श्रीमंताच्या मुलांचं सामाजिकीकरण कसं होतं?

श्रीमंत घराण्यातील मुलांचे संगोपन नेमकं कसं होतं? पैशांच्या, प्रसिद्धीच्या वलयात राहणाऱ्या मुलांचं सामाजिकीकरण होतं का? मुलांच्या मनात नेमकं काय सुरु आहे त्यांचा कल कशाकडे आहे हे श्रीमंत असलेल्या पालकांना कळत नाही का? मुलांच्या भोवती पैश्यातून येणाऱ्या वस्तू आणून देणं म्हणजे सर्व काही असतं का? वाचा तृप्ती डिग्गीकर यांचा महत्त्वपूर्ण लेख...;

Update: 2021-10-06 18:06 GMT

मला आर्यनचा पुळका नाही आणि सुशांतचाही नव्हता! पण कन्सर्न आहे !

( गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा झालीच पाहिजे)

आर्यन खानविषयी लिहिताना "लेकरं हे लेकरंच" असतात, या शब्दावर अनेकांनी आक्षेप घेतला. हा शब्द आर्यनला उद्देशून का वापरला? तो काही कुक्कुल बाळ आहे का? फार गुणी व निष्पाप आहे का? त्याचे पालक रग्गड पैसा असलेले आहेत. त्यांचा काय इतका पुळका? असे अनेक प्रश्नही आले.

आर्यन खान असो किंवा संजय दत्त यांना समाजभान यायला खूप अवधी लागला. टाडामध्ये अटक झाल्यावर संजय दत्तला थोडं भान आलं. म्हणजे यंत्रणांनी वठणीवर आणले. हे कुटुंबात होणे अपेक्षित होते तसे ते झाले नव्हते. त्यांच्या पालकांनी जे विश्व त्यांच्या भवती विणलं त्यातून या प्रवृत्ती व व्यक्ती समाजाच्या वाट्याला आल्या आहेत. या अर्थानेही यांची बाल्यावस्था संपण्यासाठी खूप वेळ लागला. त्यांचे शारिरीक वय वाढले पण सामाजिक भान नसल्याने बौद्धिक वय किती असाच प्रश्न अनेक हस्तीदंती मनोऱ्यात निपजलेल्या लेकरांच्या बाबतीत पडतो.

प्रसिद्धी, पैसा, कर्तृत्व, पब्लिक फिगर असलेल्या पालकांच्या मुलांकडून समाजाच्या अधिक अपेक्षा असतात. शिवाय त्या पालकांनी त्यांच्या मुलांकडून काय अपेक्षा केल्या होत्या हे प्रसिद्ध होत नाही. वटवृक्षाखाली वाढणाऱ्या झाडांना त्यांच्या हिश्श्याचं ऊन्ह-पाऊस लागत नाही, ही पण वास्तविकता असते. काहींच्या बाबतीत हेतुपुरस्सर त्यांना घडवलं जातं व यशही मिळतं. पण तो डोळसपणा किंवा समग्रता प्रत्येकात असतेच असे नाही.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव काही दिवसांपूर्वी ट्रोल झाले. एका पत्रकार परिषदेत जय शाह यांना इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नाही म्हणून नेटकऱ्यांनी त्यांच ट्रोलिंग केलं. यात जय शहा ट्रोल होण्यापेक्षाही ते अमित शाहंचे सुपूत्र हे नेटकऱ्यांसाठी महत्त्वाचे होते.


मुकेश अंबानींचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांनी प्रेरणादायी भाषण २०१७ मध्ये केले होते. यावेळी अनंत अंबानीची मुलाखत शाहरूख खानने घेतली होती. ही मुलाखतही अनेकांनी खिल्लीच्या रुपात घेतली होती. म्हणजे जे राहुल गांधींना पप्पू म्हणतात त्यांनी ही मुलाखत आवर्जून पाहावी.

