प्रशासनात नेतृत्व आणि टीम वर्क कसे काम करते?
मानव प्राण्याने ह्या भूतलावर स्वत:ची केलेली प्रगती ही अविश्वसनीय आणि अचंबीत करणारी आहे. ह्या प्रगतीमध्ये अनेक घटक कारणीभूत असले तरी मानवाच्या ठायी असलेले नेतृत्व आणि समूहकार्य कौशल्ये (team work) हे त्याला इतरांपेक्षा वेगळे आणि भक्कम बनवतात, लोकशाही व्यवस्थेमध्ये या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले आहे उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी...
शासन ही अशी एक व्यवस्था असते,की ज्यामध्ये एक विशिष्ट असा लोकांचा समूह त्या राष्ट्रातील राज्यकारभार पाहतो. आपला देश हा एक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही आणि प्रजासत्ताक राष्ट्र असून आपण संसदीय शासन प्रणालीचा स्विकार केला आहे. भारतीय संविधानाच्या अनुश्चेद ७९ नुसार भारतीय संसद ही सर्वोच्य स्थानी असून त्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो. शासन आणि प्रशासन ही या व्यवस्थेची महत्वाची अंगे असून त्यांच्या सर्वोच्च स्थानी कायदेकारी आणि कार्यकारी मंडळ कार्यरत आहेत. कायदेकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होत असून विविध कायद्यांची निर्मिती करण्याचे काम हे कायदेकारी मंडळ करत असते.
कार्यकारी मंडळ की ज्याचे प्रमुख पंतप्रधान असतात आणि आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी यांची ते मदत घेवून राज्यकारभार करत असतात. पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे प्रशासनातील विविध खात्यांचे प्रमुख असून ते देशात प्रशासनाच्या माध्यमातून राज्यकारभार करतात. भारतीय संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत व्यापक लोकहिताचे आणि जनहिताचे विविध निर्णय घेवून त्याची अंमलबाजवणी प्रशासन मार्फत केली जाते. साहजिकच असे निर्णय घेणे आणि त्याची देशात अंमलबाजवणी करणे यासाठी नेतृत्व आणि समहूकार्य कौशल्ये ही सूप्रशासनाचे दोन वैशिष्टे शासन आणि प्रशासन यांच्यासाठी खूप महत्वाची ठरतात. प्रस्तुत लेखात आपण सूप्रशासनातील नेतृत्व आणि समूहकार्य कौशल्ये याबाबत विवेचन करणार आहोत.
मानव हा एक समाजशील प्राणी असून तो एका ठराविक अशा समूहात त्याचे आयुष्य व्यतीत करत असतो. साहजिकच असा हा मानवी समूह हा चार्ल्स डार्विनच्या सिद्धांत प्रमाणे जगण्यासाठी कायम संघर्ष करत असतो. मात्र मानवी प्राण्याने ह्या भूतलावर स्वत:ची केलेली प्रगती ही अविश्वसनीय आणि अचंबीत करणारी आहे. ह्या प्रगतीमध्ये अनेक घटक कारणीभूत असले तरी मानवाच्या ठायी असलेले नेतृत्व आणि समूहकार्य कौशल्ये हे त्याला इतरांपेक्षा वेगळे आणि भक्कम बनवतात. साहजिकच जेंव्हा प्राचीन मानवाने समूहाने राहायला सुरुवात केली त्यावेळी त्या समूहातील हुशार आणि चाणाक्ष अशा मानवाने ज्याला आपण 'अल्फा' म्हणतो त्याने त्या समूहाचे नेतृत्व स्विकारले आणि आपल्या समूहाची यशस्वी वाटचाल सुरू केली. मात्र असे नेतृत्व करत असताना या नेतृत्वाचा वेळोवेळी कस लागायला लागला.
