तर मी कदाचित या शर्यतींचा समर्थकही असलो असतो..!
सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर मोठा जल्लोष साजरा केला जात असताना, या शर्यतीवर बंदी का आली होती? या कारणांची आठवण करून देणारा अंगावर काटा आणणारा रवींद्र पोखरकर यांचा अनुभव....;
मी काही जन्मजात बैलगाडा शर्यतीच्या विरोधात नव्हतो.माझ्या स्वतःच्या गावात काही वर्षांपूर्वी रामनवमी यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यती आयोजनाची कल्पना कुणाच्यातरी डोक्यात आली.नदीपल्याड खंडोबा मंदिराजवळ त्यासाठी खास घाट तयार करण्यात आला होता.स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी अन्य ग्रामस्थांसोबत उत्सुकतेने मीही तिथे शर्यत पहायला पोहचलो.घाटाच्या दोन्ही बाजूला लोकांची तोबा गर्दी झालेली होती.त्या गर्दीत घुसून मी स्पर्धेचा पहिला राऊंड पाहिला.निवेदकाच्या झालीईईई...अशा विशेष तानपूर्ण सुरात ते सगळं दृष्य पाहताना मला फारच रोमांचक आणि चित्तथरारक वाटलं.
पुढचा राऊंड सुरु होण्याआधी मला काय वाटलं कुणास ठाऊक,मी घाटावरून उठून जिथे बैल गाड्याला जुपले जात होते तिकडे मंदिराच्या मागे गेलो आणि समोर जे काही दृष्य दिसलं त्याने अक्षरशः कळवळलो.ज्या गाड्यांचा पुढचा राऊंड होता त्याला जुपल्या जाणाऱ्या बैलांना ड्रममधून तिथे गावठी दारू पाजली जात होती..चाबकाने फटकावले जात होते..मी एका गाड्यावाल्याला विचारलं की काय आहे हे सगळं..? तर त्यांनी सांगितलं की बैल चवताळले नाहीत तर वेगाने धावणार कसे..? म्हणून त्यांना दारू पाजतोय आणि फटकावतोय..! अशा चवताळलेल्या बैलांना मग गाड्याला जुपले गेल्यावर ते जीव तोडून धावलेलेही मी पाहिले..कधी घाट सोडून लोकांमध्ये शिरलेले आणि त्यामुळे जीवघेणे अपघात झाल्याची वृत्तही नंतरच्या काळात वाचली, पाहिली.
बहुसंख्य लोकांना गाडा घाटावर येण्याआधी त्याला जुपलेल्या बैलांना चेकळवण्यासाठी,भडकवण्यासाठी कोणते अमानवी उपाय योजले जातात ते माहीतच नसतं.धावण्याआधीच या बैलांच्या तोंडाला फेस का आलाय,असा प्रश्नही त्यांना पडत नसतो.त्यांना केवळ शर्यतीचा रोमांच अनुभवायचा असतो.शर्यतीच्या आधीची ती पडद्याआडची दृष्य मी चुकून पाहिली नसती तर मीही या शर्यतींचा आनंद लुटत राहिलो असतोच की..आणि कदाचित या शर्यतींचा समर्थकही असलो असतो..!