फेब्रुवारी २०२१ मध्ये अर्जुन तेंडूलकरही ट्रोल झाला. आयपीएल लिलावात त्याचं नाव सगळ्यात तळाशी होतं म्हणून. म्हणजे अर्जुन तेंडूलकरने क्रिकेटमध्येच का यावे ? पासून ते अनेक पोस्ट पडल्या. टि्वटरवर तर प्रत्येक वेळी त्याची तुलना त्याच्या वडिलांशी होत होती. ती नेहमी होत राहील. कारण बाप से बेटा सवाईच असला पाहिजे असा आपला सोशल दबाव व अपेक्षा आहे. यावर पालक म्हणून सचिन व डॉ. अंजली यांना काय वाटते यापेक्षाही तो श्रीमंताघरी जन्मास आला यावर चर्चा अधिक. अर्जून लेकरू म्हणून त्याचा चॉईस नाहीये की त्याने कोणाच्या पोटी जन्म घ्यावा.

विजय मल्याचे चिरंजीव सिद्धार्थ मल्यांचे लॉचिंगही खूप ट्रोलिंगचे धनी झाले.

राहुल गांधी तर पप्पू आहेतच, यावर ठाम विश्वास भारतातल्या विरोधकांना आहे. ते पप्पू असण्याची कारणं त्यांच्या वंशावळीतच पुन्हा शोधली जातात. रेड सारी नावाचे पुस्तक जरूर वाचा. मला माझ्या मित्राने आवर्जून पीडीएफ पाठवली होती. त्याने पाठवली म्हणूनच आणि म्हणूनच मी वाचलीही. त्यात राजीव गांधी पायलट कसे व का झाले? याची प्रक्रिया दिलेली आहे. पालकांच्या प्रसिद्धी वलयापासून वेगळे आपले व्यक्तीमत्त्व आहे हे विशीतील राजीव यांना समजत होते. पण राजकीय वलायातून, गोतावळ्यातून सुटका मिळत नव्हती. त्यांना आकाशात भ्रमण करतानाच स्वत:चे व्यक्तीमत्व सापडत होते.

रेड सारीच्या लेखकाने राजीव यांच्या मनोवस्थेचे वर्णन फार मानवीपातळीवर येऊन केले आहे. लेकरं स्वत:ला कसे शोधण्याचा प्रयत्न करतात? पालकांच्या डोळ्यात त्यांना स्वत:ची छवी दिसली नाही तर ते काय काय साधनं वापरतात हे सुद्धा समजेल रेड सारीतला हा अध्याय वाचल्यावर .

मला आर्यन खान, टाडामधे अडकला होता तो संजय दत्त, आत्महत्या करणारा सुशांत सिंह राजपूत व त्यानंतर सुशांतच्या लाईफस्टाइलविषयी आलेल्या चिक्कार स्टोरीज यामध्ये फार स्वारस्य कधीही नव्हतं. पण त्यांच्याविषयी जेव्हा सतत बातम्यांचा महापूर येतो त्यानंतर काही प्रश्न निश्चितच व्यक्ती म्हणून पडतात. व्यवस्था म्हणूनही पडतात.

बॉलीवूड स्कूप्स, पेज थ्री जर्नालिझम हा मजकूरही कधीच माझ्यासाठी महत्त्वाचा नव्हता. पहिला प्रश्न पडतो तो लोक यांना जितकं प्रेम देतात तितक्याच प्रमाणात ट्रोलही करतात. हे ट्रोलिंग सोशल मीडियाचं पेव फुटलं म्हणून अधिक जाणवतं. पण सोशल मीडियापूर्व काळातही हे ट्रोलिंग होत होतं. पण प्रसिद्धी निगेटीव्ह असो की पॉसिटीव्ह ती प्रसिद्धीच असते या नियमाप्रमाणे तारे-तारका त्याचा संपूर्ण फायदा घेतात. लाईटली घेण्याचं ट्रेनिंगही अनेकांना असतं. आर्यन खान माझा आदर्शही नाही व त्याचे पालकही माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत नाहीत. लेकरं हे लेकरंच असतात हे म्हणण्यामागे मला एक सामूहिक असा मोठा कॅनव्हास दिसतो.

