नवऱ्याने प्रियकर आणि बायकोने प्रेयसी होणं शक्य आहे का?

माणूस एकापेक्षा जास्त लग्न का करतो? लीव-इन-रिलेशन आधुनिक आहे की प्राचीन?हेलिकॉप्टर parenting म्हणजे काय? लग्न आणि शरीर सुखाचा भर ओसरल्यावर काय होते? लग्न संस्था कोण झुगारू शकते?तुमच्या आमच्या भोवतलच्या जोडप्यांच्या मनातील भावनांचा वेध घेतला आहे गौरी साळवेकर यांनी.....

Update: 2022-10-27 07:55 GMT

ताराबलं चंद्रबलंत....

आज या मंत्राशी जोडल्या गेलेल्या जोडप्यांचा,म्हणजेच विवाहित जोडप्यांचा खास दिवस. माणूस एकदा आणि गरज पडल्यास एकापेक्षा जास्त वेळा लग्न का करतो? हा प्रश्न समोर आला की काही वर्षे नव्हे तर काही हजार वर्षे मागे जावं लागेल.

शेतकी व्यवस्थेने साठा -मालकी- वारस-कुटुंबसंस्था अस्तित्वात आणली आणि त्यासोबत जन्माला आल्या त्या अनुषंगाने येणाऱ्या भावभावना ,व्यवस्था आणि त्याचे फायदेतोटे. सुरुवातीला इतर टोळ्यांपासून संरक्षण मिळावं म्हणून स्त्री पुरुष एकत्र राहायला लागले. जो बलवान त्याला स्त्रीसुख अशी पद्धत टोळीत असल्याने कमकुवत लोकांनाही ते मिळावं या हेतूने अगदी प्राथमिक विवाहसंस्था किंवा तेव्हाच लिव्ह इन अस्तित्वात आल असावं. नंतर शेती व शेतीप्रधान उद्योग करायला जास्तीचे हात हवेत म्हणून ,संचय झाला तसा त्याला वारस हवा म्हणून कुटुंब निर्मितीकडे वळले असावेत. नंतर धर्म आणि चलन अस्तित्वात आलं आणि याला धार्मिक ,सांस्कृतिक व आर्थिक आयाम मिळाले.

माणसं इकडून तिकडे स्थलांतर करू लागली,त्या त्या प्रदेशातील भौगोलिक वैशिष्ट्य, जनुक, व्यवसाय इत्यादी वरून वंश, जाती ठरायला लागल्यावर यात यांचा प्रवेश होणं अपरिहार्यच होतं. काळानुसार ,परिस्थितीनुसार या संस्थेचे स्वतःचे असे काही नियम बनत गेले. तेच प्रमाण आहेत अस मानलं जाऊ लागलं आणि त्यात काही त्रुटी असू शकतात हे नाकारलं गेलं.

लग्न का करायचं याचं उत्तर उन्नत समाजात लैंगिक प्रेरणा व वंशसातत्य या महत्वाच्या कारणासह 'घरात करायला कुणीतरी हवं, उतारवयात सोबत हवी, शारीरिक गरजांची पूर्तता दरवेळी बाहेर जाऊन कशी करणार? ते "आपलं' कुणीतरी हवं इथपर्यंत येऊन थांबली.


 



लग्न दोन कुटुंबांचं असतं या गोंडस वाक्याला प्रमाण मानून compatibility ची व्याख्या 90%वेळा जात व पैसा व पत्रिका याभोवती फिरत राहिली. रूप,गुण,उंची,सामाजिक स्तर आणि नोकरी यापलीकडे काही महत्वाचे घटक असतात सत्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला गेला. आणि कित्येक जोडप्यांच्या आयुष्यात न भरणाऱ्या जखमा निर्माण झाल्या याची गणतीच नाही.

हे सगळं बघूच नये असं म्हणणं नाही पण माणूस यापलीकडे असतो आणि त्याचा पूर्ण अंदाज लग्न झाल्याशिवाय येत नाही हे खरं असलं तरी निवडच फार तोकड्या आणि तडजोड करता येईल अशा मुद्द्यांवर होतेय हे नाकारून कसं चालेल?

