खमक्या आज्या!

Work from Home… कोरोना काळात अनेकदा आपल्या कानावर पडलेला हा शब्द. मात्र, Work from Home… म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत Work from Home… सुरु झाल्यानं घरातील चिडलेल्या आजीने तमाशा करत मोठ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना जो धडा दिला तो तुम्हा आम्हाला खूप काही शिकून जातो. नक्की वाचा संजीव चांदोरकर यांनी दिलेले मार्मिक उदाहरण;

Update: 2021-08-01 07:21 GMT

हव्या आहेत खमक्या आज्या; कोणाचीही भीड न बाळगता कॉर्पोरेटशाहीला जाब विचारणाऱ्या मुंबईतील वन बीएचके; नातू आयटी क्षेत्रात; ज्युनियर पोझिशनवर…

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीत जशी नवीन लागलेल्या प्रत्येक तरुणाला जशी नोकरीची असुरक्षितता वाटते. तशी त्याला देखील वाटत होती; एवढेच नाही तर त्याचा इमिजिएट बॉस आणि त्या बॉसचा बॉस देखील त्या कंपनीत नवीन होते आणि कमीजास्त असुरक्षिततेमध्ये होते.

आपापला परफॉर्मन्स वाढवण्याच्या मागे होते; त्याचा डिजीटल रेकॉर्ड तयार करण्याच्या मागे होते; रिस्पॉन्स टाइम, टार्गेट्स लवकर गाठणे इत्यादी; कंपनीच्या प्रत्येक टीममध्ये जीवघेणी स्पर्धा.

कोरोना पूर्वी ऑफिसमध्ये उशिरा पर्यंत बसायचे व्हायचे, पण घरी पोहोचल्यावर अर्जंट कॉल सोडले तर त्यांना स्वतःचे कौटुंबिक आयुष्य मिळायचे. कोरोना काळात घरात सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत, कधी झूम मिटिंग, कधी कॉन्फरन्स कॉल सतत अधूनमधून त्यांच्या घरातल्या इतर सभासदांना त्यांच्या वेळांशी जुळवून घेताना नाकी नऊ आले होते.


...आणि जे घडणार होते ते घडलेच

कुमारची झूमवर बॉस बरोबर मिटिंग सुरु होती; घर छोटे असल्यामुळे त्याच खोलीत त्याची आजी तिची आवडीची मराठी सिरीयल बघत होती; ऐकायला कमी येत असल्यामुळे तिने टीव्हीचा आवाज मोठा ठेवला होता.

त्यामुळे कुमार काय बोलतोय ते त्याच्या बॉसेसना नीट ऐकू येत नव्हते; त्यांनी कुमारला आजूबाजूचे आवाज कमी होतील. हे बघायच्या सूचना दिल्या, आणि कुमारने व्हिडीओ, ऑडिओ ऑफ करून आजीला धारेवर धरले. हे काही पहिल्यांदा होत नव्हते; पण आज आजीचा कडेलोट झाला होता; ती उठली.

कुमारला झूमवरचा व्हिडीओ आणि ऑडिओ ऑन करायला लावला आणि घुसलीच ती ब्रेक आउट रुम मध्ये

"मी कुमारची आजी; मला कल्पना आहे मी तुमचा किंमती वेळ घेत आहे. पण तुमच्या आज्या देखील माझ्याच वयाच्या असतील म्हणून जरा दोन मिनिटे माझे म्हणणे ऐका...

तुम्ही तुमच्या कंपन्यांसाठी काम करता म्हणजे काही पूर्वीची वेठबिगारी नाहीना; ज्यात वेठबिगाराची बायका, मुले देखील त्या जमीनदाराच्या मालकीची व्हायची आपोआप...


आणि ते वर्किंग अवर्स कोठे गेले; दिवसाचे १६ तास कुत्र्याचा पट्टा गळ्यात? थोडा दूर गेला की कुत्र्याला खेचलंच?

मी वाचलंय कॉर्पोरेट शाही स्वतःला सरंजामशाहीपेक्षा आधुनिक मूल्यांची समजते.

तुम्ही कुमारचा वेळ मागत नाही आहात, तुम्ही कुमारच्या साऱ्या कुटुंबियांच्या वेळांवर, त्यांच्या खाजगी अवकाशावर हक्क मागू लागला आहात; हे कुमारच्या बाबतीत घडतंय असे नाही; तुमच्या बायकांशी, मुलांशी, आईवडिलांशी बोला; तुम्ही त्यांना किती त्रास देत आहात ते कळेल.

तुमच्या कंपनीला हा अधिकार कोणी दिला. या सगळ्याला काहीतरी विरोध करायला शिका.

कोरोना काळात याचे कंपल्शन होते मान्य; पण कंपन्यांना या वर्क फ्रॉम होम मधून खर्चात मोठी बचत संधी दिसत आहे. कार्यालयाची भाडी, मेंटेनन्स, वीज, कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता सगळ्यात बचत आणि कुत्र्याच्या गळ्यात बारा तास पट्टा.

हे व्यक्तिगत घेऊ नका; तुम्ही आणि तुमच्या बॉसेस चा पूर्ण पिरॅमिड यात अडकत चालला आहे; जमेल तेथे खर्च कमी करून, जास्तीत जास्त नफा कमवणे, शेअर्सचे भाव वाढवणे हा जणूकाही युग मंत्र झाला आहे; यातून नक्की कोणाचा फायदा होतो?

कंपनीचा पैशातील खर्च वाचला तरी आपण त्याची किंमत मोजत आहोत; त्याची मोजदाद कोण करणार?

पुढच्या मीटिंगला एकत्र चर्चा करा आणि वेळीच या आगीसारख्या पसरणाऱ्या वर्क फ्रॉम होम कार्यपद्धतीला आळा घाला, नाहीतर हे रुजणार आहे; तुमच्या जागी तुमची मुले वर्क फ्रॉम होम करणार आहेत.

कुमारच्या टीमने काही काळासाठी मिटिंग बंद केली; त्यांना अंतर्मुख होण्याशिवाय पर्याय नव्हता

संजीव चांदोरकर (३१ जुलै २०२१)

Tags:    

Similar News