नेहरूंची एवढी भीती का वाटते? - संजय आवटे
गेल्या काही काळापासून केंद्रात बसलेल्या भाजप सरकारकडून देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यावर सातत्याने इतिहासातील चुकांचं खापर फोडलं जातंय. सतत त्यांच्याविरोधात संसदेत भाषणं दिली जात आहेत. नेहरू आणि त्यांचं धोरण कसं चुकीचं होतं हे जनतेच्या मनावर नानाविध प्रकारे बिंबवलं जातंय. पण सध्या हे सगळं करण्याचं कारण काय? जाणून घेण्यासाठी वाचा ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा हा लेख...
इतिहासाचा पुरावा पाहा. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची तयारी सुरु होती आणि नेहरु 'नियतीशी करार' करु पाहात होते, तेव्हा 'आरएसएस'च्या मुखपत्राने 'ऑर्गनायझर'ने लिहिले होते- 'ज्यांना केवळ चुकून नशिबाचा हात मिळाल्यामुळे सत्ता मिळाली आहे, ते आमच्या हातात तिरंगा देतीलही कदाचित, पण अशा झेंड्याला हिंदूंकडून कधीच आदर आणि मान्यता मिळणार नाही. मुळात तिरंगा हा शब्दच दुष्ट आहे. तीन रंग असलेल्या या ध्वजामुळे अनिष्ट परिणाम होतील. कारण, तीन हा आकडा अशुभ आहे. हा ध्वज देशासाठी घातक आहे.'
आज हे आम्हाला देशभक्ती शिकवताहेत!
हा देश उभा राहिला, झेपावला. कारण, नेहरूंनी या देशाला स्वप्न दिलं. आशा दिली. आकांक्षा दिली. दृष्टी दिली. नियोजनाची बैठक दिली.
नेहरूंचं अधिष्ठानच वेगळं होतं.
१९३६-३७ च्या प्रांतिक निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी नेहरुंनी अवघा देश पालथा घातला. ते देशाचे डार्लिंग होते. त्यामुळे उदंड सभा त्यांनी घेतल्या.
नेहरु सभास्थानी पोहोचताच लोक त्यांचा जयजयकार करत. क्वचित, 'भारतमाता की जय' अशी गर्जना करत. नेहरु तिथं गेल्यावर लोकांशी संवाद साधत. भाषणाचं स्वरुप 'मन की बात' असं नसे! तर असं असे की, जणू श्रोते आणि नेते यांच्यात संवाद सुरु आहे. गप्पा सुरू आहेत.
'भारतमाता की जय' अशी गर्जना ऐकून नेहरु मिस्किलपणे लोकांना विचारत, 'काय अर्थ आहे बरं या घोषणेचा?'
लोकांनी सवयीने दिलेली घोषणा. एकदम अर्थ विचारल्यानं लोक चिडीचूप होत. बुचकाळ्यात पडत.
एखादा शेतकरी म्हणे, 'भारतमाता म्हणजे ही धरित्री. ही सुंदर धरणीमाता.'
नेहरु पुन्हा विचारत, 'जमीन? कुठली जमीन? तुमच्या शेतातली जमीन, या गावातली जमीन की त्या गावातली? आणि, फक्त जमीनच का?'
अशी प्रश्नोत्तरे चालत.
मग शेवटी अधीर होऊन लोक म्हणत, तुम्हीच सांगा.
नेहरु मग सांगण्याचा प्रयत्न करत.
"तुम्ही समजता तशी भारतमाता म्हणजे ही जमीन आहेच. भारतातील पर्वत आहेत. नद्या आहेत. जंगल आहे. शेती आहे. गाईगुरे आहेत. पशुपक्षी आहेत. खळाळणारे झरे आहेत. विहिरी आहेत. सगळे आहे. हे सारेच आपल्याला प्रिय आहे. पण, भारतमाता म्हणजे तुम्ही सगळे आहात. मी आहे. अवघी भारतीय जनता आहे. तुमच्या-माझ्यासारखे करोडो लोक आहेत. भारतमातेचा जय म्हणजे या कोट्यवधी बंधू-भगिनींचा विजय. तुमच्यात भारतमाता आहे. भारतमातेत तुम्ही आहात. तुम्ही स्वतः मूर्तिमंत भारतमाता आहात. तुमचा विजय झाल्याशिवाय भारतमातेचा विजय अशक्य आहे. आणि, भारतमातेच्या विजयाशिवाय तुम्हाला विजय मिळणे अशक्य आहे."
"तुमच्या अंगावर कपडा नसेल, घरातील बाळाला खायला दोन वेळचे अन्न नसेल, तुमच्यावर अत्याचार होत असतील, तर भारतमातेचा जय कसा होईल? शिवाय, प्रत्येकाची भारतमाता एकसारखीच दिसली पाहिजे, अशीही गरज नाही. इथे चाळीस कोटी भारतमाता आहेत!"
नेहरु म्हणाले ते १९३७ मध्ये. आज हे मला का आठवतं आहे?
'भारतीयता तो नागरिकता है! हिंदुत्वही राष्ट्रीयता है!!', अशा विचारांचा नारा देत १९२५ मध्ये विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. हे राष्ट्र हिंदूंचे आहे आणि इतरांनी ते मान्य करुन मुकाट राहावे, अशी भूमिका ज्यांची असेल, त्यांना भारताचा 'हिंदू पाकिस्तान' करायचा आहे! अशांपासून सावध राहावे लागणार आहे.