१. औरंगाबाद शहरातील अतिशय उच्चभ्रु लोकांची म्हणून ओळखली जाणारी एक शाळा. तिथं माझ्या स्नेही असलेल्या एका महिलेचा मुलगा १२ वी पर्यंत शिकला. नंतर प्रवरा या नगर जिल्ह्यातील महाविद्यालयात तो शिकण्यास गेला. तिथंल जेवण, निवासाची सोय त्याला काही मानवेना. ज्या शाळेत तो शिकला तिथंल वातावरण म्हणजे त्याच्यासारख्याच मखमली वातावरणातून आलेली क्यूटी पाय टाइप मुलं , कार्पेट टू कार्पेट चालणारी माणसं त्यानं शालेय जीवनात पाहिलेली. प्रवरा येथील वर्गातील मुलांशीही त्याची मैत्री होईना. पोट सारखं खराब होतं होतं. म्हणून तो सारखा सारखा औरंगाबादला घरी येत होता. आता यात मला जे वाटलं होतं ते असं की तो सगळ्या समाजात मिसळलेला नव्हता. प्रत्येक आर्थिक स्तरातील मुलांची वाढ, त्यांच्या सवयी त्याला माहित नव्हत्या. एका अतिसुरक्षित वातावरणात तो वाढला. त्याचा त्याला संवादातही त्रास होत होता. तो वयाने वाढला असला तरीही प्राप्त परिस्थितीशी समायोजन करणे त्याला कठीण जात होते. १२ वी नंतरच तो अशा एका वातावरणात गेला जे त्याच्या कल्पनेच्या पलिकडचे होते. त्यात त्या मुलांचा काय दोष? त्यानं कुठं जन्माला यावं हा त्याचा चॉईस होता का? मग जबाबदारी कोणाची होती? जर बाल्यावस्थेत तुम्हाला तुमचा आसपास माहितच नसेल तर सामाजिकीकरण कसे होणार? योग्य वेळी त्यांना त्या प्रक्रियेत टाकण्याची जबाबदारी कोणाची?

२. टिपिकल वाणी माणूस काय करतो? यावर एकदा गप्पा मारत असताना एक किस्सा ऐकला. मुल १२-१३ वर्षांच झालं की बाप त्याला गल्ल्यावर बसवतो. बापाला माहिती असतं की गल्ल्यात किती पैसा आहे. पोरगं त्याच्या स्वभावानुसार त्यातील पैशाचा उपयोग करेल हे पण त्या पालकांना माहित असत. पण ते त्याला मुभा देतात. चुकायची. चुकत चुकत शिकण्याची. मग ते पोरग त्या पैशाचा कधी मोहापायी वापर करतं. त्यानंतर पुन्हा हिशोब लागला नाही की धंद्यातील फटका पण ते अनुभवतं. त्यातून व्यापारी-वाणी म्हणून ते तयार होत जातं. पण काही वर्षे त्याला त्याच्या स्वभावानुसार पालक स्वीकारतात हे यात महत्त्वाचे. चुकांमधून शिकू देतात हे पण महत्त्वाचं. त्यातून ते लेकरू परिपक्व होऊन व्यवहार शिकतं. त्याच्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत पालक अडथळा ठरत नाहीत.

३. माझ्या घरातील उदाहरण. लॉकडाऊनमध्ये माझ्या नात्यातील मुलीने चॉकलेट करुन विकले. इंस्टाग्रामवरून त्याचा प्रचार केला. अत्यंत सुंदर पॅकींग करून प्रोफेशनल चॉकलेट बॉक्स तयार केले. अनलॉकनंतरही शाळा सुरु झाली नाही. मग तिने होम डिलेव्हरी दिली. १६-१७ वर्षांची मुलगी होम डिलेव्हरी देते म्हटल्यावर घरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. तुला काय गरज आहे दारोदार फिरायची? त्यावर तिचं उत्तर असं होतं की मला उद्या हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घ्यायचाय. इगो ठेवून या क्षेत्रात यश मिळत नाही. तिथं ट्रेनिंग दरम्यान कमोडही साफ करायला लावतात. डिलेव्हरी द्यायला गेल्यावर तिच्याच वयाच्या एका ग्राहक मुलीने पाचशेची नोट तिच्या हातात न देता गेटमधून भिरकावली. हे पाहून त्या ग्राहक मुलीच्या वडिलांनी तिला झापझापले. हा किस्साही तिने आमच्याशी शेअर केला. पण या सगळ्या प्रसंगातून तिला आसपास समजला. मानवी प्रवृत्ती समजली.