सोबत हवीच म्हणून माणसं लग्न करतात.शरीरसुखाचा पहिला भर ओसरला की नंतर बहुतांश लोक एकेकटी पडत जातात किंवा मुलांमध्ये सुख शोधतात. म्हणजे अगदी डिप्रेशन मध्ये जातात अस म्हणणं नाही. पण साहचर्य फक्त बिलं भरणं, उरकल्यासारखं एकमेकांना सुख देणं, हफ्ते भरणं ,आजारी पडल्यावर कर्तव्य निभावणं आणि आठवड्यातून एकदा बाहेर जेवण करणं यापलीकडे उरत नाही.

त्यात , जोडीदारांच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतील, एक जोडीदार बुद्धिमान आणि दुसरा मठ्ठ (शिक्षणाने नव्हे) असेल तर नात्याला तडा जाण्यासाठी विशेष काहीही करावं लागत नाही. इथे मी मुद्दामच अगदी टोकाला गेलेल्या ,टिकण्याची कुठलीही शक्यता नसणाऱ्या किंवा marital abuse असेल अशा नात्याबद्दल बोलायचं टाळते आहे ,नाहीतर विषय भरकटत जाईल. मी सर्वसामान्य म्हणता येईल अशा जोडप्यांच्या संदर्भात बोलते आहे. आपलं वैवाहिक जीवन ही टोकाला गेलेली नाती आणि बागवान/तू तिथं मी टाइप जोडपी याच्या अध्ये मध्ये कुठेतरी असतं.

नातं नकोसं असतं पण वेगळं होण्यासाठी कुठलंही व्हॅलीड कारण नसतं , समाज काय म्हणेल ही भीती असते आणि पुढच्या आयुष्याचा प्रश्न सतावत असतो म्हणून ते हवं देखील असतं असा विचित्र तिढा असतो. दोन पिढ्या आधीपर्यंत स्त्रिया आर्थिक दृष्ट्या फारशा स्वावलंबी नव्हत्या म्हणून, सामाजिक सुरक्षितता हवी म्हणून, पुरुषांनाही सामाजिक प्रतिष्ठा जपायची म्हणून अशी 70%लग्न टिकली. बाकी आर्थिक चणचण, जास्तीच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या या रेट्यात देखील समरसून संसार करणारी जोडपी असतातच की.

अध्यात्म समजवून सांगताना याज्ञवल्क्य ऋषी आपल्या पत्नीला मैत्रेयीला सांगतात नवऱ्याला किंवा बायकोला आपला जोडीदार त्यांच्या नव्हे तर स्वतःच्या प्रयोजनासाठी प्रिय असतो. हे खरं आहे असं गृहीत धरलं तर ते प्रयोजन या काळात नेमकं काय आहे याचा शोध प्रत्येकाला घ्यावा लागेल. एकदा का ते समजलं की नातं टिकवण्यासाठी बेगडी कारणांची गरज उरत नाही.

समाज उन्नत होताना प्रेरणा मागील कारण बदलत जातं .यामुळेच वंशसातत्य आणि सेक्स यासाठी लग्नात अडकण्याचे दिवस आता मागे पडत चाललेत.त्यामुळेच लग्न झालंच पाहिजे ,कुठून केलं ? पासून लग्न झालंच पाहिजे का? इथपर्यंत आपण आपल्याही नकळत प्रवास केला आहे . जगण्यासाठी बळ देऊ शकणाऱ्या या नात्यात माणसं सदैव दुःखी राहतात, पंचवीस तीस वर्षांपूर्वी झालेले अपमान,ओरखडे रोजच्या जगण्यात आणून समोरच्याला आपल्यापासून अधिकाधिक दूर करत राहतात, एकमेकांना फसवत राहतात, चुकतो तो फक्त समोरचा ,सुधारायचं ते फक्त समोरच्याने अस म्हणत रडीचा डाव खेळत राहतात.




 


बायको घराची 'आई' व्हायच्या नादात नवऱ्यासह सगळ्यांच हेलिकॉप्टर parenting करत आपली सत्ता कायम राहावी म्हणून धडपडत राहते तर ,नवरा आपण फक्त लग्न केलं पण संसार आपला नसतोच हे सोयीस्करपणे स्वतःला पटवून सत्ता स्वतःकडे राहावी यासाठी आपल्या कर्तव्यभावनेच कार्ड कॅश करत राहतो. नात्यातली सत्ता ही न वापरण्यासाठी असते आणि ती दुसऱ्या व्यक्तीला वापरायला लागूही नये ही जाणीव दुर्दैवाने दोन्ही बाजूला अनेकदा नसते.