पुन्हा हिंदू म्हणताना ब्राह्मण, मांग, कोळी, साळी एका रांगेत असे नाहीच. ती उतरंड पुन्हा वेगळी आहेच!
"जातीयता ही युरोपातल्या फॅसिझमची भारतीय आवृत्ती आहे. सध्या देशात फॅसिझमची लाट वेगाने पसरते आहे. फॅसिस्ट संघटनांचे विचार आणि कार्यपद्धती आता काही हिंदू संघटनांनाही प्रिय होत चालली आहे. हिंदूराष्ट्राची मागणी हे तिचेच मूर्त रुप आहे. फॅसिझमचे हे तत्त्वज्ञान त्यांनी जर्मनींच्या नाझींकडून घेतले आहे," असे नेहरु तेव्हाच म्हणाले होते.
आजचा भारत नेहरूंचा आहे आणि नेहरू भारताचे आहेत.
पण, फॅसिस्टांचा विरोध आहे तो याच नेहरूंच्या भारताला. म्हणून, 'नेहरू' असा शब्द उच्चारला, तरी त्यांचे डोके फिरते. मग नेहरूंच्या बदनामीसाठी त्यांची टोळी सरसावते.
'नेहरूंऐवजी सरदार पटेलच पंतप्रधान व्हायला हवे होते', असे म्हणणा-या या टोळीला माहीत नाही का, की पटेल १९५० मध्ये, म्हणजे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीच काळाच्या पडद्याआड गेले. आणि, मुळात पटेल वा नेहरू, कोणाला पंतप्रधान करायचे, हा कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्न होता. ज्याप्रमाणे गांधींनी बाबासाहेबांना राज्यघटनेचे शिल्पकार केले, तसेच त्यांनी नेहरूंना पंतप्रधान केले. आणि, कॉंग्रेसला गांधींचे हे द्रष्टेपण ठाऊक होते. त्याचा तुम्हाला का त्रास?
देशात सध्या आहेत ते मुस्लिम ज्यांना सहन होत नाहीत, ते आज अखंड भारताची भाषा करतात. अरे, पाकिस्तान - बांग्लादेश दोन्ही भारतात असते, तर तुम्ही लोकांनी काय केले असते? फाळणी टाळण्याचा प्रयत्न गांधी आणि नेहरूंनी किती केला, हे यांना माहीत नसते, असे नाही. पण, उगाच बदनामी करत राहायची. मग नको ते मुद्दे उपस्थित करायचे!
गोमूत्राने अभ्यंगस्नान करणा-यांना खरा त्रास असतो तो नेहरूंनी या फॅसिस्टांना ठोकले आणि धर्मनिरपेक्षतेच्या, विज्ञानाच्या, कलासक्त संस्कृतीच्या पायावर आधुनिक भारताला उभारले!
नेहरू म्हणजे काही असे पंतप्रधान नव्हते, ज्यांना पत्रकार परिषद घ्यायचीही भीतीही वाटायची! उलट आपल्यावर प्रचंड टीका करणा-या आणि आपल्याला 'गाढव' म्हणणा-या, आपल्याला 'नागडा' रेखाटणा-या शंकरसारख्या व्यंगचित्रकारालाही त्यांनी सांगितले होते - 'डोन्ट स्पेअर मी ... हवं तसं ठोकत राहा मला!'
नेहरूंनी फाळणीपासून चीनपर्यंत आणि काश्मीरपासून ते सोव्हिएत रशियाबद्दल सगळ्या मुद्द्यांवर जाहीर भाषणं केली आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते नियमित पत्रं लिहायचे. त्यातही या विषयी त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. प्रत्येक प्रश्नावर नेहरूंची मांडणी अगदी मुद्देसूद आहे. कोणतेही मत बनवण्यापूर्वी ते वाचा ना! मग समजेल, १९६२ मध्ये भारत चीनकडून पराभूत झाला, हे खरे. पण, नेहरू होते म्हणूनच १९६२ पर्यंत भारत कोणत्याही आक्रमणापासून सुरक्षित राहिला आणि चीनविरुद्धच्या पराभवानंतर धडा घेत १९६५ आणि १९७१ च्या युद्धात जिंकला. नाहीतर, सोव्हिएत रशिया, अमेरिका, चीन अशा देशांनी भारत कधीच गिळंकृत करून टाकला असता!
नेहरू गेले तरी पाकिस्तानची राज्यघटना आणखी तयार होत नव्हती. सार्वत्रिक निवडणूक तर दूरचीच गोष्ट. तोवर, नेहरूंनी हा देश शब्दशः 'उभा' केला होता! पाकिस्तान कोसळला. अंधाराच्या गर्तेत गेला. भारत मात्र झेपावला.
आजचा मुद्दा एवढाच आहे की, संघवाल्यांचा आणि 'भक्तां'चा नेहरू हा क्रमांक एकचा शत्रू का आहे, हे ओळखले पाहिजे. नेहरू असल्यामुळेच त्यांना या देशाचा 'हिंदू पाकिस्तान' करता आला नाही. आणि, नेहरूंमुळेच त्यांचे आडाखे पूर्ण होऊ शकले नाहीत.
'हा देश नेहरूंचा की फॅसिस्ट धर्मांधांचा?' असा प्रश्न उपस्थित झालेला असताना, नेहरूंचा वारसा बुलंद केला पाहिजे.
(संदर्भः संजय आवटेः
'We The Change - आम्ही भारताचे लोक')