शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्या बंगल्यावरील कारवाई का थांबवली होती?

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडीबिलीटी कमी केली जात असल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे नाव घेऊन टीका केली. पण शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचा दाखला देत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे.

Update: 2022-05-23 11:55 GMT

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडीबिलीटी कमी केली जात असल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे नाव घेऊन टीका केली. पण शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचा दाखला देत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये ते काय म्हणतायत पाहा....

"विश्वासहर्ता (Credibility)

1990 च्या दशकामध्ये मधुकर पाटील नावाचे अधिकारी काही काळ ठाण्याचे जिल्हाधिकारी व काही काळ ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. अत्यंत शिस्तप्रिय व कोणालाही न जुमानणारे अशी त्यांची ख्याती होती. येऊर हे निसर्गरम्य ठिकाण सगळ्यांना माहितीच आहे. तिथे काही जणांचे बंगले होते. खरंतर येऊर तस ओसाड होतं. मोकळ्या जमिनी होत्या. पण तिथे कुठल्याही प्रकारची लागवड नव्हती. थोडीफार भातशेती होती. पण 90 टक्के जमीन ही तशीच माळरान व ओसाड होती. लोकांनी नंतर हळू हळू तिथे जमिनी घेतल्या. प्रत्येकाने आपआपल्या परीने झाडे लावली. आणि आजच येऊर तुम्हांला हिरवगार दिसतंय.

मधुकर पाटील यांनी स्वभावाप्रमाणे येऊरच सर्वेक्षण हाती घेतल व बंगले अनधिकृत आहेत असं कारण देत ते बंगले पाडायला सुरुवात केली. या बंगल्यामध्ये एक बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांचा (उद्धवजी नाही) बंगला होता. जे वन्यप्राणी, हिरवळ, निसर्ग यांच्यावर मनापासून प्रेम करायचे. ह्या पडझडीत त्यांचाही बंगला पाडला असता. त्यावेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फोन उचलला आणि थेट तेव्हाचे मुख्यमंत्री श्री. शरद पवार साहेब यांना फोन केला आणि ते आपल्या भाषेत त्यांना म्हणाले शरदबाबू (ते पवार साहेबांना शरदबाबू म्हणत असतं) तो बंगला पडता कामा नये. समोरच्या बाजूने फक्त बघतो असे सांगण्यात आले.

त्यानंतर कै. मधुकर पाटील ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरती सकाळी येऊर बाबतची फाईल घेऊन बोलविण्यात आले. तिथे प्रचंड गर्दी होती. जेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षा बंगल्यावर सकाळी प्रचंड गर्दी असायचीच... ते सकाळी आठ वाजल्यापासून लोकांना भेटायला सुरुवात करायचे. ती गर्दी आटपून पवार साहेब आपल्या दालनाच्या बाहेर पडले. समोर मधुकर पाटील बसले होते. पवार साहेब पटकन म्हणाले अरे तुम्ही आला आहात का बरं ती फाईल ठेवा मी वाचतो. आणि आपणांस त्यानंतर कळवतो. मधुकर पाटील यांनी फाईल पवार साहेबांच्या पीएच्या हातात दिली. आणि ते निघून गेले. त्या फाईलचे पुढे काय झाले हे मला माहीत नाही. पण मधुकर पाटील निवृत्त झाले आणि बंगला आहे तिथेच राहिला. ह्याच्याने कोणाची विश्वासहर्ता (Credibility) दिसत नसते तर एकमेकांबद्दल असलेलं प्रेम आणि त्या प्रेमातून निर्माण होणारा आधार दिसत असतो.

असे अनेक प्रसंग सांगता येतील. जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मैत्रीमुळे, आपल्या स्वभावामुळे अनेक जणांना अडचणीतून बाहेर काढले आहे. ह्या अनेक जणांमध्ये कोणकोण आहेत हे वेगळे सांगायला नको. महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीचे खुप संदर्भ आणि अर्थ आहेत. कायम विद्वेषच पेरला पाहिजे. विद्वेषाचच राजकारण केलं पाहिजे. हे महाराष्ट्रात कधी रुजल नाही आणि वाढलं नाही. आणि अजूनही तसंच वातावरण असल पाहिजे ह्या मताचा हा महाराष्ट्र आहे.

राजकीय मतभेद हे वैचारीक मतभेद असतात. त्याच्यात कुठलाही मनभेद नसतो. त्यामुळे हे खरं आहे कि आपण विचारांनी आपल्या जागेवरती मजबुतीने उभे राहायला हवं. आणि जो आपला विरोधक आहे तो आपला वैचारीक विरोधक आहे हेही समजून घ्यायला हवं. त्यांच्याशी वैर आणि द्वेष भावना ही व्यक्तिगत स्वरूपाची असताच कामा नये त्यालाच राजकारण म्हणतात. त्याच्याने कुठे विश्वासहर्ता (Credibility) जाते किंवा येते असा विचार करणं म्हणजे ज्याला राजकारणाचा अर्थ समजत नाही त्याच्याच तोंडातून हे निघू शकत.

प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपल्या भाषणातून एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पत्नी वेणूताई यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाची टिका केली होती. त्याबाबत उघडपणाने काहीही न बोलता यशवंतराव चव्हाण यांनी प्रल्हाद केशव अत्रे यांना निरोप पाठवून घरी बोलावून घेतले आणि वेणूताई यांना गर्भधारणा का होऊ शकत नाही याची माहिती प्रल्हाद केशव अत्रे यांना दिली. त्यानंतर प्रल्हाद केशव अत्रे यांनी नंतरच्या आयुष्यात परत कधी यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई यांच्यावर व्यक्तिगत हल्ला केला नाही. हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे संस्कार आहेत. त्याच्यात विश्वासहर्ताचा प्रश्नच उभाच राहत नाही.

विश्वासहर्ता ही समाजामध्ये मिळवावी लागते. ती कोणाबरोबर चहा पिल्याने कमीही होतं नाही किंवा कोणाबरोबर जेवल्यामुळे वाढतही नाही. आणि जनमानसामध्ये त्या त्या व्यक्तिमत्वाच तेवढं वलयं असतं की त्यांच्यावरती जनता संशयही व्यक्त करत नाही."

जितेंद्र आव्हाड

Tags:    

Similar News