"छ्या असे कधी असतंय काय": संजीव चांदोरकर
जगात सर्वच गोष्टी पहिल्यांदा घडत असतात. मात्र, त्या घडण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी सर्व काही शक्य आहे. असा विचार कोणीतरी केलेला असतो... वाचा अर्थतज्ञ संजीव चांदोरकर यांचा प्रेरणादायी लेख;
"छ्या , असे कधी झालंय का?" ची सीमा ओलांडून "येस, हे शक्य आहे" च्या प्रांतात प्रवेश करण्याचे धैर्य फक्त कृतीतून येते. आणि कृती करणारे इतर लाखो लोकांना, पुढच्या अनेक पिढयांना तो विश्वास देत राहतात "येस हे शक्य आहे"! कामगार कष्टकरी संघटित होऊन राजकीय सत्ता ताब्यात घेऊ शकतात. हा विश्वास गेले शतकभर आणि पुढची अनेक शतके देऊ पहाणारी मानवी इतिहासात पहिल्यांदा केली गेलेली सोव्हियेत क्रांतीची कृती...
शेकडो वर्षे धर्माने अधिकार नाकारलेल्या मुलींना व्यक्तिगत हानी सोसून आम्ही शिकवणार असे म्हणत ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी केलेली आपल्या देशातील पहिली कृती... मुद्दा कोठूनही पाणी मिळवण्याचा नसून इतरांसारखाच पाण्यावरच्या अधिकाराचा आहे म्हणून बाबासाहेबांनी आपल्या देशातील पहिल्यांदा केलेली चवदार तळ्यावरची कृती... मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर सरकार मनमानी कर लावू शकत नाही. म्हणत पहिल्यांदा जनतेला सहभागी करून महात्मा गांधींनी केलेली दांडीची कृती...
मला आवडलेल्या मुला किंवा मुलीशीच लग्न करून, मग तो ती कोणत्याही जाती धर्माचे असुदेत, वेळ पडलीच तर आईवडिलांबरोबर, एकत्र कुटुंबात न राहता पहिल्यांदा विभक्त राहणाऱ्या त्या निनावी तरुण तरुणींची कृती... आणि मानवी जीवनातील, सामाजिक, राजकीय, तंत्रज्ञान, विज्ञान, आर्थिक आघाडयांवर जगात पहिल्यांदा केलेल्या सर्व कृती.... तरुणांना दसऱ्याच्या दिवशी आवाहन: फक्त "छ्या असे कधी असतंय काय" च्या सीमा ओलांडून "येस हे शक्य आहे" च्या प्रांतात जाण्यासाठी लागणारे स्पिरिट जिवंत ठेवा. मग तुमची राजकीय विचारधारा कोणतीही असुदे.