झुंड - विद्रोही आहे का?
नागराज मंजुळे दिग्दर्शीत झुंड चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र, झुंड काय आहे? झुंड खरंच सामाजिक प्रश्नावर भाष्य करतो का? आत्तापर्यंत मोठ्या पडद्यावर जे प्रश्न कोणत्याही दिग्दर्शकाने मांडले नाहीत. त्या प्रश्नांना नागराज मंजूळे यांनी वाचा फोडली आहे का वाचा डाॅ विनय काटे यांचे झुंड चित्रपटाबाबतचं मत…
तुमच्या घरात येणारी घरकामवाली स्त्री, जीने एक सुट्टी घेतली तर तुम्ही 50 रुपये पगारातून कापून घेता, ती बाई 8-10 हजारात शहरात स्वतःचे कुटुंब कसे चालवत असेल? आपल्या घरी तर ती बाथरूम वापरत नाही, मग 7-8 तास ती स्वतःची लघवी, मासिक पाळीचा स्त्राव धरून ठेवत काम कशी करत असेल?
भल्या पहाटे थंडी-पावसात तुमच्या घरी दूध, पेपर टाकणारी पोरे महिन्याला 3-4 हजार रुपये कमावून स्वतःच्या घरावर कोणता सोन्याचा कळस चढवत असतील? 200-300 रुपयांच्या पार्लरच्या कामासाठी भली मोठी बॅग सोबत घेवून तुमच्या घरी येणारे अर्बन कंपनीचे ब्युटिशिअन दिवसात किती कॉल करत असतील आणि किती कमावत असतील?अमेझॉन, स्विगी, डंझो वगैरेसाठी मोठाल्या बॅग पाठीला लावून दिवसाला 200-300 रुपयांसाठी उसासे टाकत जिने चढणारे डिलीव्हरी बॉय कुठल्या करीयर ग्रोथची स्वप्ने पाहत असतील?
ओला, सुका कचरा गोळा करणारे आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन उकिरड्यावर, डंपिंग ग्राउंडवर कचरा वेगळा करून त्यातून उपजीविका कमावणारी लहान पोरे, स्त्रिया कुठला हेल्थ इन्शुरन्स विकत घेत असतील? लॉकडाऊन मध्ये आपण जेव्हा घरात बसून काम करत होतो, तेव्हा हे लोक कसलेही उत्पन्न नसताना कसे जगत असतील? यांना कुठलाही PF, पेंशन, नरेगा नसताना ही लोक भविष्याची खात्री कशी ठेवत असतील? शंभर-दोनशे लोकांमध्ये एक सार्वजनिक संडास कसे वापरत असतील? यांच्या झोपड्यात पिण्याचे पाणी कसे येत असेल? यांच्या पोरांना लाख रुपये वर्षाला देवून मिळणारे चांगले शिक्षण मिळत असेल का? नोकरी गेली म्हणून कुणाला डिप्रेशन आले तर हे लोक मानसोपचार तज्ज्ञांची हजारो रुपयांची ट्रीटमेंट कुठे घेत असतील?
शहरी गरीबी हे भारताचे धगधगते वास्तव आहे ज्याकडे इथल्या प्रत्येक सरकारने आणि व्यवस्थेने दुर्लक्ष केले आहे. 2009 साली आपल्या देशात 25% शहरात राहणारे लोक दारिद्र्य रेषेखाली होते. 2030 पर्यंत भारतातील 50% लोक शहरात राहत असतील, आणि सध्याची विषमता पाहता कदाचित त्यात गरिबांची संख्या 30% पेक्षा जास्त असेल. ही आर्थिक विषमता येत्या काळात खूप मोठे सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर प्रश्न निर्माण करणार आहे.
टोलेजंग इमारतींच्या कडेने बसणाऱ्या बकाल झोपडपट्टी हा व्यवस्थेने संधी नाकारलेल्या, सामावून न घेतलेल्या सर्व जाती-धर्मातील लोकांचा एक समूह असतो. चार्ल्स डार्विन म्हणतो. "गरिबांची दुर्दशा ही नैसर्गिक कारणाने न होता आपल्या व्यवस्थांमुळे होत असेल, तर ते आपले महापाप आहे".
एखाद्या ठिकाणी बकाल झोपडपट्टी उभी राहणे हे आपले पाप आहे, आणि हे पाप उंच भिंती बांधून झोपडपट्टी नजरेआड करून संपणारे नाही. इथे मने मोठी करावी लागतील आणि भिंती छोट्या कराव्या लागतील.
नागराजचा "झुंड" आपल्या पापाची जाणीव करून देणारी आणि त्याचे सकारात्मक समाधान सांगणारी एक अस्सल कलाकृती आहे. जिथे शोषण ही संस्कृती असते, तिथे माणुसकीचे गाणे म्हणणे हा विद्रोह असतो! नागराज माणुसकीचे गाणे गातो आहे... मनातला माणूस जागा करून फक्त ऐकायचा प्रयत्न करा... झुंड माणुसकीला उभारी देणारे एक सुंदर गीत आहे.