GandhiJayanti : शोधा… गांधी हरवले आहेत ?

आज महात्मा गांधी यांचा स्मृती दिन....देशाला गांधींनी ओळखलं मात्र या देशाने गांधीजींना ओळखलं का? तुमच्या स्मरणात कोणते गांधी आहेत? गांधींनी सांगितलेल्या मार्गावरून हा देश कधीतरी चालला काय? माधव पांडे यांनी २ ऑक्टोबर रोजी हा लेख खास मॅक्स महाराष्ट्रसाठी लिहिला होता, महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी हा लेख प्रसिद्ध करत आहोत.;

Update: 2022-01-30 01:30 GMT

आज गांधीजी असते तर १५२ वर्षाचे असते. हा देश गांधींना राष्ट्रपिता म्हणतो. पण मानतो काय? असा विचार करायला लावणारा आजचा हा दिवस आहे. गांधी या नावाची आंधी या देशाने ३० जानेवारी १९४८ पर्यंत अनुभवली. त्यानंतर हा देश अंधारात चाचपडला. देशाच्या नेत्यांचा दावा आहे. आम्ही गांधींच्या मार्गावर चालत आहोत. १९४८ पासून आता २०२१. कुठे आहेत गांधी? हा देश महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करतो, मात्र या देशात महापुरूष कुठेय? आज माझ्या मनात प्रश्न आहे. गांधी कुठेय? हा प्रश्न तुमच्याही मनात असेल. देश गेली ६९ वर्षे गांधींना विसरला नाही. गांधी गेल्या ६९ वर्षांत अजूनही जिवंत आहेत. मात्र कुठे? नोटांवर आणि नेत्यांच्या ओठांवर.

आमच्या स्मरणात कोणते गांधी आहेत? मोहनदास करमचंद गांधी की राष्ट्रपिता महात्मा गांधी. हा बापूंचा देश. बापडा खरंय. या देशाला गांधींनी ओळखलं मात्र या देशाने गांधीजींना ओळखलं नाही. गांधी भारतीयांना ओळखून होते. भारतीय गांधींना ओळखू शकले नाहीत. असं नसतं तर गांधीचं अस्तित्व कुठे तरी दिसलं असतं. आम्ही सारे हुशार लोक आहोत आणि चतुरही. देशाने गांधीचे पुतळे बनविले. तसबिरी तयार केल्यात. सर्व महापुरूषात गांधीजी भाग्यवान. गांधीजी नोटांवरही आहेत. तरीही गांधीजी कुठे आहेत? असला प्रश्न विचारू नका.

गांधींना भेटण्याचे सरकारकडे अनेक पत्ते आहेत. शोधा गांधींना. तर आता गांधीचौकातही गांधी नाहीत. गांधींना आम्ही पार हद्दपार केलंय. आम्ही सारे ढोंगी, दांभिक आहोत. मान्य करीत नाही एवढंच. राष्ट्रपिता कुठे आहेत? शोधा. काँग्रेस पक्षाच्या नावाने आम्ही सारे खडे फोडणार. गांधींना काँग्रेसने संपविलं असं म्हणणार. काँग्रेसवाले म्हणतात, गोडसेने गांधीजींची हत्या केली. गोडसेने गांधीजी संपविले. मी चक्रावून जातो. गांधींना कुणी संपविलं. महात्मा गांधींना गोडसे संपवू शकला? देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या महात्म्याला काँग्रेस नावाच्या एका पक्षाने संपवून टाकलं? काय खरं आहे. गांधींना कोणी संपविलं? आज गांधी नाहीत, हे नक्की. तरी आम्ही जयंती साजरी करतोय. गांधींना स्मरतोय. आमचे नेते म्हणतात, हा देश गांधींचा आहे. मला वाटते, हा देश लबाड आणि स्वार्थी लोकांचा आहे. गांधींना काँग्रेस, गोडसे कोणीच संपवू शकले नाहीत. गांधींना आम्ही सगळ्यांनी योग्यवेळी आत-बाहेर केलंय. देशात गांधी दिसत नाहीत. गांधी गेले कुठे?