ब-याच वेळा निर्णय घेतांनी अशा नेतृत्वाला अनेक अडचणीचा सामना करायला लागू लागला. त्या नंतर पुढे आली ती समूह निर्णय पद्धती होय. काही निर्णय नेतृत्व घेवू लागले तर काही निर्णय समूह घेवू लागला. यातूनच लोकशाहीची मुहर्तमेढ रोवली गेली.लोकशाहीचा प्राचीन उल्लेख ग्रीक मधील अथेन्स राज्यातील राजकीय आणि तात्विक विचार शैली मध्ये दिसून येतो. क्लेस्थेनीस यांना अथेन्स च्या लोकशाहीचे जनकत्व जाते(इ.स.पू ५०८-५०७). सन १२१५ मधील मॅग्ना कार्टा या दस्ताऐवज मध्येही लोकशाहीचा उलेख आढळतो.अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय. साहजिकच सूप्रशासन राबवत असतांनी शासन आणि प्रशासन मधील नेतृत्व करणार्याज प्रत्येक घटकाने लोकशाहीचा पुरस्कार करून कायद्याच्या चौकटीत काम करणे आवश्यक ठरते. 'आपण भारतीय संविधानाचे संरक्षक आहोत' अशी भावना प्रत्येक प्रशासकीय नेतृत्वाने त्यांच्या कार्यशैलीत रुजवणे आणि त्याचा विकास करून कामकाज करणे सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये महत्वाचे ठरते.
शासन आणि प्रशासन ही लोकशाही मधील लोकविकासाची महत्वाची साधने होत. मात्र ही साधने त्यांना जर योग्य असे नेतृत्व मिळाले तरच भक्कम आणि खंबीरपणे काम करतात. साहजिकच नेतृत्व मिळण्यासाठी एक साचेबंध आणि कायदेशीर असा प्रशासकीय समूह निर्माण करावा लागतो. नेतृत्व हे कधीही एकेरे नसते तर ते नेहमी समूहाला नेतृत्व देते. मग तो लोकसमूह असो की प्रशासकीय समूह असो. असा समूह की जो समान उदीष्टे आणि ध्येये यावर काम करत असतो. भारतीय संविधानाने प्रशासकीय व्यवस्थेची रचना करत असताना ती सामूहिक जबाबदारी असलेल्या विविध प्रशासकीय समुहांमध्ये केलेली आहे. अशा समूहाला एक समान उदीष्टे आणि कार्ये दिली असून त्या समूहाला एक नेतृत्व दिले आहे. असे नेतृत्व त्या समूहाला सोबत घेवून नेमून दिलेली उद्दिष्टे आणि कार्ये पार पडत असते. साहजिकच अशा नेतृत्वाने अशा समूहाचे सकारात्मक नेतृत्व करणे आवश्यक आणि अनिवार्य बाब असते. पण असे प्रत्येक वेळी होतेच असे नाही. काही कारणांमुळे जेंव्हा अपेक्षित कामकाज होत नाही, त्यावेळी निर्माण केलेली व्यवस्था ढासळते किंवा मागे पडते. त्यासाठी योग्य प्रशासकीय नेतृत्व देणे अथवा मिळणे हे त्या समुहाच्या कार्यक्षमतेसाठी गरजेचे असते. समूह हा जेंव्हाच यशस्वी होतो जेंव्हा त्याला योग्य असे नेतृत्व प्राप्त होते. म्हणून सूप्रशासनात योग्य असे प्रशासकीय नेतृत्व देणे आणि त्या नेतृत्वाला आवश्यक असे अधिकार, कार्ये आणि कामकाज करणे हेतु प्रदान करणे एक महत्वाची आणि अपरीहार्य अशी बाब ठरते.