४. माझ्या परिचयातीलच एका कुटुंबातील मुलाकडे इअर फोन ३० हजारांचा आहे. मला आश्चर्य वाटलं. त्या घरातील आर्थिक परिस्थिती फार मजबूत नाही. पण १७-१८ वर्षांच्या त्या मुलाला इअर फोन्सचे फार आकर्षण म्हणून तो त्याला घेऊन देण्यात आला. एकुलतं एक लेकरू म्हणून आईलाही वाटतं त्याला काही काही कमी पडू नये. जोरजोरात आवाज करणारी बाईकही त्याला आवडते. या दोन्ही वस्तूंमध्ये वाईट काहीही नाही. मात्र त्या मुलामधे आणि आईमधे होणारे भांडणं, संघर्ष हा देखील पराकोटीचा आहे. हे का होते? जर तुम्ही मुलांची सगळी आवड निवड जपता तर ते संवादी का होत नाहीत? वस्तू दिल्याने नाते मजबूत किंवा स्मूद होते असे असते का?

५. आपण जर दररोज दैनिकं वाचत असाल तर क्राईमच्या बातम्यांवर नक्की नजर टाका. त्यातही स्थानिक बातम्यांच्या ज्या पुरवण्या असतात त्यावर नजर टाका. त्यात १७ ते ३० या वयोगटातील दोरखंड बांधलेली तरूण मुले जेरबंद झाल्याच्या दोन-तीन बातम्या फोटोसह हमखास दिसतात. त्यांनी काय चोरलेलं असते? बहुतांश बातम्यात त्यांनी किरकोळ चोऱ्या केलेल्या असतात. वाहने फोडलेली असतात. ही तरुण मुलं कोणाची जबाबदारी आहेत? त्यांच्या पालकांची ? त्यांची शिक्षणापर्यंत पोहोच निर्माण झाली होती का? त्यांच्या अंगी जी कौशल्ये उपजत होती त्यावर कधीतरी त्यांच्याशी कोणी बोलले होते का? अनेक जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. पण प्रत्येकजण तसे असत नाही. ही पोरं परिस्थितीची अपत्ये आहेत. यांना लेकरं म्हणू नये हे बरोबर जरी असेल तरीही त्यांना ते लेकरं असतानाही कोणी गोंजारलेले नसते हे समाजाचे वास्तव आहे.

६. शहरातील काही सिग्नलजवळ बारा महिने चार-पाच वर्षांची पोरं भीक मागत असतात. पण ती कोण आहेत? हे पाहाण्याची जबाबदारी कोणाची आहे? असे प्रश्न आपण विचारतो का? यातीलच एखादा मोठा होऊन कदाचित मोठी चोरीही करू शकतो. मग तो अमक्या अमक्या जातीचा आहे म्हणून मथळेही छापून आलेले आहेत. विजय माल्याने बँका बुडवल्या, निरव मोदीनेही तेच केले. यांच्या बातम्यांच्या मथळ्यात कधी त्यांच्या जातीचा उल्लेख कोणी वाचलाय का? मात्र काही वर्षांपूर्वीपर्यंत पारध्याच्या पोरांनी असे केले असे ठळक मथळ्यात वाचलेले मला तरी आठवते. तुम्ही गुन्ह्यांना जात-धर्म शोधता? त्या समाजातील एखादं लेकरू कर्तृत्व गाजवेल या आशा त्यांना लेबलिंग केल्यामुळेही संपुष्टात येतात. आपण माणसं अशी घडवतो. -----ही झाली आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केलेल्या व्यवस्थेतील काही लेकरं. प्रत्येक व्यक्ती हे परिस्थितीचं अपत्य असते. आता फक्त बॉलीवूडविषयी बोलू.

