'आदर्शवादाचा भ्रमनिरास'
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झालेल्या मात्र आता राज ठाकरे यांच्या भाजपधार्जिण्या भुमिका यांमुळे भ्रमनिरास झालेल्या जेष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर यांचा लेख...;
पत्रकारितेच्या खाजेतून ठाण्यातून एका मित्राच्या सहकार्याने काही वर्षे एक साप्ताहिक मी प्रकाशित करायचो.त्या काळातील हा फोटो आहे.तेव्हा राज ठाकरे शिवसेनेची बुलंद तोफ होते.ठाण्याला सेंट्रल मैदानात त्यांची एक जाहीर सभा होणार होती आणि त्यानिमित्ताने मी एक विशेष लेख लिहिला होता.तो अंक मी त्यांना नेवून दाखवला.त्यांनी तो लेख उभ्याउभ्याच वाचला आणि आवडल्याचंही सांगितलं. पत्रकारितेची त्यांची समज,ज्ञान उत्तम असल्याने अंकासंबंधी त्यांनी थोडक्यात काही सूचनाही केल्या. अजूनही त्यांच्यासोबतचे काही जुने फोटो आहेत पण ते आता सापडत नाहीयेत. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे राज ठाकरे पहिल्यापासून आवडत होते.त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष काढला,त्या नंतर महाराष्ट्र आणि मराठी माणसासंदर्भात काही ठोस भूमिका घेतल्या त्याही काही प्रमाणात पटल्या होत्या. देशाच्या संसदेत त्यांच्यावरून सलग दोन दिवस गदारोळ सुरु होता तेव्हाही फारसे काही वावगे वाटले नव्हते. महाराष्ट्रहिताची,मराठी माणसाच्या हिताची भूमिका घेतलेल्या एका मराठी नेत्याची त्याच्या नवीन पक्षाच्या काही आक्रमक कृतींमुळे इतकी चर्चा होताना आणि दखल घेतली जाताना पाहून अधेमधे बरेही वाटत होते.पहिल्याच झटक्यात विधानसभेत तब्बल तेरा आमदार निवडून आल्यावर तर काही वर्षात मनसे स्वबळावर महाराष्ट्र काबीज करेल अशी शक्यताही वाटली होती.
पण..पुढच्या काही काळात राज ठाकरे आपल्या कोणत्याच भूमिकेवर ठाम राहिले नाहीत.कधी त्यांना अचानक मोदींविषयी प्रचंड प्रेम दाटून आले तर कधी अचानक त्यांना मोदी-शहा व्हिलन वाटू लागले.कधी विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊ ते समोर येऊ लागले तर कधी खळ्ळ..खट्याक त्यांना अभिमानाचे वाटू लागले.जातपात,धर्म,चुकीच्या रूढी,अंधश्रद्धा या सगळ्यातून महाराष्ट्राने बाहेर पडायला हवं असं ते सांगू लागले तेव्हा प्रबोधनकारांचा वारसा आता तेच योग्यरीत्या चालवतील असं वाटू लागलं..पण ते समाधानही काही दिवसच टिकलं.त्यांच्या या सततच्या भूमिका बदलण्याने त्यांचा जनाधार कमी होत गेला.लोकांच्या मनातील त्यांच्याविषयीची विश्वासर्हता कमी होत गेली.
मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय त्यांनी यापूर्वीही काढला असल्याचं ठाण्याच्या नुकत्याच झालेल्या सभेत सांगितलं.तो त्यांनी त्या वेळीच लावून धरला असता तर कुणाचीच काही हरकत असण्याचं कारण नव्हतं.परंतु आता जेव्हा भाजपने संपूर्ण देशभरात सर्वसामान्य मुस्लिम समाजाविरोधात सार्वत्रिक मोहीम सुरु केलीये,एक मोठा कट रचून देशभरात त्यांच्याविरोधात वातावरण दूषित करण्याचे धंदे सुरु केलेत,नेमक्या त्याचवेळी राज ठाकरे यांनी भाजपचा तोच अजेंडा महाराष्ट्रात स्वतःच्या खांद्यावर घेतलाय हे पाहून प्रचंड दुःख झालं.कर्नाटकातील हिजाब प्रकरण, त्यानंतर हलाल मांस,मंदिराबाहेरच्या मुस्लिम व्यापाऱ्यांची दुकानं हटवणं,मुस्लिम व्यापाऱ्यांकडून सामान विकत न घेण्याचं जनतेला आवाहन करणं, देशभर धर्मसंसदा भरवून त्यातून मुस्लिमांविरोधात गरळ ओकणं,रामनवमीच्या वेळी मुद्दामहून त्यांच्या वस्त्यांमधून मिरवणुका नेवून मशिदींसमोर तमाशे करणं,मशिदींवर भगवे झेंडे नेवून लावणं, मग स्वतःच दगडफेक करवून,दोष त्यांच्यावर ढकलून त्यांच्या वस्त्यांवर,दुकानांवर बुलडोझर चढवून त्यांची रोजीरोटी आणि निवारा उध्वस्थ करणं,हनुमान जयंतीला पुन्हा या सगळ्याची पुनरावृत्ती करणं हे सगळं भाजपनं सुरु ठेवलंय. गेल्या महिन्याभरात देशातील जवळपास दहा राज्यांमध्ये भाजपने दंगली घडवल्या किंवा दंगलसदृश्य वातावरण निर्माण केलं.त्यांना हे देशभर करायचंय.त्यांच्या संकल्पनेतील हिंदुराष्ट्र आणि रामराज्यासाठी हे सर्व करणं ही त्यांची गरज आहे ना !
अतिरेक्यांना,दहशतवाद्यांना कारागृहातून काढून हे लोक सुरक्षितपणे त्यांच्या देशात नेवून सोडतील. आमंत्रण नसताना विमानाची वाट वाकडी करून त्यांच्या देशात जाऊन गळाभेटी घेऊन येतील आणि इथल्या कष्टकरू सर्वसामान्य मुस्लिमांविरोधात मात्र रान पेटवतील.त्या गोरगरिबांसमोर मर्दुमकी दाखवतील.त्यासाठीच खोटंनाटं ठासून भरलेल्या एखाद्या मुस्लिमविरोधी गल्लाभरू चित्रपटाचं त्यांना कौतुक..
महाराष्ट्रातही भाजपच्या मंडळींनी आणि फडणवीसांनी इतर पक्षांतून आणून पदरी बाळगलेल्या बांडगुळांनी मागील दोन वर्षात वातावरण खराब करण्याचे काही कमी उद्योग केलेत का ? परंतु महाराष्ट्रातील बहुसंख्य सुजाण जनतेने त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही.त्यामुळेच त्यांना राज ठाकरे यांच्यासारख्या प्रभावी वक्त्याची आणि मनसेच्या दगडफेकी कुमकेची प्रचंड गरज भासू लागली.आणि अखेर त्यांनी ते जमवून आणलंच ! आता मनसेची पोरं रस्त्यावर उतरतील आणि भाजपची मंडळी लांबून हसत सर्व तमाशा पाहतील. सुरुवात झालीच आहे..प्रश्न केवळ हिजाब किंवा भोंग्यांचा नाहीये.तो विषय संपला तर भाजप आणखी काही नव्याने उकरून काढेल.त्यांना आता हेच करत रहायचंय.
असो..ज्यांचं अनेक वर्षे कौतुक वाटलं,महाराष्ट्रातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे काही काळ पाहिलं.. त्या राज ठाकरेंनी आता भाजपच्या या देशव्यापी कटात सामील होवून पुरता भ्रमनिरास केला.फार वाईट वाटलं..अगदी मनापासून..