मित्रहो, आमचे महात्मा आम्ही हरवून बसलो आहोत. माझ्या वाचनात एक प्रसंग आला. गदिमा, ग. दि. माडगुळकर रेल्वेने प्रवासाला निघाले होते. एका स्टेशनवर एक म्हातारी आपलं गाठोडं घेऊन चढली. त्या स्टेशनवर रेल्वेचा एक तास थांबा होता. ती म्हातारी रेल्वेच्या डब्यात येऊन बसली. काही वेळातच तिच्या लक्षात आलं की, तिच्या सामानाच्या गाठोड्यात घरातील दाग-दागिण्यांचा पितळी डब्बा बांधल्या गेला. आता प्रवासात दागिण्यांचा डब्बा कसा न्यायचा. असा प्रश्न म्हातारीचा जीवाला घोर लावून बसला.

म्हातारी खिडकीबाहेर बाहेर बघू लागली. म्हातारीचा जीव कासाविस झाला. पण लगेचच तिने खिडकीतून एका व्यक्तीला आवाज दिला. तो व्यक्ती आला. म्हातारीने त्याला त्याचं गावं विचारलं. त्याने गाव सांगितलं. म्हातारीने दागदागिण्यांचा पितळी डब्बा त्या व्यक्तीच्या हाती सोपविला. आता म्हातारी निश्चिंत झाली. हा सगळा प्रसंग गदिमा निरखून बघत होते. गदिमांना राहविल्या गेलं नाही. रेल्वे सुरू होताच गदिमा त्या म्हातारीला म्हणाले, आजी तो माणूस तुमच्या ओळखीचा होता का? आजी उत्तरली, नाही. गदिमांना आश्चर्य वाटले. गदिमा म्हणाले, तुम्ही दागिण्यांचा पितळी डब्बा अनोळखी माणसाच्या हातात कसा दिला? म्हातारी हसली. गदिमांकडे बघत म्हणाली, मी त्या माणसाला त्याचे गाव विचारले. त्याने गाव सांगितले, तो याच गावचा आहे. म्हणून मी तो डब्बा त्याला दिला. गदिमा बुचकाळ्यात पडले. गावातल्या अनोळखी माणसाला दागिण्याचा डब्बा देऊन म्हातारी फसली. गदिमांनी प्रश्न केला, त्या माणसावर तुम्ही इतका विश्वास कसा काय टाकला? आता तर म्हातारी हसली. म्हणाली, भाऊ त्या माणसाच्या डोक्यावर गांधीबाबाची टोपी आहे. तो कधीच फसवणार नाही. सांगा, गांधीबाबांची टोपी घालणारी माणसं गेली कुठं? स्वातंत्र्यानंतर तर गांधीबाबाच्या टोपीधाऱ्यांचं राज्य होतं. नेतेही टोपीवाले आणि जनताही. तरीही या देशातून गांधी हरविले. पार हद्दपार झाले. प्रसिद्ध लेखक जनार्दन वाघमारे असं लिहतात की, महापुरूषांचा पराभव विरोधकांकडून नव्हे तर अनुयायांकडून होत असतो. मग मी-तुम्ही गांधीवादी आहोत कसे? या देशाला गांधी स्वातंत्र्यापर्यंत हवे होते. त्यानंतर गांधींच्या फक्त तसबिरी आणि पुतळे. आज आमच्या जवळपासही गांधी नाहीत. या देशात आंबेडकर पुन्हा झाले नाहीत. गांधींना तर आम्ही जन्माला येऊच दिलं नाही. या देशाला गांधींनी काय दिलं? असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा एका वाक्यात सांगता येईल. गांधींनी सामान्य पुरूषाला पुरूषार्थ शिकविला. स्वतः उत्तम पुरूषाचे उदाहरण बनले. गांधी म्हणजे विचार. गांधी म्हणजे जीवनशैली. आम्ही स्विकारली का गांधी जीवनशैली? आम्ही दावा करतो की, गांधी राष्ट्रपिता आहेत. गांधींनी सांगितलेल्या मार्गावरून हा देश कधीतरी चालला काय? उत्तर मिळेल. नाही. या देशाचे गांधी. मात्र देश गांधींचा नाही. जसा हा देश बुध्दांचा, महावीरांचा तसाच गांधींचाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नेभळांचा. सामान्यांना दहा हत्तीचं बळ देणारे गांधी आमचे आदर्श आहेत. मात्र पुढे काय? गांधींनंतर त्यांचे अनुयायी म्हणवून घेणारे 'सत्ताधीश' झालेत. 'सत्यधीश ' नाहीत. गांधींनी सत्याचा आग्रह धरला. 'सत्याग्रह'. आमच्या नेत्यांनी. 'सत्तेचा आग्रह' धरला. बघा ना या देशाच्या इतिहासाची फक्त सत्तरवर्षाची पानं उलटवा. सगळी अलटी-पलटी लक्षात येईल.

