भारताच्या प्रत्येक गावाकुसाबाहेरील बहिष्कृत वस्तीत 'कर्नान' !
कर्नन काय आहे. जन्माने हलका असल्यामुळे द्रौपदीच स्वयंवर नाकारलेल्याची गोष्ट आता द्रौपदी व कर्नन चे प्रेम दाखवतेय. बांधलेल्या गाढवापासून , नुसता दारात बांधलेला घोडा पळवत नसेल तर तो गाढवच (दोन्ही जणू एकाच वंशाचे) असतो म्हणजे गाढवापासून मुक्त झालेल्या उधळलेल्या घोड्याचा प्रवास कर्नन आहे, सांगतायत मुक्त पत्रकार यशपाल सोनकांबळे....;
यशपाल सोनकांबळे....
बहुचर्चित तमिळ चित्रपट दिग्दर्शक मारी सेल्वराज यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट पेरियारम पेरुमल (2018). सवर्ण मुलगी अन् दलित मुलगा प्रेमकथेवर आधारीत या चित्रपटाने व्यक्तीपुजेत अडकलेल्या समिक्षकांसह स्टंटप्रेमी प्रेक्षकांच्या मेंदूला झिणझिण्या आणल्या. जळजळीत जातवास्तव मांडताना कोणतीही कसूर ठेवली नाही तर सिनेमा कसा अंगावर काटा आणतो.
समाजातील उपेक्षितांच्या जीवनावर आधारीत चित्रपट काढणे ही व्यावसायिकदृष्ट्या फार मोठी 'रिस्क'. 'लेकीन रिस्क है तो इश्क है' हे वाक्य जणू ब्रीदवाक्य बनवून धनुष आणि मारी सेल्वराज यांनी 'कर्नान' चित्रपट बनवून खरी ठरवली आहे. भारतीय समाजातील जात, पोटजातींचं वास्तव कितीही दुर्लक्षित केलं तरी नाकारता येत नाही. कारण भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या पलीकडे जात 'ओटीटी प्लॅटफाॅर्म' वर एन्ट्री केली आहे. त्यामुळे कथेतील भीषण वास्तव मांडताना अडसर नसल्यामुळे 'ब्लडेड अॅण्ड बोल्ड सीन' दाखविता येत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांनीही वास्तव मान्य करायला सुरूवात केली आहे.
कर्नान हा प्रतिकार, विद्रोही, न्यायासाठी संघर्षाची ठिणगी पेटविणारा प्रतिकात्मक नायक आहे. देशातील वेशीबाहेरील, गावकुसाबाहेरील वाड्या, वस्त्यांचे विषय यापुर्वी मुख्य प्रवाहातील कमर्शियल चित्रपटांचे विषय बनले नाहीत. दलित अॅट्रॉसिटी हा 'कमर्शियल रेव्हेन्यू' मिळवून देऊ शकत नाही. पण आर्ट सिनेमांमधून हे वास्तव दाखविण्याचे प्रयत्न झालेत. तथाकथीत अस्पृश्य, खालच्या जातीतील विद्रोही व्यक्ती मुख्य प्रवाहातील चित्रपटांचे नायक नायिका बनल्या नाहीत. दलित चळवळीची नाटकं, सत्य कथा, कादंबऱ्या, कवितांमध्ये बंदिस्त असलेल्या नायक नायिकांना चित्रपट या फाॅर्मेटमध्ये आणण्याची हिंमत काही मोजक्या दिग्दर्शकांकडून केली गेली. ग्लोबल, नॅशनल अॅवाॅर्ड मिळेपर्यंत अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रसिद्धी देण्याचं काम 'मेनस्ट्रीम मीडिया' सुद्धा देत नाही ही सत्य परिस्थिती आहे. कारण ज्या त्या जातींची दुखणी जगलेला प्रतिनिधी मेनस्ट्रीम मीडियात नाही आणि चित्रपट सृष्टीतही नाही.
कर्नान चित्रपट थेट भाष्य करणारा पण अपूर्ण...!