भारतीय संविधानाने निर्माण केलेली प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रशासनिक विभाग, प्रशासकीय निकड लक्षात घेवून संचालनालय आणि आयुक्तालय, जिल्हा-उपविभाग-तालुका-गाव स्तरावरील विविध कार्यालये अशी एकंदर प्रशासकीय उतरंड पाहायला मिळते. या उतरंडीच्या सर्वोच्य स्थानी मंत्री आणि सचिव तर उतरंडीच्या खालच्या स्तरावर अधिकारी-कर्मचारी एका विशिष्ट अशा प्रशासकीय समूहाचे नेतृत्व करत असतात. या उतरंडीच्या सर्वोच्य स्थानी धोरणे, कार्यक्रम, योजना आणि उपक्रम आखले जातात आणि त्या उतरंडीच्या खालच्या स्तरावर त्यांची अंमलबजावणी होते. निश्चितच वरच्या स्तरावर घेतलेले निर्णय असो किंवा खालच्या स्तरावर त्यांची अंमलबाजवणी असो अस्तित्वात असलेले नेतृत्व समुहाला कसे नेतृत्व देते आणि किती सक्षमपणे अंमलबाजवणी करून घेते यावर प्रशासकीय यंत्रणेचे यश अवलंबून असते. जर समूह हा नेतृत्वहीन असेल तर तो समूह योग्य प्रकारे आणि निर्भयपणे आणि तितक्याच आत्मविश्वासाणे काम करू शकत नाही. साहजिकच व्यवस्था आहे, समूह आहे, संसाधने आहेत मात्र सक्षम नेतृत्व नाही तर अशा परिस्थितीत व्यवस्था आणि संसाधने हे वाया जातात आणि ती आधारभूत ठरण्याऐवजी भारभूत ठरतात.
त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रत्येक स्तरावर नेतृत्व तयार करणे हे राज्यकर्त्यांसमोर नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे. देशात प्रत्येक स्तरावर असे नेतृत्व निर्माण झाल्याशिवाय सूप्रशासन अस्तित्वात येऊ शकत नाही. साहजिकच असे नेतृत्व तयार करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देवून ज्ञान, कौशल्ये आणि दृष्टीकोण यात बदल घडवून आणणे आवश्यक ठरते. त्यासाठी उतरंडीच्या वरच्या स्तराने खालच्या स्तरावर नेतृत्व कसे तयार होईल यासाठी काम करायला हवे. शेवटी कोणीच कायम नेतृत्व करू शकत नाही हे कालाबाधित सत्य आहे. त्यासाठी एका पिढीने दुसर्याट पिढीतील नेतृत्व ओळखणे आणि त्या नेतृत्वाला अजून पाठबळ देवून सक्षम बनवणे हीच काळाची गरज ठरते. ज्या व्यवस्थेमध्ये एक पिढी आपल्या पुढच्या पिढीत नेतृत्व निर्माण करत नाही कालांतराने ती व्यवस्था लयाला जाऊन नष्ट होते. त्यासाठी सू प्रशासनात नेतृत्व निर्माण करण्यामध्ये भर दिला जाणे अपेक्षित आणि अनिवार्य असते.
प्रसिद्ध तत्ववेत्ता अँथनीटी दादवानो नेतृत्वाबाबत सांगताना असे म्हणतात की 'चांगले नेतृत्व फक्त चांगल्या गोष्टी करत नाही, तर चांगले नेतृत्व हे चांगल्या गोष्टी शोधून त्या अधिक चांगल्या प्रकारे करते. विन्स लोंबार्डी असे म्हणतात की 'नेतृत्व हे जन्माला येत नाही तर ते घडते. प्रशासनिक नेतृत्व हे प्रशासकीय समूहाला प्रत्येक स्तरावर अधिक जाणून घेण्यात, अधिक समजून घेण्यात आणि अधिक काम करण्यास प्रेरणा देत राहते. नेतृत्व ही एक स्थिर अशी प्रक्रिया असून ती नेतृत्वाची कायम क्षमता तपासात असते. प्रशासनात समान उदीष्टे साध्य करणार्या् समूहाचे प्रशासकीय प्रमुख नेतृत्व करत असतात. ही विविध उदीष्टे प्रत्यक्षात आणण्याची क्षमता आणि जिगर ज्यात असते तो नेतृत्व करतो. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे नेतृत्वगुण प्रदर्शित करण्याची क्षमता असते, त्यामुळे प्रशासनाच्या या उतरंड मध्ये प्रत्येक अधिकार्या्ची आणि कर्मचार्यायची नेतृत्व क्षमता विकसित आणि वृद्धिंगत करण्याची आवश्यकता निर्माण होते. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये नेतृत्व कौशल्य आणि आत्मविश्वास वाढल्याने प्रशासकीय कामकाजाला चालना मिळते आणि अधिक प्रभावीपणे योगदान देण्यास अधिकारी-कर्मचारी कटिबद्ध होतात.
