#कर्मवीर
" माझी वसतीगृह शाहूंच्या नावे सुरू करील आणि त्या वस्तीगृहात माझ्या दाढीतील केसाएवढी मुले येऊ पर्यंत दाढी करणार नाही आणि पायात वाहणा वापरणार नाही" गोरगरीब बहुजन समाज आणि उपेक्षित दलित समाजाच्या पोरांना शिकवण्यासाठी शाळा आणि वसतीगगृह रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभारणी करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांची आज पुण्यतिथीच्या निमित्ताने महेंद्र लंकेश्वर यांनी व्यक्त केलेल्या भावना..;
" खऱ्या शिक्षणाचं खरं कार्य एखाद्याला तीव्र, सखोल आणि टिकात्मक विश्लेषण करायला भाग पाडणे आहे....
ज्ञान आणि चारित्र्यसंपन्न मनुष्य घडवणे खऱ्या शिक्षणाचे उद्दिष्ट असते....!!!"
- मार्टिन ल्युथर किंग निग्रो शिक्षणमहर्षी.....
" अण्णा थकत चालले होते, चालायला येत नव्हतं, काठीच्या आधाराने चालायचे, तरीही तरुणपणी कुस्ती आणि लाकूड फोडण्याच्या छंदाने कमावलेली शरीराची मजबूती लपत नव्हती. आता रयतेचा वटवृक्षही एका एका शाखेने बहरत होता. संस्थेत शिकलेली बहुजनांची पोरं आता वेगवेगळ्या क्षेत्रात साहेब झाली होती. हे तर ज्या उद्दिष्टासाठी अण्णांनी आयुष्य समर्पित केलं त्याची फळं बघून समाधान पावायला हवं होतं. एके दिवशी संस्थेत शिकलेल्या काही "उच्चशिक्षित"
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या समोरच्या मैदानात एक कार्यक्रम लावला होता. भला मोठा मंडप वगैरे टाकलेला. कार्यक्रमाची लगबग सुरू झाली होती. मंचावर वेगवेगळे मान्यवर चकाचक होऊन येत होते. कार्यक्रमाला सुरुवात झाली. तेवढ्यात कुठून तरी अण्णा एकटेच हातातल्या काठीच्या आधाराने डुलत डुलत त्या मंडपात येऊ लागले. कुणीतरी मग ओरडले, हातवारे झाले. वक्त्याचे भाषण थांबले. दोघे-तिघे पुढे पळाले. " या या अण्णा या.... चला वरती....."
त्यांच्याकडे वळूनही बघता अण्णा तसेच चालत पुढे आले. शांतपणे सगळ्या मंडपात नजर फिरवली तर मंडपातले लोक सगळे सजूनधजून आलेले. उच्चशिक्षित, काही टायकोटातले, पुढच्या बाजूला अंबाडा घातलेल्या महिलांची डोकी बायकांची डोकी दिसली. आता अंबाडा घातलेल्या बायका तर बहुजनात कुठे दिसत नाहीत. आमच्या बायका तर डोईवर पदर घेतात. मग ह्या ज्या सजूनधजून मंचासमोर बसल्या आहेत त्या कोण आणि का बसल्यात हे ओळखायला अण्णांना वेळ लागला नाही.....
अण्णांची तळपायाची आग मस्तकात गेली. हातातली काठी सावरत अण्णा कडाडले, " का रे रांडच्यांनो.... ह्यासाठी मी उभं आयुष्य खर्च केलं का तुमच्यासाठी?? आणि आता तुम्हाला काष्टा घातलेल्या बायांचं आकर्षण वाटू लागलं का?? कुठायत यात आमच्या पोरीबाळी???"
तर अशा प्रचंड कर्मठ अब्राम्हणी परंपरेचे वारसदार होते. #भाऊरावपायगोंडापाटिल.....उर्फ महाराष्ट्राचे कर्मवीर अण्णा.......!!!! कुणबी - पंचमजैनातून येणाऱ्या अण्णांचे असे बहुजनांच्या मुख्य धारेतून तुटलेपण झाले नाही तर त्या एका मोठ्या अशा परंपरेचे भाग होते अण्णा....!!! बाबासाहेब, शाहूजी महाराज, अण्णा, गाडगेबाबा यांनी फुलेंच्या सत्यशोधकी विचाराला प्रमाण मानले व या विचारांचा विकास पुढे नेण्यासाठी आयुष्य समर्पित केले.
पायगोंडा पाटलांच्या घराण्यात परंपरागतच श्रीमंती होती. लहानपणापासून अण्णा बंडखोर स्वभावाचे होते. त्यांना जसा काही शिक्षणाचा स्पर्श झाला त्या परिसस्पर्श त्यांनी महारमांगामध्ये पहिल्यांदा नेला. मास्तर जसे शिकवायचे ते ग्रहण करून अण्णा महारमांगाच्या मुलांमध्ये घेऊन जायचे. सत्यशोधकी विचारांचा गड असलेल्या कोल्हापूरात जरी असे प्रयोग होत असले तरी हे काम सोपे नव्हते याची त्यांना लवकरच जाणीव झाली....
तरुणपणातच बहुजनांना शिक्षण देण्याच्या महान उद्देशाने ते जीवनदानी बनले. " माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची मुले शिकून तयार होत नाहीत तोवर मी पायात पादत्राण आणि डोईवर शिरस्त्राण घालणार नाही...." अशी प्रचंड कर्मठ, त्यागी आणि समर्पितभावाची शपथ अण्णांनी घेतली आणि #चरिका करणाऱ्या निर्मोही भिक्खूप्रमाणे खांद्यावर पिशवी घेऊन ते निघाले. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यात पायी अण्णा घरी वस्तीगृहात परतायचे...... अर्थात हे नेहमीचंच.....!!!
अण्णांना महाराष्ट्राचे मार्टीन ल्युथर किंग असं ज्यांच्या नावाचं बिरूद सन्मानाने दिलं जातं त्या मार्टिन ल्युथर किंग यांनी निग्रो समाजाच्या शिक्षणासाठी असेच प्रयोग अॅलाबामा मध्ये केले होते. त्यांचंच वरती कोटेशन दिलं आहे.
लक्ष्मीबाई अण्णांची सहचारिणी अण्णांबरोबर अशाच समर्पित भावाने सोबतच चालत राहिल्या. जशी सावित्रीआऊ ज्योतीरावाच्या महान उद्देशात सामिल झाल्या तशा लक्ष्मीआई ही..... जसं सावित्रीआऊला भावाने अवमानित केलं तेव्हा तिने बाणेदारपणे त्याला उत्तर देऊन आपल्या पतीचं कार्य किती महान आहे हे समजावून सांगितले तसे लक्ष्मीआईंनीही माझ्या पतीचं कार्य महान हे भाऊरायाला खडसावून सांगितले. माझ्या रयतेतील मुलं ही माझी आहेत. ती उपाशी झोपवून मी दागिने घालून मिरवू इच्छित नाही. घरासमोरच्या तारेवर दागिने वाळू घालायची जेव्हा माझी परिस्थिती येईल तेंव्हाच माझ्या घरी ये.....
असं उत्तर लक्ष्मीआईंनी मानभावीपणे भावाला दिले.... कसली महान माणसं होती हि ज्यांनी पहिल्यांदा आपल्या सहचारिणीला या महान कार्यासाठी तयार केले आणि कशा त्या आईही होत्या ज्यांनी या उद्देशासाठी आपले जीवन उधळून दिले......!!!!
अण्णांनी जेव्हा मागितलं तसं बहुजनांनी ह्रदयापासून दिलं. कारण मागणाऱ्यावर देणाऱ्याचा विश्वास होता. देणाऱ्याला मागणाऱ्याचा उद्देश समजला होता. आमच्या माढ्याच्या परिसरतलंच उदाहरण द्यायचं झालं तर रयतेनं माढा परिसरात महाविद्यालय उभं करायचं ठरवलं तेव्हा त्याकाळी सत्यशोधकी विचारांनी भारावलेल्या समाजाने हे दान दिलेच. त्या त्या काळाच्याही पिढीचा प्रभाव असतो.
सहकारमहर्षी गणपतराव साठे, जनार्दन वामनराव चव्हाण यांसारखे जमीनदार मराठा, योगीराज कुर्डे सारखे लिंगायत वाण्यातून आलेले दानशूर, आमचे मित्र अमित शिंदे यांचे आजोबा रघुनाथ शिंदे चर्मकार तर कोरबूसारखे बलुतेदारीतले मुसलमान अशा सगळ्या जातीतल्या तात्कालीन लोकांनी जमिनीचे हे दान अण्णांच्या झोळीत टाकले. एवढेच नव्हे तर जनार्दन वामनराव चव्हाण यांच्या नावे माढ्यात भव्य दगडी बांधकामातले वस्तीगृह उभा राहिले. सांगोला तालुक्यात माझ्या आत्याचे सासरे अशिक्षित माणूस लाडकू वाघमारे यांनी मांजरी येथील रयतेच्या हायस्कूलच्या पोरांना खेळायला मैदान हवे म्हणून जमीन बक्षीसपत्र करून दिली. अशा रितीने सगळ्या जातीतील बहुजनांनी आपली स्वतःची शिक्षणसंस्था अशी उभारली.....!!!