शाहरूख खानच्या अनेक मुलाखती काल काटछाट करून व्हायरल झाल्या. त्याची एक मुलाखत मलाही आठवली. त्यात त्याने आर्यनसाठी स्मार्ट रूम कशी तयार केलीये याविषयी त्यानं सांगितलं होतं. म्हणजे जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज सगळे गॅझेट त्यात असल्याचं त्यानं सांगितलं होतं. मुलांच कल्पनाविश्व समृद्ध करण्यासाठी स्टारवॉर्सपर्यंतच जग त्यांच्यासमोर पेश केलं जावे असेही त्याच्या बोलण्यातून जाणवले. पण यासाठी मुलांचा कल काय? हा बेसिक प्रश्नही महत्त्वाचा असतो. गॅझेटचा वापर दुधारी तलवारीसारखा असतो. खूप क्रिएटीव्ह व अगदी टाईमपास असा दोन्ही. मग आपण त्यांच्या बेसिक इंस्टीक्ट समजून न घेता पैशातून जे जे मिळतं ते ते त्यांच्या पुढ्यात आणल्याने फायदा काय?

अभिषेक बच्चनचे काही चित्रपट आपटल्यावर त्याची मुलाखतही पाहिली होती. महानायकाचा मुलगा म्हणून एक बॅगेज घेऊन तो अभिनयात उतरला. सारखी त्याची तुलना वडलांशी होत राहिली. ट्रोल्सनी काय लिहिलं नाही? त्या सगळ्यांना मी वाचतो असंही अभिषेक म्हणाला. पण मी स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच काम करतो आहे. वडील महानायक आहेत हे स्वीकारून मी माझ्या हिश्स्याच काम करतोय. वारसा असल्याने संधी मिळते हे वास्तव असलं तरीही त्यामुळे टिकून राहूच असं काही नाही.

सैफ अली खानच्या पहिल्या चित्रपटावेळी त्याच्या चेहऱ्याच्या ठेवणीवर खूप कमेंट झाल्या. बायकी चेहऱ्याचा म्हणून त्याला हिणवलंही गेलं. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. पण आंबटशौकीनांच्या पुरवण्या होत्याच. हम तुम, आरक्षण, तांडव अशा अनेक चित्रपटातून त्यानं स्वत:ला सिद्ध केलं. कोणाच्या पोटी जन्माला येतोय याचे फायदे असतात तसे तोटेही असतात. म्हणजे प्रतिष्ठीत घरातील सगळीच मुलं वाया गेलेली असतात किंवा त्या प्रतिष्ठेच्या वलयाचा ते गैरफायदाच घेतात असा निष्कर्षही काढता येत नाही.

ज्यांनी ज्यांनी मला काल आर्यन खानची बाजू घेते म्हणून गुन्हेगार ठरवलं त्यांना एक विनंती आहे की, त्यांनी तितकेच प्रश्न उद्या आर्यनच्या केसमध्ये जे काही निष्कर्ष येतील त्यावरही तितकेच प्रश्न संबंधीत यंत्रणेला विचारावेत. परमवीर सिंह कुठे व कोणाच्या आशीर्वादाने गेले? यावरही त्यांनी तितकेच प्रश्न करावेत. शिवाय लखीमपूर खेरीतील भाजपा नेते मोनू टेनी यांच्यावरही कोणते संस्कार होते? यावरही बोलले पाहिजे. या उप्पर गुजरातेत अडाणींच्या खासगी बंदरावर सापडलेला अंमली पदार्थांचा साठा तालिबान्यांच्या अफगाणिस्तानातून कसा आला हे पण समजावून सांगावे. कंदाहर कनेक्शनमधून आलेला ३००० किलो हेरॉईन अधिकृतरीत्या संस्कारीत असलेल्या अडाणींच्या बंदरावर यावे याबद्दल कसा प्रश्न पडत नाही? जे आडात असते ते पोहऱ्यात येते हे पण सुज्ञांना कळू नये का?

यापेक्षाही मूलभूत गोष्ट म्हणजे न्यायपालिकांमध्येही समुपदेशनाला प्रचंड महत्त्व आहे. कारण आपण ज्याला न्याय म्हणतो तो देखील हेच मान्य करतो की गुन्हेगार हा एकटा घडत नाही. परिस्थिती व समाज त्याला घडवतो. त्या परिस्थितीतून व मानसिकतेतून गुन्हेगारांना बाहेर काढण्याचाच प्रयत्न जगातील सर्व न्यायालये करत असतात. याचे कारण असे की व्यक्तीपेक्षा न्यायाचा लढा प्रवृत्तींशी असतो.

©️ तृप्ती डिग्गीकर

Tags:    

Similar News