भारतातील सामाजिक न्यायाचा झेंडा साता समुद्रापार

उच्चजातीय समूह परंपरागत असलेल्या संसाधनाच्या आधारावर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला. उच्चशिक्षित होऊन परदेशात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक देखील झाला. भारतातून विदेशात जाताना या वर्गाने केवळ कुटुंबालाच भारतातून नेले नाही. तर त्यांच्या डोक्यात असलेली जातीय मानसिकता देखील परदेशात गेली. कुत्र्याच्या शेपटीवरून गोचिडाने प्रवास करावा तसाच प्रवास करत जात परदेशात गेली. वाचा सातासमुद्रापार पोहचलेला जातीची गोष्ट अशोक कांबळेंच्या या ब्लॉग मध्ये…;

Update: 2023-09-02 09:14 GMT

जात नाही,ती जात अशी जातीची व्याख्या केली जाते. भारतात जातीचा रोग अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतात जातीचे अनुभव नवे नाहीत. भारतात अनेकदा जातीयवादाचा अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवायला मिळत असतो. विशिष्ट भाषा बोलली की तो या जातीचा, विशिष्ट पेहराव केला की तो त्या जातीचा अशी अनेक स्तरावर जातीय मानसिकता रुजलेली दिसते. विशिष्ट जातीची वस्ती गावकुसाबाहेर असते. वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळे वाडे ग्रामीण भागात आढळतात. जातीवरून शिवीगाळ केली जाते. विशिष्ट जातीने मिशी ठेऊ नये, विशिष्ट प्रकारचे कपडे घालू नयेत असे जातीय दंडक केलेले आहेत. आजही राज्यात अशा प्रकारचे जातवास्तव पहायला मिळते. कनिष्ठ जातींकडे उत्पादनाची साधने नसल्यामुळे त्यांना हा जातीयवाद निमूटपणे सहन केला जातो. याला विरोध केल्यास खून पाडले जातात.

माणसाने निर्माण केलेल्या जाती तोडण्याचे काम पहिल्यांदा भगवान गौतम बुद्धांनी केले. त्यांनी ब्राम्हण,क्षेत्रीय,वैश्य,शूद्र,अतिशूद्र या वर्णाश्रमाच्या उतरंडीलाच सुरुंग लावला. त्यानंतर भारतातील जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केला. जात कायद्याने संपली पण तिथे अस्तित्व आजही ग्राउंडवर दिसून येते. आजही लोकांच्या मनातून जातीव्यवस्था जातीय भेदभाव करण्याची मानसिकता संपलेली नाही.

भारतातील उत्पादनाची साधने असणारा उच्चजातीय वर्ग शिक्षणात पुढे होता. साहजिकच नव्या जगात निर्माण झालेल्या नव्या संधी या समूहालाच पहिल्यांदा प्राप्त झाल्या. हा समूह उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला. उच्चशिक्षित होऊन परदेशात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक देखील झाला. भारतातून विदेशात जाताना या उच्चजातीय वर्गाने केवळ कुटुंबालाच भारतातून नेले नाही. तर त्यांच्या डोक्यात असलेली जातीय मानसिकता देखील परदेशात गेली. कुत्र्याच्या शेपटीवरून गोचिडाने प्रवास करावा तसाच प्रवास करत जात परदेशात गेली. (अपवाद असू शकतात)

या उच्चजातीय समुहासोबतच बाबासाहेबांनी संविधानात दिलेल्या समान संधीच्या आधारे प्रगती करत पूर्वाश्रमीचा अतिशुद्र वर्ग देखील परदेशात स्थायिक झाला. या वर्गाला परदेशात देखील जातीचे चटके बसू लागले.

आजही अमेरिकेत तथाकथित उच्च वर्णीयांकडून अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना त्रास देण्याचे काम सुरू झाले. भारतीय लोकांची जातीयवादी मानसिकता जगभरात पोहचली. त्याच्या झळया त्या - त्या देशात राहणाऱ्या या लोकांना बसू लागल्या.