नेतृत्वाचे एकूण चार सिद्धांत प्रचलित आहेत. गुणविशेष नेतृत्व सिद्धांत मध्ये काही विशेष गुण आणि क्षमता असलेले व्यक्तींना नेतृत्व प्रदान केले जाते. परिस्थितिनुरूप नेतृत्व सिद्धांत मध्ये निर्माण झालेली परिस्थितिनुरूप समोर आलेल्या समस्यांची सोडवणूक करणेसाठी नेतृत्व प्रदान केले जाते. सकारात्मक मजबूतीकरण नेतृत्व सिद्धांत मध्ये सकारात्मक व्यक्तीला समूहाचे नेतृत्व दिले जाते. कार्यात्मक नेतृत्व सिद्धांत मध्ये कामकाजात काही समस्या निर्माण झाल्यास तीच्यातून मार्ग काढणेसाठी कार्यात्मक नेतृत्व सिद्धांत नेतृत्व तयार होत असते. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये मात्र नेतृत्वाचे हे चारही सिद्धांत परिस्थितिनुरूप लागू होतात आणि यशस्वी सुद्धा होतात. प्रशासनात नेतृत्वाचा उदय हा कसा होतो कारणमीमांसा अशी की, काही लोक काही तरी विशेष गुण वैशिष्टे घेवून समोर येतात किंवा जे काही तरी विशेष गुण वैशिष्टे विकसित करतात ते नेतृत्वदायी ठरतात. खंबीर आणि आश्वासक असे लोक, सत्यता, मूल्ये आणि विश्वासू असे लोक, अधिक हुशार आणि जेष्ठ असे लोक, चांगले चरित्र आणि प्रामाणिकपणा असलेले लोक, शोर्य आणि वर्चस्व गाजवणारे लोक, इतरांवर प्रभाव पाडणारे लोक, ज्याची भावनिक बुद्धिमता जास्त आहे असे लोक, प्रभावी संवाद असलेले लोक, चांगली निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता असलेले लोक योग्य वेळी प्रशासकीय नेतृत्व करतात. प्रशासनातही एकूण चार नेतृत्व शैली दिसून येतात. निरकुंश नेतृत्वशैली ज्यामधे नेतृत्व शक्ती ही केंद्रीकृत असते आणि इतर कोणाचे सल्ले न ऐकता एकतर्फी निर्णय घेतले जातात. या नेतृत्वात निर्णय हे जलद घेतले जातात. लोकशाही नेतृत्वशैली यात लोकशाही पद्धतीने समुहा मध्ये चर्चा आणि विचार विनीमय करून निर्णय घेतले जातात. या नेतृत्वात मध्ये निर्णय घेण्यात वेळ खूप वाया जातो. कार्यात्मक नेतृत्वशैली या मध्ये काम हेच सर्वस्व धरून कामकाज केले जाते. काम आणि ध्येयावर लक्ष दिले जाते. संबंधाभिमुख नेतृत्वशैली मध्ये कनिष्ट यांच्याबद्दल नेतृत्व कमालीची काळजी घेते आणि त्यांच्याकडून कामकाज करून घेतले जाते. या नेतृत्वात मध्ये उत्पादकतेला मात्र फटका बसतो.
