धार्मिक व्रतवैकल्ये आणि तुम्ही-आम्ही – जगदीश काबरे

व्रतवैकल्य आणि धार्मिक कर्मकांडांकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून का पाहिले जात नाही, अशा रुढी-परंपरा थांबवता येऊ शकतात का, यावर उपाय काय असू शकतो, या सर्व प्रश्नांबद्दल वेगळा दृष्टीकोन मांडणारे विज्ञानविषयक लेखन करणारे ज्येष्ठ लेखक जगदीश काबरे यांचा लेख....

Update: 2021-03-18 12:46 GMT

व्रतवैकल्ये जर बंद केली तर माणसांच्या मनात पोकळी निर्माण होईल, आणि त्या पोकळीला घाबरून माणसे हिंसक होतील. असे म्हणणे म्हणजे व्यसनाधीन माणसाला जर व्यसन करू दिले नाही तर तो आत्महत्या करेल या भीतीपोटी त्याला व्यसन करून देणे कसे आवश्यक आहे, असे सांगणे होय. यात कुठला शहाणपणा आहे?

दुसरी गोष्ट म्हणजे व्रतवैकल्ये केली नाहीत म्हणून माणूस रिकाम्या डोक्याचा होतो, असे समजणे हा तर आणखीनच मानसिक दुर्बलपणा झाला. शिक्षणाने माणूस विचार करू लागतो... विचार केल्यामुळे त्याला जीवनात खरे काय खोटे काय हे कळू लागते. अशा वेळेस तो निश्चितच त्याची आवड दुसऱ्या विधायक कामाच्या विषयात वाढवेल. जसे की, करोना काळात देवळे बंद असल्यामुळे ज्यांचा देवळाच्या आधारे धंदा चालू होता त्यांनी हातावर हात ठेवून नशिबाला दोष देत न बसता वेगळे धंदे सुरू केले आणि आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगू लागले.

तेव्हा व्रतवैकल्ये नष्ट झाली म्हणून माणसे भयंकर रिॲक्शन देतील असा भयगंड निर्माण करणे हेच मुळात चुकीचे आहे. खरे तर लोकांची धार्मिक मानसिक गुलामी नष्ट करणे हे आपले काम असले पाहिजे. त्यांना विचार करायला लावणे, त्यांच्यात विवेकवाद रुजवणे हेच पुढच्या पिढीसाठी उपयुक्त काम आहे.

व्रतवैकल्ये आणि धार्मिक कर्मकांडाच्या पोकळीची जागा भरण्यासाठी नवीन सणांचे पर्याय देता येतील...

जसे की 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण होऊ शकतात. त्यामुळे देशातील लोकांची राष्ट्रीय एकात्मता वाढण्यास मदत होऊ शकते. विवेकानंद जयंती साजरी करुन विवेकानंदांचे विचार आत्मसात करत धार्मिक सुधारणा का आवश्यक आहे ते लोकांना कळू लागेल. वटसावित्रीच्या ऐवजी सावित्री फुले यांचा जन्मदिवस हा शिक्षणाचा सण होऊ शकतो. तर सत्यनारायण पूजेच्या ऐवजी माणसात देव पाहणाऱ्या गाडगेबाबांचा जन्मदिवस हा नवा सण होऊ शकतो. तसेही आपण 1 मे कामगार दिवस, 14 नोव्हेंबर बालदिन आणि 8 मार्च महिला दिवस साजरे करू लागलो आहोतच. त्याच प्रमाणे 5 जूनच्या दिवशी प्रत्येकाने एक झाड लावून आणि ते जगवण्याची शपथ घेऊन पर्यावरण दिवस साजरा करता येईल. अशा अनेक नवीन सणाचा पायंडा पाडता येईल.

सामान्य जनांचे धार्मिक शोषण होऊ नये होऊ नये यासाठीच मी वरील सणांचे वेगळे पर्याय सुचवले आहेत. अर्थात हे पर्याय रूळेपर्यंत थोडा त्रास होईल. कारण गाडी सांधा बदलताना जसा खडखडाट करते तसा बदलतानाही थोडाफार खडखडात होणारच. पण एकदा का हे नवीन सण रुळळे की, व्रतवैकल्यांची लोकांना आठवणही होणार नाही आणि माणसे कुठलाही पोकळीत जगणार नाहीत.