याद्वारे जातीच्या या समस्येची जाणीव जागतीक पटलावर झाली. त्यानंतर या प्रश्नावर उपाय काढण्यासाठी अमेरिकेत सामाजिक चळवळ सुरू झाली. याचे फलित म्हणून या आठवड्यात अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात जात विरोधी कायदा पास झाला. येत्या काही दिवसात या राज्यात जात विरोधी कायदा लागू होणार आहे. अमेरिकेत ही जात पोहचल्याने तेथील सरकारला कायदा करणे भाग पडले आहे. जात सातासमुद्रापार पोहचली असल्याने ती एक जागतिक समस्या झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी भारतातील फुले शाहू आंबेडकरांनी शोधलेली सामाजिक न्यायाची संकल्पना अमेरिकेत देखील रुजत आहे. याद्वारे अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी कायदे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात देखील जातीचा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. जातीयतेची पाळेमुळे आशियात खंडातील देशात दिसून येतात. परंतु अमेरिकेसारख्या विकसित देशातील लोकांना जातीयतेबद्दल जास्त प्रमाणात माहिती नाही. अलीकडच्या काळात सातत्याने जातीय भेदाची प्रकरणे समोर येवू लागली आहेत. त्यामुळेच तेथील आंबेडकरवादी संघटनांनी जातीभेद विरोधी कायदा करण्यास संघर्षाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून येत्या काही दिवसात कॅलफोर्निया राज्य अमेरिका देशातील जातीभेद विरोधी कायदा करणारे पहिले राज्य ठरणार आहे. त्यानंतर संपूर्ण अमेरिका देशात या कायद्याची अंमलबजावणी होवू शकते.

अमेरिकेतील सियाटल शहरात जातीभेद विरोधी कायदा पहिल्यांदा बनवला गेला

अमेरिकेतील सियाटल या शहरात आंबेडकरवादी विचारांचा प्रभाव आहे. या भागात जाती भेदाची काही प्रकरणे देखील समोर आली होती. त्यामुळे येथील लोकांनी उठाव करून त्या शहरात असणाऱ्या महापालिकेला कायदा पास करण्यास भाग पाडले होते. यामध्ये भारतीय वंशाच्या सिनेटर क्षमा सावंत यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. अमेरिकेसारख्या विकसित देशात याच्या झळा जास्त प्रमाणात लोकांना बसू लागल्याने सातत्याने लोक जातीभेद विरोधी कायद्याची मागणी करत होते. या देशात विविध जाती धर्माचे लोक कामानिमित्त जात असतात. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतरही आपली जातीय वादाची भूमिका सोडत नाहीत. पाठीमागच्या काळात असाच प्रकार सिस्को या कंपनीत घडला होता. या कंपनीतील जातीभेदाचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर हा खटला न्यायालयात पोहचला होता. येत्या काही दिवसात याचा निकाल देखील लागेल. जातीभेदाचा दुसरा प्रकार कॅनडातील एका शाळेत उघडकीस आला होता. त्यानंतर तेथील शालेय प्रशासनाने जातीभेद करणे गुन्हा मानले आहे. शाळेत जातिभेदाचा प्रकार उघडकीस आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील शाळेने दिला आहे. या प्रकरणानंतर अमेरिकेत असणाऱ्या जग प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात देखील जातिभेदाची प्रकरणे समोर होती. त्यानंतर विद्यापीठात जातीभेद विरोधी कायदा विद्यापीठाला करावा लागला. अमेरिकेत जाती भेद विरोधी कायद्याची सुरुवात झाली असून येत्या काही वर्षात जगातील सर्वच देशात या कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

जातीभेद विरोधी कायद्यासाठी आंबेडकरी संघटनांनी केले आटोकाट प्रयत्न

जातीभेद विरोधी कायदा पास करण्यासाठी अमेरिकेत असणाऱ्या आंबेडकरवादी संघटनांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. कॅलिफोर्निया राज्यात कायदा बनवण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र काम करून जवसपास सातशे च्या आसपास बैठका घेतल्या आहेत. या बैठकात विविध आंबेडकरी संघटनांनी आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावली असून अमेरिकेत जातीभेद विरोधी कायदा होत असल्याने जातीभेद मानणाऱ्या संघटनांनी देखील कडाडून विरोध केला होता. परंतु अमेरिकन लोकांना जातीभेदाचे चटके कसे असतात याचे विश्लेषण आंबेडकरवादी संघटनांनी पटवून दिले आहे. त्यामुळेच अमेरिकेत जातभेद विरोधी कायदा होत आहे. संपूर्ण अमेरिकेत या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास अमेरिका जगातील जात भेद विरोधी कायदा करणारा पहिला देश ठरणार आहे.

Tags:    

Similar News