संघर्षसाथी: अनिता पगारे
आधुनिक जगतात पुरोगामी चळवळीला एक नवा आयाम देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांचं कोरोनाने निधन झालं. त्यानिमित्ताने राष्ट्रसेवा दलाचे सागर भालेराव यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे…;
नाशिकसोबतच महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवणाऱ्या अनिताताई पगारे यांचं कोरोनामुळे निधन झालंय. परिवर्तनवादी चळवळीत सक्रीय असलेल्या कुणालाही हे नाव अपरिचित नाही. कुठल्या न कुठल्या कारणामुळे त्यांची ताईशी भेट ही झालेलीच असते.
समता आंदोलन, राष्ट्र सेवा दल आणि छात्र भारती सोबत त्यांचा घनिष्ठ संबंध होता. छात्र भारतीच्या शिबिरांमधून कार्यकर्त्यांना 'जेंडर जस्टीस' ही संकल्पना अगदी साध्यासोप्या पद्धतीने त्या समजून सांगायच्या. तरुणपिढीवर आज जास्त मेहनत घेतली तर येणाऱ्या काळात विशेष कष्ट घ्यावे लागणार नाहीत. असं त्याचं मत होतं. जुने साचेबद्ध कार्यक्रम, मोर्चे आंदोलने यांना काही विकल्प देता येतो का? याच्या शोधात त्या कायम असायच्या. नवी पिढी कोणत्या दिशेने विचार करते आहे. हे त्या सतत जाणून घ्यायच्या.
त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांशी त्यांनी सतत संवाद ठेवला. छात्र भारती आणि सेवादलाच्या शिबिरांना ताई वक्त्या म्हणून येणार असल्या की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वेगळाच हुरूप चढायचा. कुठल्याही कार्यक्रमात भाषण करताना त्या अभ्यास करूनच उभ्या रहायच्या. त्याचं भाषण सुरु झालं की ऐकत बसावं असं वाटायचं. त्यांनी आजवर केलेल्या कामाचा अनुभव त्यांच्या शब्दाशब्दातून श्रोत्यांसमोर चित्र म्हणून उभं राहायचा. वस्तीवरल्या शाळाबाह्य मुलाचं आयुष्य असो, किंवा परितक्त्या महिलांसोबत केलेलं काम असो,अगदी पोटतिडकीने त्या मांडणी करत. आपल्या आजूबाजूला आज हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महिला सामाजिक कार्यात सक्रीय आहेत, त्यातलच एक नाव होतं अनिताताईच.
नवीन कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रत्येक कामात त्या प्रोत्साहन द्यायच्या, चुकलं तर समजावून सांगायच्या, रागवायच्या मात्र नाहीत. काही महिन्यापूर्वी आम्ही एकत्रितपणे 'महाराष्ट्र सोशल फोरम' साठी काम करत होतो. महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीसोबत त्यांचा असलेला दांडगा संपर्क त्यावेळी प्रत्यक्षपणे अनुभवता आला. जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या (NAPM) त्या महाराष्ट्र संयोजक होत्या. गावखेड्यातल्या कार्यकर्त्यांना त्या नावानिशी ओळखायच्या. चळवळीला इतकं आपलेपण आजच्या काळात कोण देतं?
कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं. श्रमिक, कष्टकऱ्यांचे हाल बघून ताई व्याकुळ होत होत्या. पायी आपल्या गावाकडे निघालेल्या श्रमिकांना बघून, त्यांच्यासाठी आपण काही तरी केलं पाहिजे. यासाठी त्या शक्य ती मदत करत होत्या. 'महाराष्ट्र सोशल फोरम'च्या माध्यमातून काही शाश्वत विकल्प तयार करता येईल काय? यावर सध्या चर्चा सुरु होती. मागच्याच महिन्यात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला नाशिक येथे पाठींबा देण्यासाठी आयोजित केलेल्या सत्याग्रहात त्या अग्रेसर होत्या.
दिल्लीत आंदोलनस्थळी जाऊनही त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी आपलं वैचारिक नातं सांगितलं होत. याच दरम्यान आपले दोन मावसभाऊ आणि एक सख्खी बहिण त्यांनी कोरोनामुळे गमावले. त्याही दुखा:तून बाहेर येत त्या सामाजिक कार्यात पुन्हा उभ्या राहिल्या. परंतु काहीच दिवसात त्यांनाही कोविडने गाठलं आणि शाश्वत विकासाची चर्चा अपुरीच राहिली.
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रेरणेने त्यांनी पाहिलेलं मानवमुक्तीचं स्वप्नपूर्ण करण्यासाठी, अनिताताईंचा वैचारिक वारसा सांगणाऱ्या आपल्या सर्वांना धडपड करावी लागणार आहे. आज चहूकडे सामाजिक-राजकीय-आर्थिक विषमता जोर धरत असताना अनिताताईंचं खरं तर खूप गरज होती. त्यांच्या जाण्याने चळवळीचं झालेलं नुकसान कदापीही भरून निघणार नाही.
- सागर भालेराव…
राष्ट्र सेवा दल