केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत LICचे शेअर्स बाजारात आणले, LIC सारख्या बलाढ्य सरकारी कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलीओमध्ये असले पाहिजेत, अशी प्रत्येकाची इच्छा होती. त्यामुळे लाखो लोकांनी हे शेअर्स विकत घेतले. पण आता शेअर बाजारात या शेअर्सची किंमत ढासळल्याने गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास झाला आहे. यासंदर्भात विविध माध्यमांवर चर्चा सुरू आहेत. याच संदर्भात ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात..
"अनेक लोकांनी मला पत्र लिहून एलआयसीमध्ये त्यांचे पैसे बुडाल्याचे म्हटले आहे. त्यांना माझ्याशी बोलायचे आहे. पण यामध्ये मी काय करु शकतो. तुम्ही तुमच्या माहितीच्या आधारे शेअर खरेदी करता, तो तुमचा निर्णय असतो. जीवन विम्याच्या क्षेत्रात खासगी कंपन्या वेगाने पुढे जात आहेत. एलआयसीची वाढ मात्र तशी नाहीये. जर तुम्ही LIC मध्ये तुमची सर्व कमाई गुंतवली आणि ती बुडाली आहे तर यात माझा कोणताही संबंध नाही. कुणाचे पैसे बुडाले तर वाईट वाटते, पण नोटबंदीचा काळ आठवा आणि मनाची समजूत घाला की हा शेअर बाजार आहे, कुणास ठाऊक अच्छे दिन येतीलही? आता तर हा बाजार आणखी किती खाली कोसळणार ते कुणालाही माहिती नाही.
शेअर बाजार कधी वर जाणार हे देखील कुणी सांगू शकत नाही. ज्या लोकांनी एलआयसीमध्ये गुंतवणूक केली त्यांच्यापैकी असे किती जण आहे ते गेल्या दोन वर्षात शेअर बाजारात उतरले आहेत? मला हे नक्कीच जाणून घ्यायचे आहे पण त्यांचे सर्वेक्षण कोण करणार? कारण जे जुने गुंतवणूकदार आहेत ते ना फायद्या झाल्याचे जाहीर करतात ना पैसे बुडाले तर पत्रकारांना फोन करतात." असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे.