Lata Mangeshkar : दुखवटा म्हणजे सुटी असलीच पाहीजे का.....?, दिवसभर मी नेमके काय केले...?
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राज्य सरकारने एक दिवसांची सार्वजनिक सुटी दिली. त्यावर हेरंब कुलकर्णी म्हणाले...
दुखवटा म्हणजे सुटी असलीच पाहीजे का.....?
दिवसभर मी नेमके काय केले...?
लता मंगेशकर यांच्या मृत्यूमुळे राज्यात सुटी जाहीर करण्यात आली. दिवसभरात लतादीदींचे काय स्मरण केले ? लेख वाचले, गाणी ऐकली पण यासाठी दिवसभर सुटी गरजेची होती का ? या सुटीमुळे एका व्यक्तीने कोर्टाची तारीख रद्द झाल्याने १३०० रु तिकिटाचे बुडाल्याचे फेसबुकवर सांगितले आहे. मुळात श्रद्धांजली वाहण्यासाठी व आदर व्यक्त करण्यासाठी सुटी हाच पर्याय आहे का ? याच्यावर आता चर्चा व्हायला हवी. जयंती, पुण्यतिथीत आदर व्यक्त करण्यासाठी सुटी हाच पर्याय निवडला जातो आणि प्रमुख व्यक्ती वारल्यावर तर सुट्टी देणे हेच सर्वात सोपे साधन मानले जाते. त्या दुःखामध्ये कोणी काहीच बोलत नाही पण खरंच याचा आपण विचार करणार आहोत की नाही ?
जे. कृष्णमूर्ती यांच्या प्रेरणेने कृष्णमूर्ती फाउंडेशनने जगात शाळा सुरू केल्या. जे.कृष्णमूर्ती राजघाट वाराणसी, येथे जास्त राहत होते.मी त्या शाळेत गेल्यावर प्रश्न विचारला की कृष्णमुर्ती ज्या दिवशी वारले त्या दिवशी तुम्ही काय केले ? ते म्हणाले की कृष्णमूर्ती गेल्याची बातमी आली,दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मुलांना प्रार्थनेच्या वेळी सांगितले. श्रद्धांजली वाहिली व शाळेचे काम नियमित सुरू राहीले.
शाळेच्या संस्थापक व्यक्तीच्या मृत्यूनंतरही शाळा बंद राहिली नाही. हे कृष्णमूर्ती शाळेचे वेगळेपण आणि आपल्याकडे न्यायालयापासून सगळे काही आज बंद राहीले...
हे मान्य आहे की श्रद्धांजली कशी वाहायची ? त्या व्यक्तीप्रति आदर कसा व्यक्त करायचा ? त्या व्यक्तीच्या फोटोला हार घालून श्रद्धांजली सभा घेणे हे नक्कीच करता येईल किंवा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आज प्रत्येक कार्यालयात शाळा-कॉलेजात दुपारनंतर त्यांची गाणी एकत्रित ऐकणे; त्यांच्यावर आलेले सर्व लेख एकत्र वाचणे असे करता आले असते पण असे सकारात्मक उपाय अजिबात केले जात नाहीत.
डॉक्टर अब्दुल कलाम यांनी माझ्या मृत्यूनंतर सुटी देऊ नका असे म्हटले होते परंतु त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा सर्वत्र सुटी देण्यात आली कारण ती सुटी थांबवायला ते जिवंत नव्हते.
जयंती पुण्यतिथीला दिल्या जाणाऱ्या सुट्टीमध्ये तो महापुरुष सामान्य माणसापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत कर्मचाऱ्यांपर्यंत नीट पोहोचत नाही कारण घरी विद्यार्थी,कर्मचारी राहिल्यामुळे त्यांच्यावरची भाषणे होत नाहीत. उलट शाळा कॉलेज कार्यालय सुरू राहिली तर त्यांच्या विचारांवर चर्चा भाषणे असे काही होऊ शकते..
असे अनेक सण आहेत की त्या सुटीच्या दिवशी काहीच काम नसते उदारणार्थ आषाढी एकादशीच्या दिवशी,रामनवमीची सुटी असेल तर जवळच्या विठ्ठल मंदिरात जाणे पलीकडे दुसरे काय करतो ? ज्या शाळेत एकही ख्रिश्चन विद्यार्थी नाही तिथे १० दिवस नाताळाची सुटी असते आणि एकही पारशी नसलेल्या जिल्ह्यात पारशी दिनाची सर्वत्र सुटी असते..अन्य धर्मीय सणाच्या सुटीच्या दिवशी तर इतरांनी काय करावे हा प्रश्नच असतो ..!!!
तेव्हा या विषयावर अनेकदा चर्चा झाल्या सुटी नको हे सर्वजण म्हणतात पण टाळण्यासाठी किंवा बदलण्यासाठी सकारात्मक पर्याय व्हायला हवेत त्याचा एखाद्या संस्थेने पाठपुरावा करायला हवा सर्व सुट्ट्यांचे कॅलेंडर समोर ठेवून या सुट्टीची गरज काय या सुटीऐवजी असे करायला हवे असे पर्याय मांडायला हवेत.
सणांसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला ७ राखीव सुटी द्यावी अशी सूचना अनेकदा आली आहे ..हिंदू व्यक्ती हिंदू सणांसाठी मुस्लिम व्यक्ती मुस्लिम सर्वांसाठी ती सुट्टी घेईल व जास्त सुट्ट्या हव्या असतील तर त्यासाठी रजा काढावी अशी एक सूचना अनेकदा मांडली जाते त्याचाही विचार करायला हवा...
शाळा, महाविद्यालये ही किमान १४५ दिवस बंद असतात ,रविवार वगळता किमान ३०० दिवस तरी ती चालायला हवी यासाठी धोरण आवश्यक आहे..मे महिना,दिवाळी,नाताळ या सुटी खरेच गरजेच्या आहे का...?
लता मंगेशकर यांच्या दुखवटा सुटीच्या निमित्ताने लता मंगेशकर यांच्यासाठी मी काय आदर व्यक्त केला ? हे मला स्वतःला सांगता येणार नाही तर इतरांचे मी काय बोलू...?
सुटीला पर्याय काय असू शकतो ? आदर व्यक्त कसा करायला हवा .. यावर जरूर व्यक्त व्हावे
- हेरंब कुलकर्णी