प्रशासनात नेतृत्व गुण कसे असावेत याबाबत आपण आता चर्चा करूया. प्रशासकीय नेतृत्व हे परिस्थिती जशी बदलेल त्याप्रमाणे बदलता कामा नये. जर असे होत असेल तर अनुयायी म्हणजे कनिष्ठ हे भरकटू शकतात आणि त्यांचा नेतृत्वावरील विश्वास उडू शकतो. प्रशासनात कामकाज योग्य रीतीने आणि पद्धतीने हाताळणे साठी ज्ञान आणि बुद्धिमता याची वेळोवेळी गरज पडते सबब प्रशासकीय नेतृत्व हे निश्चितच बुद्धिमान असे असायला हवे. ठामपणा हा गुण विशेष नेतृत्वामध्ये असेल तर त्या नेतृत्वाला कनिष्ट आणि वरिष्ठ उचलून धरतात. ठामपणा येण्यासाठी योग्य अशी ऊंची कामकाजातून प्रशासनामध्ये गाठावी लागते. ठामपणा हा फक्त बोलण्यात नाही तर तो कृतीत दिसून येणे अपेक्षित असते. नेतृत्व हे सर्वांमध्ये उठून आणि सर्वांपेक्षा वेगळे दिसणे आवश्यक असते. नेतृत्व करत असतांना पेहराव हा सुद्धा बर्यानच अंशी व्यक्तिमत्व खुलवतो त्यासाठी प्रशासनात नेतृत्वाला पेहराव बाबत विशेष दक्ष राहावे लागते. प्रशासकीय नेतृत्व मध्ये कायम एक ऊर्जा असायला हवी. नेतृत्वामद्धे असलेली ही ऊर्जा निश्चितच इतर व्यक्तिमत्वामध्ये हस्तांतरित होत असते. नेतृत्वामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी योग,प्राणायाम, ध्यानधारणा आणि त्याला सकारात्मकतेची जोड द्यावी लागते. चिकाटी आणि प्रेरणा ही दोन गुण वैशिष्टे नेतृत्वात असतील तर ती प्रशासनात आदर्शवान ठरतात.
नेतृत्वाने कामकाजात चिकाटी दाखवली की ती इतरांना प्रेरणादायी अशी ठरते. प्रशासकीय नेतृत्वाला कायम वर्चस्व आणि प्राबल्य राखावे लागते. नेतृत्वामध्ये वर्चस्व नसेल तर लोक नेतृत्वाला गृहीत धरून अनादर करतात आणि नेतृत्वाचे निर्णय मान्य करत नाहीत. नेतृत्वाचा प्रत्येक निर्णयात निर्धार खूप आवश्यक असतो. एकदा निर्णय घेतला की तो निर्धाराने पुढे घेवून जायला लागते. प्रशासकीय नेतृत्व हे कायम महत्वाकांक्षी आणि स्पर्धात्मक असायला हवे. नेतृत्व महत्वाकांक्षी असले की विविध शासकीय कामकाजांना गती मिळते. आकलन आणि विश्लेषन क्षमता नेतृत्व कडे असेल तर आजूबाजूला घडणार्याक बारीक सारीक घटना यांचे आकलन प्रशासकीय नेतृत्वास सहजपणे होवू शकते. एकदा अशा घटनांचे आकलन झाले की त्या बाबत विश्लेषण करून निर्णय जलदगतीने घेता येतात. शासकीय अधिकार्या्ने प्रशासनात नेतृत्व करत असताना आपल्या वागण्यात लवचिकता ठेवणे आवश्यक ठरते. अशी लवचिकता असेल तर कोणत्याही चढ आणि उतार यावर त्याला सक्षमपणे काम करता येते. अभ्यासपूर्ण न्याय निवाडा किंवा न्यायनिर्णय हा नेतृत्वाबाबत सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करतो. दैनंदिन घडणार्याण कठीण समस्यांवर उपाय योजनेसाठी उत्कृष्ट नेतृत्व आवश्यक असते. स्व: विश्वास, स्व: खात्री, स्व: सन्मान, स्व: शोध आणि स्व: जाणीव ह्या बाबी नेतृत्वाला अजून उजवे बनवतात. भावनिक स्थिरता प्रशासकीय नेतृत्व मध्ये खूप आवश्यक असते. प्रशासकीय नेतृत्वामध्ये सचोटीपणा, विश्वासू पणा, तत्वनिष्ठपणा, सुसंगतपणा, निर्भयता, एकनिष्टता ,प्रामाणिकपणा याची नितांत गरज असते. हे गुणवैशिष्ट्ये प्रशासकीय नेतृत्वाला एका ठराविक उंची वर घेवून जाण्याचे कार्ये करतात. सरते शेवटी प्रशासकीय नेतृत्वामध्ये सामाजिकता, अनुकुलनता, बहिर्मुखपणा ,लवचिकपणा हे गुण विशेष करून असावे लागतात तरच लोक या नेतृत्वाचा स्वीकार करतात. एकंदर प्रशासकीय नेतृत्व हे या सर्व गुणांचा आविष्कार असेल तर सुप्रशासन मजबूतपणाने अस्तित्वात येते.
