नेहरु खरंच वाईट होते का? - संजय आवटे
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी सोशल मीडियावर अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. पण नेहरु खरंच वाईट होते का? लोकांच्या आयुष्यात पंडित नेहरु यांचे स्थान काय होते? यावर पंडित नेहरु यांच्या स्मृतिदिनानिमीत्त ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी नेहरुंच्या प्रभावाचा घेतलेला वेध....
१९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी नेहरु बंगालमधील खरगपूरमध्ये गेले होते. विविध जात-धर्म-भाषांचे लोक असणारं हे शहर. नेहरुंनीच १९५१ मध्ये तिथं स्थापन केलेलं आयआयटी. नेहरुंच्या त्या सभेला प्रचंड गर्दी होती. तेलुगू भाषक महिलांचा एक ग्रुपही सभा ऐकायला आला होता. त्यातली एक महिला गरोदर होती. तरीही ती आली होती. नेहरुंना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी. सभा सुरु असतानाच त्या महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या. मग इतर महिलांनी तिच्याभोवती कडं केलं. तिचं बाळंतपण सुखरुप झालं. जन्माला आलेल्या बाळाचं नाव अर्थातच 'जवाहर' ठेवलं गेलं. हे आहेत नेहरू!
त्या देशाची कल्पना करा...! आजच्यापेक्षा कैकपट भयंकर स्थिती होती तेव्हा बंगालचा दुष्काळ आणि फाळणी, सोबत प्रलयंकर दंगली अशा आपत्तींचा सामना करणा-या नवजात देशाची कल्पना करा. निर्वासितांचे लोंढे आणि क्लेशकारक स्थलांतर यामुळे पिचून गेलेल्या देशाची तुम्ही कल्पना करा. या देशाचे काय झाले असते? निराशेच्या गर्तेत तो कोसळला असता. कदाचित हुकुमशाहीकडे गेला असता. मात्र, हा सारा हिंसाचार होऊनही नेहरुंच्या काळातील भारताला आशेचा निरागस स्पर्श झाला होता. भारतीयांना असे वाटत होते की, अशक्य ते आपण शक्य करुन दाखवले आहे. (साक्षात स्वातंत्र्य मिळवले आहे!) आताही आपण सर्व आव्हानांवर मात करु.
ते नेहरु होते, ज्यांनी अवघ्या भारतीयांच्या मनात ही आशेची पणती प्रकाशमान केली होती. नागरिकत्वाच्या आत्मविश्वासासोबत एक आधुनिकताही दिली होती.
नेहरुंनी त्या पिढीला आशा आणि विश्वासातून प्रेरणा दिली. खरे तर स्वातंत्र्यानंतरची ती पहिली दशके होती, ज्याला भारतीय शतक म्हणता येईल. कारण 'भारतीय' म्हणजे काहीतरी खास आहे, हे भान नेहरुंनी दिले. निरागस स्वप्नांचा पाठलाग एखादा साधा माणूस करत असतो, तेव्हा त्याच्या गाठोड्यात अवघ्या चांगुलपणाची पुण्याई असते. धनदांडगे, धर्मांध लांडगे त्याची वाट अडवतात, पण कोणालाही न जुमानता आमचा साधा माणूसच जिंकतो, हा विश्वास नेहरुंनी भारताबद्दल निर्माण केला होता. आणि, त्यांच्याच सूत्रानुसार, अवघ्या भारतीयांमध्ये!
प्रा. शिव विश्वनाथन म्हणतात, ते खरंय.
नेहरू हे एक स्वप्न होते.
एक आशा होती.
निरागसतेला मिळालेला तो चेहरा होता.
आधुनिकतेला दिमाख मिळवून देणारी ती सौंदर्यदृष्टी होती. हेच तर कारण होते, ज्यामुळे गांधींनी नेहरुंची निवड केली. स्वातंत्र्यानंतर देश घडवायचा तर अशा स्वप्नाळू पण वैश्विक भान असलेल्या नेहरुंची गरज आहे, हे व्यवहारी गांधींना उमजले होते. विकास अथवा नियोजन हे रुक्ष समाजशास्त्राने दिलेले कंटाळवाणे शब्द खरेच, पण नेहरुंनी त्याला कवितेचा स्पर्श दिला. आणि, पहिल्या दशकाचे हे काव्यच तर होते, ज्याने आशा आणि स्वप्न यांना जिवंत ठेवले.
राजकपूरसारख्या निळ्या डोळ्यांच्या जादूगाराने आपल्या पोतडीतून जे जे बाहेर काढले, ते सारे या काळाचेच अपत्य होते. नेहरुंनी दाखवलेलं स्वप्न, तीच निरागसता, साध्या माणसाच्या मनातला उत्तुंग आमविश्वास हे सगळं तेव्हा सिनेमात येत होतं. कृष्णधवल पडद्यावरच्या प्रतिमांना नेहरु युगानं शब्द दिले. शब्दाला अर्थ दिला. अर्थांना रंग दिले.