गांधी आम्हाला कळले असते तर गांधी टोपीखालील डोकं गांधी विचाराचं आहे की नाही याची आम्ही तपासणी केली असती. पण असले प्रयोग आम्ही भारतीय कधीच करीत नसतो. गांधींनी सत्याचे प्रयोग केलेत. गांधींच्याच समोर सत्तेचे प्रयोग या देशाने बघितले आहेत. त्या सर्व घटनांची आजही उजळणी होत आहे. वेगळ्या शब्दात असंही म्हटल्या जावू शकतं की, त्या सर्व घटनांना आज उजाळा दिल्या जात आहे. गांधी कुठं संपलेत? मग संपलं काय? गांधींचा विचार की गांधींचे प्रयोग? गांधीवाद की गांधीविरोधक. काहीच संपलं नाही. मोहनदास करमचंद गांधी जिवंत आहेत. महात्मा गांधी संपले. सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाचं पंतप्रधानपद दिलं असतं तर देशाचं चित्र आज वेगळं दिसलं असतं अश्या काल्पनिक विचारांना आम्ही आज आदर देत असलो तरी जवाहरलाल नेहरूंकडे देशाचे नेतृत्व गांधींनी नव्हे भारतीयांनी दिलं.

या सत्याचा आम्ही स्विकार केला पाहिजे. एकवेळ असा विचार केला की, गांधींनी पंडितजींकडे देशाची सत्तासूत्र सोपविली असेल तरीही पंडित नेहरूंचा वारसा तमाम भारतीयांनी आतापर्यंत चालविला आहे. आजही नेहरू कुटुबियांकडेच देशाची सूत्र सुरक्षित राहू शकतात असा वंशवादी विचार करणारा भारतीय गांधींना अपेक्षित होता काय? याचा विचार करण्याचा आजचा दिवस आहे. गांधी व्यक्ती नाही. विचार आहे. हा विचारच मुळी भारतीयांना पचत नाही. गांधी प्रतिमेत छान वाटतात, जगतांना नाही. गांधी विचार एक समृद्ध जीवनशैली आहे. ही धारणा भारतीयांनी पार उधळून लावली असून आमच्या कायदेमंडळात बलात्कार, दरोडा व खूनाचे आरोपी जनप्रतिनिधी आहेत. हा पराभव गांधींचा की भारतीय पुरूषार्थांचा! गांधी समजून घेणं खूप कठीण आहे. जगणं त्याहून महाकठीण. गांधी चित्रपटात छान वाटतात. जीवनात नको. गांधी हा दीडशे वर्षातला एक प्रयोग होता. अहिंसा सांगणाऱ्या गांधीजींनी डरपोक वृत्तीचा निषेध केला होता. भारतीय निषेध तर करतात गांधींचा लपून-छपून. दिवसाढवळ्या गरिबांना लूटून. हिंसेचा डोंब माजवून. गांधींनी हा देश समजून घेतला होता. या देशाला गांधी समजले नाही. आज १५२ वर्षांत आम्ही एक महात्मा कमविला आणि गमविलाही. पुन्हा गांधी होणे नाही. पुन्हा शिवाजी होणे नाही. ना आंबेडकर. कसे होतील? आता शिवाजी, गांधी, आंबेडकर कसे जन्माला येतील? गांधींच्या विचाराचं सूत्र बघा. वैश्विक होतं. गांधींची प्रार्थना ऐका. सब को सन्मती मिळाली? इथं आज सगळं संमत होतं. संमत्तीचा प्रश्न कुठेय? गांधी तुम्हाला देहात कुठे भेटतील. गांधी राहतात सेवाग्रामला. चरख्याच्या सुतात. सगळ्यांनी आता असं ठरविलंय की, समाज म्हणजे सत्ता. समाजाची सर्व अंग सत्तेत न्हावून निघाली पाहिजेत. समाज आणि सत्ता. एकच समानार्थी शब्द. इतका ढोंगी समाज गांधींच्या सत्याला कसा सामोरे जाणार? समाजाचा पुरूषार्थ गांधींनी सांगितला. सिद्ध करून दाखविला. त्या सगळ्या घटनांना आता समाजच म्हणतो "गांधींचे प्रयोग". गांधी म्हणायचे "सत्याचे प्रयोग". आमची धारणा पक्की आहे. पदोपदी आम्ही खोटं बोलू, भ्रष्ट व्यवहार करू तेव्हाच गांधींच्या या देशात जगू.

