महाराष्ट्र पोलीस सत्तेचे नोकर आहेत का?

उद्धव ठाकरे सरकारला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे का? पोलिस खातं सत्तेचं नोकर आहे की लोकसेवक? वाचा गोविंद वाकडे यांचा राजकारण्यांचा बुरखा फाडणारा लेख;

Update: 2021-09-29 13:23 GMT

सत्तेचा शिमगा… "उत्सव"  (स्वयंघोषित गृहमंत्र्यांनो पुन्हा लक्षात घ्या, एकवेळ पोलीस लोक सेवक असतील, पण सत्तेचे नोकर मुळीच नसतील, आणि नसावेत....)

तुमचं सरकार खड्यात गेलं…. आधी या पोरांची काय चूक आहे ते सांगा.? शिवसेना सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्र्यांना असा जाब विचारतात आणि दुसऱ्याच दिवशी कोणत्याही कारणाशिवाय निलंबित केले गेलेल्या तीन पोलीस अधिका-यांना पुन्हा सेवेत घेतलं जातं. ACP इसाक बागवान यांनी सांगितलेला हा स्वानुभवाचा किस्सा सर्वश्रुत आहे. मात्र, इसाक बागवानांना ठाकरे साहेबांकडे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व होतं संजय राऊत....

ही घटना काय किंवा आपल्या भाषणात कुठल्याही क्षणी पोलिसांना त्रास देऊ नका ते आपले आहेत असं आवर्जून सांगणारे बाळासाहेब ठाकरे राऊतांना स्मरणात असून देखील आज ते उघड उघडपणे पोलिसांना "सत्तेचे नोकर" म्हणतात .हे क्लेशदायक आहे, राऊतांनी आपल्या बुद्धीचातुर्याने "तीन तिघाडा,काम बिघाडा" ही म्हण तर खोटी ठरवलीयच. पण या अविर्भावात ते आता यंत्रणा आपल्या दावणीला बांधु पाहत असतील तर ते निषेधासच पात्र आहेत. हे झालं राऊंतांच.. याहून वरचढ आहेत प्रश्न राज्यातील दादा मंत्री" अर्थात अजित पवार, दादांचं पोलीस दलावरील प्रेम बघून तर वाटतं की एका दिवसासाठी तरी का होईना या माणसाला गृहमंत्रीपदी बसावावच….

कोणते कमिशनरेट अपग्रेड-डिग्रेड (म्हणजे रँक नुसार पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, न करणे) करणे या निर्णयावर त्यांच्या स्वाक्षऱ्या तरी राहतील. असंही पोलीस खात्याच्या सगळा कारभार तेच चालवतात म्हणा, पण म्हणून काय एकीकडे राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही म्हणत असतांना, दुसरीकडे संबधित खात्याचे मंत्री नसून देखील "फक्त माझेच फोन उचलल्याचे" असं जाहीरपणे सांगायचं असं कसं चालेल दादा, तुमचं वक्तव्य पोलीस दलाची अपखुशी वाढविणारं आहे.

सत्तेतील माणसं अशी बोलणारचं असतील आणि अधिकारी निमूटपणे ऐकूण घेणार असतील तर त्याला आपण काय करणार? असे प्रश्नोत्तर आपण स्वतःशीच करून गप्प बसलो तर, "प्रशासकीय सेवेत दाखल होणारी पुढची पिढी केवळ खरकटे काढायची म्हणून प्रशासनात दाखल होतील" हे वास्तव लक्षात घ्यायला हवं.

सांगायचं एव्हढचं की कुणीतरी असल्या प्रकारांवर "प्रकाश" टाकायला हवा… कारण राजकारणी आणि प्रशासकीय सेवकांमध्ये किमान चार हात अंतर असावं, ते कुठेच दिसत नाही, अनेक अधिकारी एकतर राजकारण्यांच्या कानाला चिटकेलेली असतात किंवा पायावर लोळण घालत बसलेले असतात.. अशा वेळी सामान्य माणूस अन्यायग्रस्तच राहतो हे बदलायला हवं....अन्यथा सत्तेचा शिमगा- उत्सव सुरूच आहे...

तो सुरूच राहील..!!!!

-गोविंद अ. वाकडे

Tags:    

Similar News