माझा पिंड वारकरी आहे. माझ्या आजोबांनी त्यांची हयात वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी घालवली. मला तो उज्ज्वल वारसा आहे. त्याचा मला अभिमान आहे. माझी स्वतःची ओळख वारकरी कीर्तनकार अशीच आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीला मी घेरडी ते पंढरपूर या माझ्या आजोबांच्या पालखी सोहळ्यात चालतो. इतर १० वाऱ्यालाही मी पंढरपुरात असतो. एकही वारी चुकवत नाही. हे मला सांगण्याची आणि सिद्ध करण्याची गरज नसली तरी वारकऱ्यांचा बुद्धीभेद होऊ नये म्हणून हे स्पष्ट करतोय. मी पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असलो तरी त्यांच्याशी काही बाबतीत माझे मतभेद आहेत. ते मी उघडपणे मांडले आहेत. पण सनातन्यांशी असलेले माझे मतभेद किरकोळ मुद्द्यांवरचे नसून गंभिर आणि मूलभूत मुद्दयांवरचे आहेत. त्यामुळे माझ्याकडून सनातन्यांची जास्तीत जास्त चिकीत्सा होणार हे उघड आहे. माझ्यासारख्या एका वारकऱ्याशी सनातन्यांचे मतभेद असणारच. पण हे मतभेद व्यक्त करताना जी खालच्या पातळीवरची भाषा तुम्ही वापरत आहात त्यावरुन तुमच्या मनातला वारकऱ्यांविषयीचा जळफळाटच दिसतो. काहीजण मला मारहाण करण्याच्या धमक्या देत आहेत. त्याला मी भिक घालत नाही. माझा वारसा लढवय्या तुकोबारायांचा आहे. जे लोक संतांना छळत होते त्यांना आपण सनातनी म्हणतो. हेच सनातनी साने गुरुजींना दलित मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहावेळी छळत होते. त्यांनीच दलित वारकऱ्यांच्या सत्याग्रहालाही चिरडून टाकण्यासाठी १९७७ साली हिंसक प्रयत्न केले होते. दलित वारकऱ्यांवर हल्ले केले होते. आज त्याच सनातनी प्रवृत्तीचे लोक मला ट्रोल करतायत हे पाहून मला खूप आनंद होतोय. ते मला आपोआपच संतांच्या आणि साने गुरुजींच्या परंपरेत बसवत आहेत. माझ्यासारख्या संतांच्या पाईकाला यापेक्षा अधिक आनंद कशातून मिळणार?
लवकरच पालखी सोहळ्यातल्या या सत्याग्रहाचा सर्व इतिहास सविस्तर वाचायला मिळेल. लवकरच माझं 'भजन करा सावकाश' या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यावेळी याविषयी आणखी माहिती मिळेल. तुर्तास इतकंच.