उध्दव ठाकरे आणि कोविड नियंत्रण
कोविडकाळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्तणुकीतील आवडलेल्या काही गोष्टी सांगत आहेत साथरोगतज्ज्ञ डॉ. प्रिया प्रभू...;
जनतेला आरोग्य राजकीय इच्छाशक्तीविना (political willpower) प्राप्त होऊ शकत नसते, हे आम्ही वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवतो . एक विनोद आम्हाला सांगितला गेला होता, ज्यामध्ये एका नव्या मंत्र्याला राज्याच्या आरोग्याविषयी ब्रिफ केले जात असते. " अपने राज्य में हर मिनिट एक औरत बच्चे को जनम दे रही है." तेव्हा मंत्री म्हणतात - "जलदी से पकड कर लाओ उस औरत को , तो प्रॉब्लेम खतम हो जायेगी| हा विनोद मी देखील सांगायचे.
मात्र कोविड व्यवस्थापन काळातील राज्यस्तरीय 1-2 व्हिडीओ कॉन्फरन्स मिटिंगला हजर राहिल्यानंतर राजकारणी परिस्थितीची नस ओळखू शकतात हे देखील प्रत्यक्ष बघितले. आज मा. मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्याने कोविड महामारीच्या काळात एक पब्लिक हेल्थ एक्स्पर्ट म्हणून जाणवलेल्या, नोंदवलेल्या सकारात्मक बाबी नोंदवत आहे. (आठवतील तशी भर घालेन.)
१. जनतेशी प्रत्यक्ष संवाद
साथ नियंत्रणामध्ये संवाद असणे आवश्यक असते आणि राज्याचे प्रमुख स्वतः सर्व बाबी स्पष्ट करून सांगत असल्याने प्रत्यक्ष माहिती मिळत होती, सूचना मिळत होत्या.
२. सुरक्षा नियमांचे पालन
मास्कचा वापर हा विविध सरकारमधील नेते किती करत होते हे सर्वांनी बघितले आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी मात्र मास्क मनापासून वापरला. स्टेजवर देखील वापरला, फोटोमध्ये वापरला व प्रत्येक वेळी योग्य रीतीने वापरला. मास्क नेत्यांनी वापरला की आजूबाजूचेही वापरतात .
३. पब्लिक हेल्थ मेजर्सचा योग्य वापर
"ब्रेक द चेन" सारखी संकल्पना जी वैद्यकीय विद्यार्थ्यांना देखील नीटशी सांगता येत नाही. त्याचे महत्व अधोरेखित केले. Self responsibility of health ची जाणीव वाढवायचा प्रयत्न केला . (माझे कुटुंब माझी जबाबदारी)
४. विदा (data) मध्ये जास्त तफावत नसणे
केसेस ची संख्या वाढलेली असणे म्हणजे ते कलेक्टरचे / आरोग्य संस्थेचे अपयश नसते याची जाण होती. रुग्णसंख्या लपवायची गोष्ट नसते याची जाणीव असल्याने महाराष्ट्रामध्ये जास्त रुग्ण आहेत असे चित्र दिसत असले तरीही त्यामुळे विचलित न होणे.
५. साथनियंत्रण समजून घेणे
डेल्टाच्या लाटेच्या सुरुवातीला परदेशी प्रवाश्यांपासूनचा धोका समजून घेऊन त्यावर अगदी शास्त्रीय उपाय सांगताना प्रत्यक्ष ऐकले आहे व तशी उपाययोजना करताना केंद्राच्या सूचना जनहितासाठी डावलताना पाहिले आहे. ते सर्व शास्त्रीय संज्ञा योग्य रीतीने वापरत होते. मात्र दर वेळी तज्ज्ञांना मान देऊन त्यांचे म्हणणे देखील विचारत होते.
६. तज्ज्ञांना महत्व व त्यानुसार निर्णय
मीटिंग मधील सर्वांना म्हणणे मांडण्याची मुभा होती व म्हणणे ऐकून घेतले जायचे. प्राप्त परिस्थितीमध्ये जनसुरक्षेच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला दिसला.
७. पुढील धोका जाणून त्यानुसार तयारी
तिसरी लाट लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसण्याची शक्यता असल्याने त्यानुसार पूर्वतयारी सुरू झाली होती. ट्रेनिंग्स, तज्ज्ञांचे, औषधांचे , ऑक्सिजनचे संयोजन इ. बरेच आधी (काही महिने) सुरू झाले, मात्र ओमायक्रोनमुळे पुन्हा सर्वसमावेशक तिसरी लाट आली.
८. अधिक जोखमीच्या काळामध्ये सुरक्षा नियमांचे पालन -
पंढरपूरच्या पूजेला जाताना स्वतः गाडी चालवणे जेणेकरून कारमध्ये ड्रायव्हर पासूनचा धोका कमी होईल, अशी विविध उदाहरणे
९. सोशल मीडियाचा सुयोग्य वापर
स्टेट टास्क फोर्सच्या तज्ज्ञांकडून जनतेसाठी व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी ट्रेनिंग ची उपलब्धता होती. युट्युब वर सर्व बाबी उपलब्ध आहेत. यामध्ये जनतेसाठी देखील मराठीमध्ये माहिती उपलब्ध आहे.
१०. Online ट्रेनिंग / चर्चेमध्ये हजर रहाणे
ट्रेनिंगची सुरुवात व शेवट प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांचा बोलण्याने व्हायचा व ते संपूर्ण वेळ हजर असायचे व माहिती ऐकायचे, असे क्वचित आढळते .
११. आजारी असताना कामकाज सुरू ठेवणे
परिस्थितीची निकड लक्षात घेऊन रुग्णालयातील बेडवरून मीटिंग मध्ये उपस्थिती होती. कारण बाब महत्वाची व तातडीची होती . डॉक्टर राउंड साठी आले तेव्हा सर्वांची माफी मागत काही काळासाठी मीटिंग मधून बाहेर पडले होते.
१२. फोटोसाठी / भाषणासाठी मास्क न काढणे
राजकारण्यांसाठी फोटो महत्वाचे असतात मात्र महामारीच्या काळामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहसा वरील कारणांसाठी मास्क काढले नव्हते ज्यामुळे एक अनुकरणीय उदाहरण सर्वांसमोर दिसत होते.
या आणि अश्या छोट्या मोठ्या पण महत्वाच्या बाबींमुळे महाराष्ट्राचा करोना महामारीशी दिलेला लढा परिणामकारक होता. A good leader leads from the front and shows the way . या कालावधीमध्ये आपल्या आरोग्यमंत्र्यांनी देखील चांगल्या पद्धतीने व मनापासून काम केले आहे .
दोघांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा! आपण आम्हा सामान्य जनतेची काळजी या कठीण काळामध्ये घेतलीत तसेच विज्ञानाला योग्य ते महत्व दिलेत यासाठी मनापासून आभार !
-डॉ. प्रिया प्रभू (MD PSM) , साथरोग तज्ञ
GMC, Miraj
DrPriya Insights
(२९/०६/२०२२)