कास्ट प्रिव्हेलेजेस काय असतात तर तेही या कार्याच्या आड आलेच नाहीत की.....!!! माढ्याच्या जनार्दन वामनराव चव्हाण वस्तीगृहात शिकून जाऊन नौकऱ्या केलेली अन आता थकलेली काही माणसं अजूनही भेटतात. त्या आठवणीने त्यांच्या थकलेल्या डोळ्यात पाणी दिसते. त्या वस्तीगृहातील जूनाट पत्र्याच्या मोठ्या खोलीत पेटवलेल्या चुलीचा जो आर पडायचा त्यावर रसरशीत भाजलेली मोठी भाकर अन फळूकपाणी म्हणावी अशी दाळ मीही कुस्करून कधीकाळी खाल्लीय त्याची चव अजूनही आठवत राहते.....!!!
बाबासाहेबांनाही संस्थेचं निर्माण करताना जेव्हा आर्थिक अडचणी आल्या तेव्हा तात्कालीन प्रसिद्ध तमासगीर पट्ठे बापूराव जोशींनी अॉफर दिली तीन खेळाचे उत्पन्न आम्ही देऊ तेव्हा बाबासाहेब भयंकर चिडले व पट्ठे बापूरावाला पाठवून दिले तसा प्रयोग अण्णांच्या हातून देणग्या गोळा करताना कधी झाल्याचे उदाहरण नाही. गाडगेबाबांच्या हातून कधी असा प्रयोग झाल्याचे उदाहरण नाही. हे आमच्या महापुरूषांचे बॉन्डेज आहेत.....
किती इन्टररिलेटेड बघा....!!!!
गाडगेबाबांच्या किर्तनात बाबासाहेब सुटाबुटात जमिनीवर बसले आणि गाडगेबाबा जिथं आहेत तिथं अस्वच्छता असणे शक्य नाही असं म्हणाले. साताऱ्याच्या धनिणीच्या बागेत रयतेचं वस्तीगृह चालत होतं तिथं बाबासाहेब गेले पोरांबरोबर जे केलंय ते जेवले आणि कोटाच्या खिशातून चेकबुक काढून चेक देऊन आले व अण्णासाठी गौरवोद्गार काढले.......!!!! हि आहे आमची सत्यशोधकी अब्राम्हणी परंपरा....!!!
आज भांडवली गुणधर्म लागणे अपरिहार्य झाले. ज्यांच्या बापजाद्यांनी जमिनी, पैसा या महान कामासाठी दिला आज त्यांच्या वारसदारांनी मग माळावर जमिनी घेऊन इंजिनिअरिंग, मेडीकल, डिएड बीएड, आयटीआय, लॉ, कृषी महाविद्यालये काढली. पाच सहा हजारावर बंधुआ शिक्षक नेमले. डोनेशन, कॅपिटेशन फिया गोळा करत परत आपलेच निम्नजातवर्गीय जातभाई नागवायला चालू केले. शिक्षणमहर्षी ते शिक्षणसम्राट असा प्रवास कधीच संपलाय.
आता कॅपिटेशन फी घेणारे #कॅपिटलिस्ट असा चालू झालाय. आज रयत देशातील सर्वात मोठ्या संस्थेपैकी एक आहे, आणि जिचा भूतकाळ एवढा महान होता. त्या रयत संस्थेतील जी बडी धेंडं जवखेडा नितीन आगे हत्याकांडात पडद्याआड सापडली.
काय हे अण्णांना सहन झालं असतं.....??? म्हणून क्रांती नीट इस्टॅबिलीश केली नाही तर प्रतिक्रांती परत मानगुटीवर चढून बसायला टपलेलीच असते. हे कॉन्ट्रॅडिक्शन चळवळीतल्या कॅडरला पकडावे लागतात....
#कर्मवीरअण्णांच्यापवित्रस्मृतीसअभिवादन....
#जय_ज्योती
#जय_बळीराजा..........!!!!
karmavir bhaurao patil memory day written by mahendra lankeshawar