प्रशासनातील नेतृत्व हे हे सुप्रशासन अस्तित्वात आणण्यासाठी एक अनिवार्य अशी बाब आणि घटक म्हणून काम करत असते. असे नेतृत्व फक्त त्यांच्या कार्यालयातील समूहाचे नेतृत्व करत नसून त्यांच्या प्रशासकीय कामकाज कार्ये क्षेत्रातील सर्व घटकांचे ते नेतृत्व करते. नेतृत्व करणे ही एक कला असून ती उपरोक्त नमूद गुण वैशिष्ट्याचा अंगीकार केल्याने ती खुलते आणि फुलते. नेतृत्वाला नेतृत्व आवडते ही एक वस्तुस्थिती आहे, हे मान्य करावेच लागते. नेतृत्व भक्कम असले की यंत्रणा उत्साहपूर्वक कामाला लागते. एकदा यंत्रणा कामाला लागली की प्रशासकीय कार्यक्रम, योजना आणि उपक्रम हे नेटाने राबवले जातात. ही उत्साहपूर्णता आणि जोशपूर्णता प्रशासकीय ध्येये आणि उदीष्टे तडीस नेण्यास आणि त्याचे फायदे गरजूवंत यांच्या मध्ये आणि योग्य लाभर्थ्यांमध्ये वाटण्यास अथवा विभागण्यास मदत करते. नेतृत्वाचा विश्वास त्याच्या बरोबरीने अथवा खालच्या उतरंडीवर काम करत असलेल्या समुहावर असला की असा समूह प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम करण्यास पुढे येतो. असे प्रशासकीय नेतृत्व असले की तो समूह फक्त पुढे येत नाही तर तो एकदिलाने कार्य सिद्धीस नेण्यास प्रयत्नाची परिक्रमा आणि परिश्रम करतो. समूह हा अखंड आणि कायम कार्यशील राहण्यासाठी प्रशासकीय नेतृत्वाचा मात्र कस लागतो. समूह म्हटलं की तेथे विविध प्रकारचे लोक आढळतात. अशा वेळी नेतृत्व हे अशा प्रकारे आपला करिश्मा दाखवते की समूहातील नकारात्मक लोक यांचा आवाज आणि विचार दबून जातो. त्यांनी कितीही उड्या मारल्या अथवा गदारोळ केला तरी भक्कम नेतृत्व समोर ते फिक्के पडतात. त्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेमध्ये समुहाच्या प्रगतीसाठी आणि एकंदर समुहाच्या माध्यमातून व्यापक लोकहित आणि जनहित साध्य करण्यासाठी नेतृत्वाला अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात.साहजिकच प्रशासकीय नेतृत्व हे सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक असावे लागते, तरच सुप्रशासनाची गाडी जोराने धावते.
अशा प्रकारे सूप्रशासनात सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक नेतृत्व तयार होणे अती आवश्यक ठरते. शासनाने आखलेली धोरणे, कार्यक्रम, योजना आणि उपक्रम याची अंमलबाजवणी विविध स्तरावर करत असतांना जर प्रशासकीय व्यवस्थेमध्ये नेतृत्वाचा अभाव असेल तर अकार्यक्षमतेची बाधा निर्माण होवून प्रशासनाबद्दल एक रोष निर्माण होतो. प्रशासकीय संरचनेमद्धे योग्य नेतृत्वाची निवड आणि त्या नेतृत्वाचे मागे ठामपणे आणि तेवढ्याच विश्वासाणे उभे राहणे तितकेच महत्वाचे ठरते. उचित नेतृत्व प्रशासकीय समुहास मिळाले की तो समूह अथवा ती संरचना अधिक कार्यक्षमपणे काम करते. योग्य गुण वैशिष्टे असलेले नेतृत्व तयार करणेसाठी विविध घटकांवर कार्यात्मक असे काम करावे लागते. योग्य आणि अचूक प्रशिक्षण आणि विकास याच्या माध्यमातून नेतृत्व कौशल्य वृद्धिंगत करता येतात. एकंदरच योग्य नेतृत्व आणि समूह कार्य कौशल्यांच्या माध्यमातून सुप्रशासन अस्तित्वात येते