मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब एक अधिवेशन होऊनच जाऊ द्या!: हेमंत पाटील

राज्यात महिला अत्याचाराचे सत्र सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत कोशारींचं म्हणणं ऐकलं पाहिजे होतं. महिला सुरक्षितेसाठी अधिवेशन घेणं किती महत्त्वाचं होतं ? जाणून घ्या राजकीय विश्लेषक हेमंत पाटील यांच्याकडून...;

Update: 2021-09-26 04:16 GMT

राज्यात महिला अत्याचाराचे सत्र सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्याचे राज्यपाल भगत कोशारी यांनी विधीमंडळ अधिवेशन घेण्याची विनंती सरकारला केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून देशातील भाजपशासीत राज्यामधील परिस्थिती मांडली होती यावर राजकीय विश्लेषक हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधिवेशन घेण्याची विनंती केली आहे.

माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब,

स.न.वि.वि.

साकीनाका परिसरात झालेल्या बलात्काराच्या घटनेमध्ये मुंबई पोलिसांनी त्वरित हालचाल करून आरोपीला पकडलं. पीडित महिलेवर औषधोपचार सुरू केले. दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमावर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालू होईल आणि त्याला शिक्षा मिळेल.

या घटनेचे औचित्य साधून प्रथेप्रमाणे भाजपने महाविकास आघाडी सरकार विरुद्ध बोंब सुरू केली. राज्यात महिला सुरक्षित नाहीत असे सांगायला सुरवात केली. मीडिया सुद्धा याच विचाराने प्रेरित होऊन भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया सतत दाखवत सुटलेत.

यात आपण सुद्धा मागे का असा विचार करून महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशारींनी राज्यातील महिला अत्याचारावर दोन दिवसांचे अधिवेशन घ्यायची सूचना केली. कोशारींची राजकीय हुशारी ओळखून आपण त्यांना देशातील इतर राज्यांच्या, विशेष करून भाजप शासित राज्यात महिलांच्या सुरक्षेचे कसे धिंडवडे काढले गेले हे दाखवले. विशेष अधिवेशन घेण्याचा कोशारींनी त्या त्या राज्य सरकारला द्यावा असा सल्ला सुद्धा आपण दिला.

उद्धव ठाकरे साहेब,

खरं तर महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशारींचा सल्ला ऐकून आपण दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवायला पाहिजे. आपण फार मोठी चूक केली असे वाटते.

• नुकताच पुण्यात एका समारंभात महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशारींनी एका महिला सायकलपटूचा चेहऱ्यावरील मास्क स्वत: च्या हाताने खाली घेतला. एखाद्या महिलेच्या गालालाच काय परंतु कोठेही तिच्या परवानगीशिवाय हात लावणे गुन्हा आहे. बस मध्ये काही आंबट शौकीन असतात. ते गर्दीचा फायदा घेवून महिलेच्या पार्श्वभागाला किंवा छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. कोशारींचा प्रयत्न त्यातलाच असावा.. अधिवेशनात त्यावर चर्चा झाली असती..

•2018 साली भाजपचे बनवारीलाल पूरोहित तमिळनाडू राज्याचे राज्यपाल होते. एका तरुण महिला वार्ताहराने प्रश्न विचारल्यावर त्यांनी सुद्धा तिचा गाल कुरवाळला. तिने अनेक वेळा स्वत:चा गाल धुतला.

•अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्या राज्यातील 12 कोटी जनतेला खास करून 6 कोटी महिलांना कळले असते की भाजपाच्या राज्यपालांशी किती अंतर ठेवून बोलायचे. त्यांची मानसिकता काय असते. त्यांच्या कडून कोणता धोका होऊ शकतो.

•राम कदम नामक भाजपाच्या घाटकोपर मधील आमदाराने दही हंडीच्या जाहीर कार्यक्रमात तरुणांना मुलगी पळवून आणण्याचे आश्वासन दिले होते. यावर सुद्धा अधिवेशनात चर्चा झाली असती. राज्यातील 6 कोटी महिलांना कळले असते की आपल्याला नक्की कोण पळवून नेणार आहे. स्वरक्षणासाठी काय केले पाहिजे. भाजपाच्या आमदारांशी किती अंतर ठेवून बोलायचे.