गावकुसाबाहेरील रानातली कुत्री, पायात जोखड असलेली गाढवं, घाणीच्या साम्राज्यात आकंठ डुबलेली डुकरं या गर्दीत अस्तित्वाची जाणीव हरवून बसलेली हतबल गुलामांची वस्ती. जीव धोक्यात घालणारी लहान मुलं, सवर्णांच्या वासनांध वाईट नजरा चुकवित शालेय शिक्षण घेत असलेल्या वयात आलेल्या पोरीबाळी, बेरोजगारी, जुगार, नशाबाज आणि खेळात रमलेली तरुणाई. अठराविश्वे दारिद्र्यातही स्मितहास्य ठेवत मरणाची वाट पाहणारे वयोवृद्ध. गावातील अस्पृश्यतेच्या छळा सोसुनही माघार घेत जगणारी वस्ती. जातीय उतरंडीमुळं जातीभेद, अस्पृश्यतेच्या नरकयातना का भोगाव्या लागत आहेत हे अविद्येमुळे माहित नसलेली. पूर्वजन्माचं पाप समजून गुलामी भोगत पडेल ते काम करत गुजराण करणारी लोकं. इंडियात नाही तर बहिष्कृत भारतात राहतात.
ज्याचा जन्मच संघर्षात झालेला असा रस्त्यावरचा विद्रोही तरुण म्हणजे कर्नान. माणूस म्हणून आत्मसन्मानानं जगण्याचा अधिकार सांगणारा तरुण. सर्व सुखसुविधेपासून वंचित, माणूपणाचे नैसर्गिक आणि संवैधानिक हक्कांपासून वंचितेतून आलेली आक्रमकता. प्रतिकारासाठी अंगिकारावी लागलेली हिंसकता. बहुसंख्याकांची (सवर्णांची, आहे रे वर्गाची) हुकुमशाही म्हणजे लोकशाही असं समजून अहोरात्र राबणारी गुलामांची फौज.
सवर्णांकडून अॅट्रोसिटीवर अनेक चित्रपट आले पण ब्युरोक्रॅसी आणि पोलिस अॅट्रोसिटीवर आधारीत कर्नान हा पहिलाच चित्रपट. संगीतकार संतोष नारायणन यांनी लोकसंगीत आणि पारंपारीक गीतांचा सुदंर पेशकश केली आहे.
वारंवार मागणी करूनही दलित वस्तीवर बसथांबा मान्य होत नसतो. सार्वजनिक वाहतूक सेवेतही अस्पृश्यता. प्रसुतीसाठी निघालेल्या गर्भवती आईसाठी बस थांबावी म्हणून एक 'जब्या' दगड भिरकावत बसची काच फोडतो. त्यानंतर कर्नान आणि त्याच टीम लाकडं आणि दगडानी संपूर्ण बसचा चुराडा करत व्यवस्थेविरोधातील रोष व्यक्त करतो. पंचनाम्यानंतर वस्तीत आलेल्या जिल्हाधिकारी पोलिसांविरोधात निकाल देत बसथांबा सुरू करतो. याचाच राग मनात ठेवून वरिष्ट पोलिस अधिकारी वस्तीतील वयोवृद्ध पंचाना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून जबरी हाणामारी करतो. त्याला विरोध म्हणून कर्नान आणि टीमकडून पोलिसांसह पोलिस स्टेशनची जबरदस्त तोडफोड. केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो वगळता अन्य सर्व वस्तुंचा चुराडा. मग या बेकायदेशीर तोडफोडी विरोधात कायदेशीर कारवाईसाठी मोठा पोलिस फौजफाटा बहिष्कृत वस्तीवर जातो.
तत्पुर्वी बहिष्कृत वस्तीत संघर्षाची ठिणगी पडते. कर्नान अन्यायी पोलिसांविरुद्ध युद्धाची घोषणा करतो. म्हातारे, तरुण, बायका पोरांसह सर्वजण वस्तीला काटेरी बाभुळाचं संरक्षण तयार करतात. जुन्या गंजलेल्या हत्यारांना पुन्हा नव्याने धार लावतात. दगड गोटे, हातबाँब, भाले, बरची आणि कर्नानची तलवार. 'बाहुबली' चित्रपटातील युद्धाला लाजवेल असं युद्ध. इंडियातील माणसांविरोधात बहिष्कृत भारतातील गुलामांचं युद्ध. माणूसपणाचे सर्व सुविधा, हक्क नाकारणाऱ्या जातीव्यवस्थे विरुद्धचं युद्ध. अस्पृश्यता, अन्याय, अत्याचाराविरुद्धचे युद्ध. युद्धाचा नायक कर्नान मात्र लोकआग्रहास्तव मिलीटरी भरतीसाठी जातोय. आता वस्तीतील लोकांचे सवर्णांपासून पोलिसांपासून संरक्षण कोण करणार या विचारात जात असतानाच वस्तीवरील पोलिस हल्ल्याची माहिती मिळताच कर्नान वस्तीवर पोहोचतो. पुढे काय होते ? यावर
थेट भाष्य करणारा पण अपूर्ण....कारण देशातील जातीयता संपलीय कुठं?
: यशपाल सोनकांबळे, मुक्त पत्रकार.