म्हणायला एकत्र ,एका छताखाली राहत असतात .सुकलेलं परंतु प्राण शिल्लक असलेल रोपटं धड वाढतही नाही आणि धड मरतही नाही असं काहीसं हे नातं उपटून टाकण्याचं धाडस ना तिच्यात असतं ना त्याच्यात. नवऱ्याने प्रियकर व्हावं आणि बायकोने प्रेयसी हे लिहायला वाचायला छान असलं तरी प्रत्यक्षात व्यवहार्य नसतं कारण भूमिकाच तशा नसतात.

या सगळ्यात भर घालायला सोशल मीडिया हाताशी असतोच.नवरा बायकोचे खाजगी संवाद , महत्वाच्या चार क्रिया सोडून बाकी सगळ्या गोष्टींचा इव्हेंट केलेले फोटो,आम्ही एकमेकांवर किनई खुप म्हणजे खूप प्रेम करतो लब्यु !याची वारंवार(हा शब्द महत्वाचा) जगाला दिलेली ग्वाही बघितली की आपोआपच काही नरेटिव्ह सेट होतात आणि आपण यातला किती भाग खरा आणि किती देखाव्याचा याची अजिबात शहानिशा न करता त्या फुटपट्ट्या स्वतःला लावत बसतो.

शिवाय,माझ्या म्हणजे 40 ते 55 मध्ये असणाऱ्या पिढीत एक समज प्रचलित होतोय की प्रेम व सेक्स या वेगळ्या गोष्टी आहेत.मला जिथून जे मिळेल ते मी तिथून घेईन. एकदा का तुम्ही या कॅटेगरी वेगळ्या केल्या की नात्यातील गांभीर्य पार संपून जातं. एक नातं झालं की दुसरं, तिसरं,चौथ... तहान संपतच नाही.

अगदी अपवादात्मक स्थितीमध्ये कुणात गुंतणे हा भाग एकवेळ समजून घेता येईल.पण Polygamy असते ,होती हे मान्य करण्यासाठी आपण polygamus होण्याची गरज नसते आणि व्हायचं असेलच तर विवाहसंस्था झुगारून देण्याचं धाडस अंगी हवं. आधीच सुकलेल्या नात्याला अशा बाह्य कारणांनी तडे न गेले तरच नवल.

एकमेकांची जीवनदृष्टी, पालकत्वाच्या कल्पना , वास्तववादी अपेक्षा ,जोडीदाराचा पिंड, त्याची स्वप्न ,ध्येय आणि त्याचं दुःख (कारण सुखापेक्षा दुःख तुम्हाला अधिक जवळ आणत) आणि तुमच्या प्रेरणा या सगळ्या गोष्टीचा नात्यावर सगळ्यात जास्त प्रभाव पडत असतो. हे सगळं जाणून घेण्यासाठी नात्यात मैत्र हवं...मैत्र असेल तर वादळ असो की ऊन नात्यातला चैत्र अबाधित राहतो. इतकं भाग्यवान प्रत्येकजण नसेल पण किमानपक्षी हे नातं ज्या एका शब्दाच्या आधारावर तग धरून असतं -तडजोड ती करताना कोणत्या मुद्द्यावर केली जातेय,त्यामागे तडफड आणि तळतळाट आहेत की तृप्ती आणि स्वीकार हे जरूर तपासून बघावं. एकमेकांची व्यावसायिक,वैयक्तिक ध्येय वेगळी असली तरी कौटुंबिक ध्येय एक असली की या तडजोडीचा त्रास होत नाही.

लग्नसंस्था मानवी शरीराची गरज पुरी करत असेल यात वाद नाही पण या संस्थेची खरी मानसिक गरज वय पन्नास ते माणूस जिवंत असेपर्यंत आहे यात कुणाचंही दुमत नसेल पण त्यासाठी

अजुनी फुले फुलतात ना
हे रंगही खुलतात ना?
धुमसून का जळतात हे
अजुनी मने जुळतात ना?
अजुनी मनातील स्पंदने
माझी तुला कळतात ना?
हे एकमेकांना विचारता तर यायला हवं!

गौरी साळवेकर

Tags:    

Similar News