• काही वर्षापूर्वी पुण्यात मंत्री गिरीश बापटांनी तरुणांना "आमचा सुद्धा देठ हिरवा आहे आणि आम्ही सुद्धा तसल्या सीडी बघतो." अशी जाहीर कबुली दिली होती. बरं बापट पुण्याचे आणि त्यातही शनिवार पेठेतले. ते एवढ्यावर थांबणार आहेत का..? त्यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर महिला कार्यकर्तीचा हात हातात घेतला होता. काय घाई झाली होती कुणास ठाऊक. कार्यक्रम संपण्याची सुद्धा वाट नाही बघितली. आता यावर अधिवेशनात चर्चा झाली असती तर राज्यातील 12 कोटी जनतेला खास करून 6 कोटी महिलांना कळले असते की भाजपाच्या मंत्र्यांशी कसे वागायचे. देशातील सर्वात मोठ्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचे सुद्धा डोळे उघडले नसते का..?

•आशीष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष होते. लखनौ येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे शिबीर होते. मुंबईतून काही महिला व पुरुष कार्यकर्ते त्या शिबिराला गेले होते. शेलारांच सहकारी युवा मोर्चा अध्यक्ष गणेश पांडे याने त्यांच्याच महिला कार्यकर्तीचा रेल्वेत आणि लखनौ येथे विनयभंग केला. तिने मुंबईत आल्यावर पोलिसात एफ आय आर नोंदवली. यावर चर्चा होवून भाजपमधील महिलांना धोका कळला नसता का...?

•यवतमाळ जिल्ह्यातील भाजपा आमदार राजू तोडम आपल्या प्रिया शिंदे नामक दुसऱ्या पत्नीबरोबर रोड शो करत होते. त्यांची पहिली पत्नी अर्चना, त्यांची सासू व इतरांनी आमदारसाहेबांना भर शो मध्ये मारले. त्या पहिल्या पत्नीवरील अन्यायाची चर्चा होऊन तिला न्याय नसता का मिळाला...? या मुळे भाजप मधील दोन लग्न केलेल्या इतरही नेत्यांच्या महिलांना दिलासा मिळाला असता.

•भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकरांच्या सुद्धा दोन बायका आहेत. अधिवेशनात यावर चर्चा झाली असती तर कायद्यातील पळवाट शोधून हिंदू मॅरेज अॅक्टचा कसा भंग करायचा हे इतर भाजप आमदारांना शिकता आले असते. 6 कोटी महिलांना भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर लग्न करताना आधी लग्न झालय का ह्याची सुद्धा सखोल चौकशी करण्याची बुद्धी झाली आली असती.

•भाजपचे सध्याचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने तिच्यावर अत्याचार होतोय म्हणून मदत मागितली आहे. तिच्यावर कुटुंबातील सतत अत्याचार करतायत. तिचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तिने तिच्या जीवाला धोका आहे असे स्पष्ट सांगितलय. याची अधिवेशनात चर्चा नको का व्हायला..? राज्यातील भाजपाच्या नेत्यांच्या सुनांना बळ नको का मिळायला ?

•मीरा भाईंदर येथील भाजप नगरसेवक अनिल भोसलेंनी एका 44 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. तसेच अनैसर्गिक संभोग करून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. त्या महिलेला सतत ब्लॅकमेल करून बलात्कार केला. ब्लॅकमेल बरोबर बलात्कार आणि सर्वात वाईट म्हणजे अनैसर्गिक सेक्स...... यावर सुद्धा चर्चा होऊ दे. जनतेला कळू दे की नक्की कोण विकृत आहे ते.

•रविंद्र बावनथडे नावाचे भाजपचे गडचिरोली जिल्ह्याचे नेते. यांनी तर कहरच केला. बस मध्ये एका 19 वर्षीय मुलीचे चुंबन घेवून बलात्कार केला. ते ही चालत्या गाडीत इतर प्रवाश्यांदेखत...! मुलींना कळू दे की भाजपा नेत्यांच्या बरोबर प्रवास करावा का नाही..?

•कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी समिति अध्यक्ष नगरसेवक संदीप गाईकरांनी समाजसेवा करणार्याल एका महिलेचा दोन वर्षापासून विनयभंग केला. इंस्टाग्रामवर व सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवून धमकी दिली. तिच्यावर अॅसीड हल्ला करण्याची सुद्धा धमकी दिली. याची निश्चितच चर्चा व्हायला पाहिजे. सामाजिक कार्य करणार्या सर्व महिलांना यांची कृष्णकृत्य कळलीच पाहिजे.

• भाजपचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरेंवर महिला तहसिलदार ज्योति देवरेंचा विनयभंग करतात. आता हे अधिकाऱ्र्यांना सुद्धा सोडत नाहीत की काय... साहेब यावर नक्की चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे महिला अधिकारी भाजपाच्या नेत्यांबरोबर कसे वागायचे ते ठरवतील.

•भाजपच्या भोर-वेल्हा तालुका अध्यक्ष आनंद देशमाने याने पिंपरी-चिंचवड भाजप महिला मोर्चाच्या शहर उपाध्यक्षाला अश्लील व्हिडिओ पाठवून विनयभंग केला. पीडित महिलेची ओळख तीन वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमामध्ये झाली होती. त्यावेळी देशमाने याने पीडित महिलेचा मोबाईल नंबर घेतला होता. दोन आठवड्यापासून आनंद देशमाने हा महिलेच्या व्हॉटस्अॅपवर मेसेज पाठवत आहे. त्यावेळी त्याला पीडित महिलेने मेसेज पाठवण्यास मनाई केली. तरी देखील तो मेसेज पाठवत होता. आनंद देशमाने याने रविवारी रात्री दहाच्या सुमरास मेसेज करून एक व्हिडिओ पाठवला आणि तो आवडला का? असं विचारत पती घरी आहेत का अशी विचारणा केली. त्यावेळी पीडित महिलेने पती घरी नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आनंद देशमाने याने महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवून विनयभंग केला. यावर सुद्धा चर्चा झाली असती. महाराष्ट्रातील महिलांना कळू दे नक्की जोड्याने कुणाला मारायचे.

साहेब,

भाजपाच्या बारा महिला आमदारांनी स्वत:ला सावित्रीच्या लेकी म्हणत तुम्हाला पत्र पाठवलंय. खर तर त्या सावित्रीच्या लेकी नसून त्यांचे महान ऋषि मनूच्या वंशज आहेत. त्यांना सुद्धा कळू दे आपले बांधव काय गुण उधळतात.

या अधिवेशनात जमल्यास वाघांच्या चित्रा मॅडमला सभापति करा. त्यांना नीट कळू दे की त्यांच्या सध्याच्या पक्षातील नमून्यांचे महिलांविषयी काय धोरण आहे. किंवा चित्रा मॅडम आणि भाजपच्या 12 सावित्रीच्या लेकींची मिळून एक समिति स्थापन करा. त्या समिति मार्फत महिला अत्याचाराबाबत जाहीर चौकशी करायला सांगा.

सर्व प्रसार माध्यमांना ते थेट प्रक्षेपण करायला सांगा... मग कळेल या सावित्रीच्या लेकींना की महिला अत्याचार कोण करतय? शेवटी जाता जाता एक आठवण करून द्यावीशी वाटते.

भाजपचे महामहीम माननीय मोदी साहेबांनी आपली पत्नीला सोडलंय. आता त्या माउलीवर अत्याचार झाला का उपकार याचा निर्णय करण्यास चित्रा मॅडमच्या अध्यक्षतेखाली समिति नेमावी. त्या समितीने एक महिन्यांच्या आत निर्णय देऊन यशोदबेन यांना न्याय द्यावा...!

धन्यवाद...!

हेमंत पाटील

राजकीय विश्लेषक

मो. 8788114603

(सदर लेखातील मत लेखकाचे आहेत.)

Tags:    

Similar News