सह कलाकारांना त्रास देऊन कला-संस्कृतीचे गोविंदाने किती भान ठेवले ? महेश टिळेकर,चित्रपट दिग्दर्शक

अभिनेता गोविंदा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. गोंविदा यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. यापार्श्वभूमिवर सिनेमातील कला आणि राजकीय प्रभावावर प्रकाश टाकणारा महेश टिळेकर यांचा सविस्तर लेख

Update: 2024-03-29 03:39 GMT

खरं तरं त्याने पुन्हा राजकारणात येणं, एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करणं याला विरोध नाहीच. पण राजकीय प्रवेश करताना जे कारण सांगितलं त्यानं की कला संस्कृतीसाठी तो राजकारणात परत येत आहे हे ऐकून याची अवस्था म्हणजे ' ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या '.अशी आहे.

यशाच्या शिखरावर असताना जेंव्हा गोविंदा स्टार होता तेंव्हा ही त्याला कला संस्कृती साठी काम नक्कीच करता आलं असतं. तेंव्हा तर त्याचं नाव खूप होतं, पण तेंव्हा हे असलं काही का सुचू नये त्याला? ज्या कला ,संस्कृती ची भाषा हा आत्ता करतोय तेंव्हा तो ज्या अभिनय क्षेत्रात काम करत होता, त्या कला क्षेत्रातील लोकांबरोबर ( निर्माते, दिग्दर्शक, सह कलाकार) यांच्या बरोबर हा कसा वागला ,किती माज दाखवला हे त्याने आठवून पहावं. त्याच्या बरोबर काम केलेल्या अनेक कलाकारांनी त्याच्या शूटिंगला उशिरा येण्यानं,कधी कधी तर न येण्यानंही निर्माता दिग्दर्शक यांचं किती नुकसान झालं याचा त्याने निदान आता उतरत्या काळात तरी विचार करावा.त्याच्या बरोबर हिरोईन म्हणून काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने तर सांगितलेला किस्सा आजही आठवतोय मला, आऊटडोअर शुटिंगसाठी जाताना गोविंदाची फ्लाईट 9 ची असेल तर, त्या नंतर च्या ज्या फ्लाईट असतील त्याचं ही बुकिंग निर्मात्याला करून ठेवावं लागायचा, कारण हा 9 च्या फ्लाईट ला वेळेवर पोहोचेलच याची शाश्वती नसायची. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांनी तर गोविंदा बरोबर काम करतानाचा एक अनुभव मला खूप वर्षांपूर्वी सांगितला होता. एका सिनेमात सीमा देव, कादरखान यांच्या बरोबर गोविंदा हिरो होता. शूटिंगच्या एका दिवशी सकाळी 9 वाजता येणं अपेक्षित असलेला हा स्टार संध्याकाळी 4 वाजता सेट वर पोचला. पोचल्यावर सीमा देव यांना उशिरा येण्याचं कारण सांगितलं की टिव्ही वर मीनाकुमारी यांचा एक अप्रतिम सिनेमा लागला होता.. तो पाहत असताना वेळेचं भान राहिलं नाही त्याला.


 



ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी अभिनयातून निवृत्ती घेण्याला कारणीभूत गोविंदा असल्याचं बोललं जातं. एका चित्रपटात आशा पारेख, शशी कपूर आणि गोविंदा होते. हॉस्पिटलचा एक सीन होता, सकाळ पासून सगळे कलाकार गोविंदाची वाट पहात होते..सीन साठी शशी कपूर यांना स्ट्रेचरवर झोपवण्यात आले होते. गोविंदा आला आणि " चलो टेक करते है " असं म्हणाला तसे स्ट्रेचर वरून उठत " मेरा पॅकप हो गया " म्हणत शशी कपूर रागाने जाऊ लागले.. पण इतका मोठा सिनियर कलाकार आपल्यामुळे चिडला आहे, आपण त्यांना अनेक तास ताटकळत ठेवले आहे, याचे कसलेच भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसले नाही, माफी मागणे तर दूरच.. काही काळ तर त्याने त्याचा वैयक्तिक एक ज्योतिषी पण ठेवला होता आणि तो सांगेल तसं हा वागायचा ज्यामुळे इतरांच्या मात्र नाकेनाऊ यायचे.


 



फिल्म इंडस्ट्रीत नेहमी ' चलती का नाम गाडी ' ही रीत च आहे. एखादा स्टार यशाच्या शिखरावर असताना, त्याच्यामुळे सिनेमे हिट होतात म्हणून त्या त्या वेळी त्याला सहन केले जाते पण एकदा का उतरती कळा लागली की मग त्याच एकेकाळच्या स्टारला कुणी विचारत नाही, आधीच्या स्वभावामुळे नंतर तुम्ही कितीही सौजन्याचा मुखवटा घातला तरी सिनेमात काम मिळणं कठीण होतं, लोकांचं आटलेले प्रेम आणि ओसरलेली लोकप्रियता एकेकाळच्या अश्या स्टार ला खायला उठते.. मग जनमानसात पुन्हा येण्यासाठी कलाकारांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, कला संस्कृती जपण्याची इच्छा अशी गोंडस नावे घेऊन लोकांसमोर यायची धडपड सुरू होते. आपण स्टार असताना जेष्ठ श्रेष्ठ आणि सह कलाकारांना त्रास देऊन कलेचं, संस्कृतीचे किती भान ठेवले हा प्रश्न आरशात पाहून स्वतः ला विचारून बघावा.. आणि मागच्या केलेल्या चुका सुधारण्यासाठी ही चांगली संधी आहे असं मानून आपलं योगदान द्यावं. शुभेच्छा

महेश टिळेकर

Similar News