गांधींचा देश गेल्या सत्तर वर्षांपासून गांधीजींना आठवतोय मात्र असं अजिबात म्हणत नाही. पुन्हा गांधी आले पाहिजेत. या देशाला गांधी परवडणारे नाहीत. या देशाचं दुर्दैव बघा. गांधीजींचं बलिदान या देशाचा वादविवादाचा विषय आहे. गांधी शरीराने गेले असतील. विचाराने जातील? गांधी वाचा. गांधींचं तत्वज्ञान बघा. जे वेदामध्ये ते गांधींमध्ये. जे गीतेत तेच गांधी जगले. गांधींनी फार वेगळं तत्वज्ञान मांडलं नाही. भगवान बुद्ध, भगवान महावीर आणि भगवतगीता यांच्या तत्वज्ञानाचं सार गांधीवाद. गांधी विचारासोबत जगण्यात आहेत. मला प्रश्न पडतो, गांधी डोक्यात दिसतात. कृतीत का नाही? हा देश गांधींना विसरू शकत नाही आणि नाकारूही शकत नाही. गांधी भारतीय होते. त्यांच्या प्रत्येक प्रयोगातून सामान्य माणसाच्या मर्यादा आणि शक्ती प्रकट होते. गांधी असामान्य मात्र सामान्यांसाठीच होते.

तुम्हाला-मला या देशात गांधी बघायचे असतील तर ते नेत्यांमध्ये बघू नका. आम्ही नेत्यांमध्ये गांधी बघण्याची घोडचूक करत आलो आहोत. या देशात गांधी जीवंत ठेवण्याची जवाबदारी नेत्यांची नाही. किंबहूना कोणत्याच नेत्याला गांधी नको आहेत. या देशाला गांधी हवेत. या देशातील सामान्य माणसाचा असामान्य पुरूषार्थ जिवंत ठेवायचा असेल तर आम्हाला गांधी जिवंत ठेवावे लागतील. गांधी नावाचा पक्ष नाही. गांधीचं नावं घेणारे पक्ष आहेत. आम्ही जोवर गांधींना जिवंत ठेवू तोवर आमचे राजकीय पक्ष गांधींचं नाव घेतील. गांधींनी या देशातील सामान्य माणसाला परिस्थिती विरोधात, अन्याविरूद्ध लढायला शिकविलं. सामान्यांना र्धैर्य दिलं. ताकद दिली. सामान्य माणसं अजस्त्र शक्तीसमोर काय करू शकतात याचा जागतिक परिपाठ घालून दिला आणि गांधींची लढाई बिना शस्त्र बिना ढाल.

गांधी आम्हाला हवेच. आमच्या प्रत्येक पिढीला गांधी भेटायला हवेत. आमच्यात गांधी तयार व्हायला हवेत. पारतंत्र्य केवळ सत्तेचं नसतं. गुलामगिरी केवळ शरीराची नसते. या देशाला कायम गांधींची गरज असेल. गांधींसारखा विचारवंत निर्माण होईलही. मात्र गांधींचे सत्याचे प्रयोग पुन्हा कोणी करेल याची शक्यता नाही. महात्मा गांधी आमच्या मनात आहेत. भारतीयांच्या मनात आहेत तोवरच हा देश मजबूत राहिल. इथला प्रत्येक फाटका माणूस देशासाठी लढायला तयार राहील. गांधी केवळ विचारात नाही कृतीत असायला हवेत. जगण्यात हवे. कदाचित गांधी हीच भारतीयांची कायम ओळख असेल. त्याचमुळे आम्ही गांधींना सतत आठवत असू.

माधव पांडे, अमरावती 9823023003

Tags:    

Similar News