हे झाले सणांबद्दल. आता देव ही संकल्पना मानावी की मानू नये हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. संविधानानुसार प्रत्येक माणसाला आपापल्या समज आणि मगदुराप्रमाणे देव आणि धर्म मानण्याचा अधिकार बहाल केलेला आहे. तेव्हा वैयक्तिक आयुष्यात लोक देव मानतात की नाही याच्याशी कुणाला काहीही देणे घेणे नाही. तसेच याविषयी कुणाचा काहीही संबंध नाही. फक्त देवाधर्माच्या नावाखाली व्रतवैकल्ये आणि सणांना सार्वजनिक करून लोकांना वेठीस धरण्याचा जो कार्यक्रम होतो, आणि त्यांच्यात धार्मिक मानसिक गुलामी निर्माण करण्यात येते – ती एवढी असते की, त्यांना आपले शोषण होत आहे हेही कळत नाही; त्याला मात्र प्रागतिक विचारसरणीच्या लोकांनी नेहमीच विरोध दर्शवला पाहिजे.

पाश्‍चात्त्य देशात वर्षातील पाच ते सहा दिवस अशा सणांचे सोडले तर बाकी पूर्ण वर्षभर माणसे ठरलेल्या वेळात अंगावर पडलेली किंवा आपल्या ध्येयानुसार ठरवलेली सगळी कामे मन लावून करत असतात. म्हणूनच त्यांची प्रगती झालेली दिसते.

दुसरे असे की, अफवा पसरवणे जर गुन्हा आहे, तर व्रत उपवासाच्या ज्या पोथ्या आहेत त्या अफवा नाहीत का? सत्यनारायण, लक्ष्मीव्रत कथा, संतोषी व्रत कथा, सोळा सोमवार, सोळा गुरुवार, सोळा शुक्रवार या पोथ्या अफवा नाहीत का? कारण त्यात सांगितल्याप्रमाणे भक्तांच्या मनोकामना कधीच पुऱ्या झालेल्या आजतागायत दिसल्या नाहीत. मग ह्या पोथ्या लिहीणाऱ्या लेखकांनी अफवा पसरवण्याचा गुन्हा केला नाही काय? पोथी वाचणार्‍या भक्तांकडे क्वचितच धनधान्य, समृद्धी आली. पण पोथी न वाचणाऱ्या या प्रकाशकांनी मात्र खोऱ्याने पैसे ओढून स्वतःचे मात्र कल्याण केले!

या पोथ्यातील कथांना खरे समजल्यामुळे प्रत्यक्षात दिल्लीत एकाच घरात 11 लोकांनी आत्महत्या केल्या, आणि अनेक भक्तांनी ही व्रते वा पूजा केल्यामुळे मिळणाऱ्या मोक्षाच्या अफवांमुळे आत्महत्या केल्या आहेत. म्हणून या पोथ्यांच्या लेखक आणि प्रकाशकांना IPC च्या ४२० कलमाखाली अटक का करू नये? या पोथीवाल्याना त्यांनी लिहिलेल्या पोथीतील एक तरी माहिती खरी आहे हे सिद्ध करायला बाध्य करा. आणि त्यांना ते करता येत नसेल तर या पोथ्यांवर कायद्याने बंदी आणा. किंवा त्या पोथ्यांवर हे सर्व काल्पनिक असल्याचा वैधानिक इशारा द्या. सिगारेटच्या पाकिटावर 'सिगारेट पिणे आरोग्यास धोकादायक असते' असा वैधानिक इशारा असतो, त्याप्रमाणे या सगळ्या पोथ्यांवर 'यातील कथांचा वास्तव जीवनाशी काही संबंध नाही', असे पोथीच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात लिहिण्याचे बंधन घाला.

माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अंधश्रद्धा जिवाला घातक असतात, तेव्हा धर्माच्या कर्मकांडी अंधारातून बाहेर पडा; आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून विवेकी विचारांच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात आपल्या आयुष्याची प्रगतीपथाकडे वाटचाल सुरू करा. तेव्हा विचार तर कराल?

लेखकांचा परिचय – जगदीश काबरे हे विज्ञान विषयावर लिहिणारे ज्येष्ठ लेखक असून त्यांची विज्ञान विषयावरील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ, लोक विज्ञान संघटना, मराठी विज्ञान परिषद, ग्रंथाली चळवळ, खगोल मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष अशा विविध पुरोगामी चळवळींमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.

- जगदीश काबरे

Tags:    

Similar News