'मेरा जूता है जापानी,
ये पतलून इंग्लिशस्तानी,
सर पे लाल टोपी रुसी,
फिर भी दिल है हिंदुस्थानी' असं 'श्री ४२०' मध्ये म्हणणारा राज कपूर ही नेहरुंची 'आयडिया ऑफ इंडिया'च तर होती. नासेर आणि टिटोंसोबत अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी करत 'आंतरराष्ट्रीयवाद' सांगणारे आणि तरीही आतून भारतीय असलेले नेहरुच असे स्वप्न देऊ शकतात. एरव्ही, 'श्री ४२०' हा सिनेमा कधीचा? जागतिकीकरणापूर्वीचा आणि पहिली सार्वत्रिक निवडणूकही अद्याप व्हायची होती, तेव्हाचा. त्यावेळी हे शब्द सुचावेत, यामागची प्रेरणा स्वाभाविक होती. 'चलना जीवन की कहानी, रुकना मौत की निशानी', असं मुकेशच्या आवाजात ऐकताना, लोकांनी ते किती रिलेट केलं असेल!
भारत म्हणजे तुम्ही आणि तुम्ही म्हणजे भारत, हे नेहरु सांगत होते आणि या अद्वैतानं प्रत्येकजण तीच उमेद घेऊन जगत होता. आपापतः भारतही त्याच अंगभूत उमेदीनं झेपावत होता. 'हम सिंघासन पर जा बैठे, जब जब करे इरादे' हा आत्मविश्वास त्यातूनच तर येत होता! वाट खडतर आहे, पण आपण ती पार करु, या उमेदीनं भारतीय निघालेले होते. याच वाटेवरुन चालण्याचा प्रयत्न सिनेमा करत होता.
'तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा,
इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा'
हे गाणं ज्या 'धूल का फूल'मध्ये आहे, त्याचे दिग्दर्शक यश चोप्रा जाहीरपणे म्हणाले होते, "हा सिनेमा आला १९५९ मध्ये. तेव्हा मी २७ वर्षांचा होता. पण, धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता या नेहरुंच्या मूल्यांनी आम्हा तरुणांना अक्षरशः झपाटून टाकले होते. तीच स्वप्नं आम्हीही बघत होतो!" ख्वाजा अहमद अब्बास यांनी लिहिलेले 'जागते रहो', 'आवारा' अथवा बी. आर. चोप्रांचा 'नया दौर'बघा. तीच आशा. तीच उमेद. हे तर काहीच नाही. १९५४ च्या 'जागृती' मध्ये मोहम्मद रफीच्या आवाजात 'हम लाये है तुफान से किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चो संभालके...' हे गाणं सुरु होतं. आणि, गांधी-नेहरुंच्या प्रतिमा कॅमेरा झूम करुन दाखवू लागतो. कोणत्या वादळातून ही नौका इथवर आणलीय, हे त्या पिढीला नीटपणे माहीत होतं. सिनेमा तेच चित्रित करत होता...
काय केलं नेहरूंनी?
'कलेनं, साहित्यानं, विज्ञानानं मला घडवलं', असं नेहरु म्हणत. टागोरांचा अमिट ठसा नेहरुंवर. म्हणूनच आयआयटी, आयआयएस उभ्या करतानाच संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, ललित कला अकादमी, पुण्याची एफटीआयआय या संस्थाही नेहरु उभारत होते. उद्याचा भारत कोणत्या दिशेनं जाणार आहे, याची नेहरुंना कल्पना होती. स्वातंत्र्यानंतर अवघ्या बारा दिवसांनी आण्विक ऊर्जा संशोधन मंडळाची बैठक नेहरु बोलावत होते. असे करणारे नेहरु एकटे नव्हते. जगात सर्वत्र तेच चालले होते. नेहरु त्या जगासोबत होते. इंग्लंडने असे प्रयोग सुरु केले होते. तिकडे फ्रान्सनेही त्यासाठी आपल्या प्रयोगशाळा अहोरात्र सुरु ठेवल्या होत्या. रशिया अजिबातच मागे नव्हता. हिरोशिमा-नागासकीवर आण्विक बॉम्बस्फोट करणारी अमेरिकाही समजून चुकली होती की, हा रस्ता खरा नाही. अणूचा उपयोग शांततामय कारणासाठी झाला पाहिजे, हे सर्वांना समजत होते. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेने दुस-या महायुद्धात अणुबॉम्ब टाकून, बेटांवर वसलेली दोन टुमदार शहरं बेचिराख करुन टाकली. दीड लाख लोकांनी प्राण गमावले आणि कायमचे अपंगत्व कितींना आले, याची गणती नाही.
दुस-या महायुद्धाने आण्विक सामर्थ्याचा विध्वंसक प्रत्यय दिला हे खरे, पण त्यानंतरच त्याच्या विधायक क्षमतेचा अंदाज जगाला येऊ लागला. जगदीशचंद्र बोस तेव्हा, नेहरुंनीच स्थापन केलेल्या, बंगळुरुच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस'चे संचालक होते. त्यांनी या दिशेने काम सुरु केलेले असताना, तिकडे विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सांगत होत्या की आण्विक ऊर्जा ही उद्याच्या अर्थकारणाची कळ ठरणार आहे. वातावरण असे भारलेले होते. देशाच्या उभारणीच्या काळात सलग १७ वर्षे नेहरुंसारखे पंतप्रधान लाभणे हीच भारताच्या अभ्युदयाची आशा होती. म्हणून आजचा भारत नेहरूंचा आहे! पण, उद्याही तो नेहरूंचा असेल का?
२७ मे/ #नेहरू_पुण्यतिथी
संदर्भः
१. संजय आवटेः ('We The Change- आम्ही भारताचे लोक')
२. डॉ. रामचंद्र गुहाः 'Patriots and Pakistan' आणि 'India After Gandhi'
३. प्रा. शिव विश्वनाथन यांचा लेख)