महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांचे भाषण
दिनांक १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मुंबई येथे आयोजित शासकीय कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे महाराष्ट्र दिनाचे भाषण...;
बंधू आणि भगिनींनो,
१. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील मराठी जनतेला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
२. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडला आहे, त्यांचे स्मरण ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.
३. छत्रपती शिवरायांच्या कर्तुत्वाने महाराष्ट्र ओळखला जातो. महात्मा जोतीराव फुले, क्रांतीजोती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर अशा अनेक विभूतींनी महाराष्ट्राला सामाजिकदृष्ट्या समृद्ध केले.
४.कोरोनाच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रीतीने सामना करीत असताना आपल्या राज्याने देशात एक उदाहरण निर्माण केले आहे. राज्यातल्या ९२ टक्क्यांपेक्षा अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा कमीत कमी एक डोस दिला असून उर्वरित लसीकरण गतीने पूर्ण होत आहे.
कोविड काळ असूनही राज्याने प्रगती आणि विकास यात कुठेही खंड पडू दिला नाही. महाराष्ट्राने देशातले १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य होण्यासाठी विकासाची पंचसूत्री ठरविली आहे.
५. नीती आयोगाने जाहीर केलेल्या Export Preparedness Index मध्ये महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, हे सांगताना आनंद होत आहे. केंद्र शासनाच्या 'सुशासन निर्देशांक अहवाल - २०२१'मध्ये महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळविले आहे.
६. इलेक्ट्रिक वाहनांबाबत माझ्या शासनाने तयार केलेले धोरण व्यापक आणि सर्वांगिण असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी १५७ टक्क्यांनी वाढली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या नागरिकांना तसेच गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्ता करात सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय माझ्या शासनाने घेतला आहे.
७. ग्रामीण भागात महाआवास योजनेतून पावणेपाच लाख घरे देण्यात आली तसेच जल जीवन मिशनमध्ये १७४ पाणीपुरवठा योजना सुरु होत आहेत. १०० कोटी रुपये रकमेचा स्टार्टअप फंड उभारण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात होतकरु युवक-युवतींच्या मंजूर प्रकल्पांतून सुमारे ११०० कोटी रुपये गुंतवणूक होत आहे.
८. कोरोना संकटकाळात गरीब आणि गरजूना शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आली. सध्या राज्यात १ हजार ५४९ शिवभोजन केंद्रे सुरु असून ९ कोटी १८ लाख इतक्या शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.
९. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुदानाचा लाभ अंदाजे २० लाख शेतकऱ्यांना होणार आहे. सिंचनासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण व्यवस्था निर्माण करीत आहोत. विकेल ते पिकेल अभियानात शेतकऱ्यांचे विविध गट स्थापन केले असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे.
१०. शेतकऱ्यांसाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना सुरु केली आहे. मनरेगा आणि राज्य रोहयोमधून राबविण्यात येत असलेल्या या योजनेसाठी सुमारे १६ हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे पाणंद रस्ते बांधत आहोत.
११. राज्यातील निर्यातीत वृद्धी करण्यासाठी राज्याचे स्वतंत्र कृषी निर्यात धोरण तयार करण्यात आले असून २१ पिकांसाठी क्लस्टरनिहाय फॅसिलिटेशन सेल गठीत करण्यात आले आहेत.
१२. राज्य शासनाने दिल्ली-मुंबई कॉरीडॉरलगत रायगड जिल्ह्यात २ हजार ५०० एकर क्षेत्रावर बल्क ड्रग पार्कचे नियोजन केले आहे. तसेच औरंगाबाद नजीक बिडकीन येथील ऑरीक स्मार्ट सिटीमध्ये ३५० एकर क्षेत्रावर पायाभूत सुविधांनीयुक्त वैद्यकीय उपकरण पार्कचे नियोजन केले आहे.
१३. पर्यावरणपूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्याकरिता नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कराचा दर १३.५ टक्यावरुन कमी करून ३ टक्के इतका केला आहे, त्यामुळेही नागरिकांना दिलासा मिळत आहे.
१४. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी व्हावा यासाठी प्रवासी जलवाहतुकीला माझे शासन चालना देत आहे. नवी मुंबईतील बेलापूर येथून मुंबई, एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावर वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली आहे. पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जेट्टींची कामे सुरु आहेत.
विमान वाहतुकीला चालना देण्यासाठी माझ्या शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. सिंधुदूर्ग (चिपी), नांदेड, गोंदीया, जळगाव, कोल्हापूर आणि नाशिक विमानतळावरुन विमानसेवा सुरु आहे. शिर्डी विमानतळाचा डिसेंबर २०२१ अखेर दहा लाख प्रवाशांनी वापर केला आहे.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मेट्रो प्रकल्पांच्या कामांना अधिक गती देण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल्वे लाईन २ अ तसेच मुंबई मेट्रो रेल्वे लाईन ७ चे टप्पे वाहतुकीसाठी सुरू केले आहेत. मेट्रोच्या विविध १४ प्रकल्पांचे काम वेगाने सुरु आहे.
मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प प्रगतिपथावर आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होत आले असून लवकरच तो वाहतुकीसाठी अंशतः खुला करण्यात येईल.
मुंबईतील सागरी किनारा प्रकल्प, पुणे शहराभोवतालचा चक्राकार वळण मार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ, खोपोली ते खंडाळा या घाटात नवीन मार्गीकेचे बांधकाम, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, ठाणे खाडी पूल, ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती महामार्ग, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वर्सोवा-विरार सागरी मार्ग प्रकल्प, विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका अशा विविध प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे.
१५. परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या एकूण ११५ सेवांपैकी ८४ सेवा पूर्णत: ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. मुद्रांक शुल्क आकारणीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात आला आहे.
१६. सौर ऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी राज्यात महानिर्मिती कंपनीकडून एकूण १८७ आणि ३९० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत १ लाख सौर कृषी पंप उद्दिष्टापैकी एकूण ९९ हजार ८५२ सौर कृषी पंप लावण्यात आले आहेत.
१७. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास करण्यास माझे शासन कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक, आदिवासी, ऊसतोड कामगार किंवा असंघटित कामगार असो, सर्व दुर्बल घटकातील नागरिकांसाठी मदतीचा हात राज्य शासनाने दिला आहे.
आपत्तीरोधक कामे करून आपत्तीमुळे कमीत कमी हानी व्हावी यासाठी माझे शासन प्रयत्नशील आहे.
१८. शहरे कार्बन न्यूट्रल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील ४३ अमृत शहरे रेस टू झिरोमध्ये सहभागी झाली आहेत.
१९. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा याकरिता शासन केंद्राकडे पाठपुरावा करीत आहे.
२०. मुंबई येथे मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन झाले आहे.
२१. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणार आहेत.
२२. राज्यातील गड आणि किल्ल्यांचे तसेच प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. नवी मुंबई येथे तिरुमाला तिरूपती देवस्थानास व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी जमीन देण्याचा निर्णयही घेतला आहे.
२३. व्याघ्र संरक्षणाच्या कामासह राज्यातील राखीव वनक्षेत्रात वाढ, नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांची निर्मिती, जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती याला माझ्या शासनाने प्राधान्य दिले आहे. राज्याच्या वृक्षाच्छादनासह कांदळवन क्षेत्रातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
२४. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या दृष्टीने एक नवीन आणि बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करतो.
पुन्हा एकदा, महाराष्ट्र दिनाच्या या मंगल प्रसंगी राज्यातील जनतेला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!