कायमच्या गमावलेल्या दोन नोटा
सागर गोतपागर यांच्या लेखणीतून उतरलेला त्यांच्या आजोबांच्या संदर्भातील डोळ्यात पाणी आणणारा हा किस्सा नक्की वाचा….;
आजोबा अंथरुणाला खिळलेले होते. अंगात त्राण नव्हते. फक्त इकडे तिकडे डोळे फिरवत होते. घरभर पाहत होते. अचानक त्यांनी आज्जीला जवळ बोलावलं. हाताचा इशारा करतच विचारल? पैस हायती का? आठ दिवस आधीच त्यांनी जबरदस्तीने बॅंकेत न्यायला सांगितल होतं. त्यावेळी त्यांच्या पेंन्शनचे पैसे काढुन आणले होते. आज अचानक असा प्रश्न विचारल्यावर आज्जीला भरुन आलं. तिन विचारल “ का वं ? आस का विचारताय” त्यावर ते बोलले “काही न्हाय हायती का विचारल”.
याच्या दुसऱ्याच दिवशी बाबा आम्हाला कायमचे सोडुन निघुन गेले. त्यांच्या अंत्यविधीचा सगळा खर्च त्यांनी स्वत:च्या पैशाने होईल याची आधीच तजवीज करुन ठेवली होती. त्यांनी आयुष्यभर मुंबईतल्या गटारावर औषध मारलं. प्रामाणिकपणे मलेरीया खात्यातील नोकरी पुर्ण केली. निवृत्तीनंतर ते गावी राहिले. भेटेल त्याला कामातले किस्से अभिमानाने सांगायचे. त्यांनी कामावर कधीच सुट्टी घेतली नव्हती. त्यांच्या राखीव सुट्ट्या शिल्लक असत.
नोकरीतले अनेक मजेदार किस्से ते आम्हाला सायंकाळी सांगायचे. त्यांची भरती सफाई कामगार म्हणुन झालेली होती. भरतीच्या वेळी त्यांना एक परीक्षा द्यायची होती. मुंबईतल्या एका तलावातली घाण आणि त्यात वाढलेल्या वेली साफ करण्याची परीक्षा त्यांना दिली होती. हे काम केलं की नोकरी फिक्स. त्यांच्या मुकादमाने सर्वांना विचारले की पोहता येत असेल त्यांनी थांबा ज्यांना पोहता येत नाही त्यांनी घरी निघुन जा. ज्यांना पोहता येत नाही त्यांना घरी जावे लागणार होते. त्यांची नोकरीची संधी हुकणार होती. बाबांनी प्रसंगावधान राखुन सर्व मुलांना हळूच सांगितले की सर्वांना पोहता येते असे सांगा. त्यांनी ज्यांना पोहता येत नाही त्यांना गुपचुप बाजुला उभा केले. ते त्यांच्या साहेबांकडे गेले व म्हणाले की साब हम तैरते हुए ये साफ कर देंगे लेकीन हमने लाया हुआ कचरा उठाकर किनारे तक ले जाने को कुछ लोग चाहीए. ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांना देखील नोकरी लागली.
त्यांच्या सांगण्यात नोटांचा एक किस्सा नेहमी यायचा. एका बॅंकेत पैशाला वाळवी लागलेली. औषध मारण्यासाठी त्यांच्या कार्यालयाला अर्ज आला होता. त्यांच्या साहेबांनी ही महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ती विश्वासाने पार पाडली. असे अनेक किस्से ते आम्हास सांगत असत.
त्यांच्या अंत्यविधीच्या पैशातून दोनशे रुपये शिल्लक राहीले होते. माझ्या आजीने खुप दिवस ते पैसे गाठीला मारुन ठेवले होते. एक दिवस तिने मला बोलावले. माझ्या हातात पैसे देत मला म्हणाली “ ही घे तुझ्या आज्ज्याची शेवटची आठवण. मी खूप दिवस त्या नोटा सांभाळून ठेवल्या होत्या. मी शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेत होतो. त्या काळात अहमदनगर जिल्ह्यात एक दलित हत्याकांड घडलं होते. माझा चळवळीतील कार्यकर्ता मित्र शैलेश सावंत आणि मी दोघांनी ठरवल काही करुन आपन तिथे पोहोचायच. दोघांजवळ पैसे नव्हते. बलीप्रतीपदेच्या कार्यक्रमासाठी डॉ. भारत पाटणकर बलवडीला आले होते. त्यांनी आमच्या हातात पाचशेची नोट ठेवली. आम्ही तिथे पोहचलो. मोठा मोर्चा काढला. येताना पुण्यात उतरलो तर सगळे पैसे संपलेले. एक रुग्णवाहिका दिसली. तिला हात केला. आत बसलो. मी स्ट्रेचरवर झोपलो तर ड्रायव्हर हसत होता. जाताना त्या स्ट्रेचरवरुन एक प्रेत पोहचऊन आलोय हे त्याने सांगितलं. मी त्यावर झोपलो म्हणुन तो हसत होता. साताऱ्यात उतरताच ड्रायव्हरने पैसे मागितले. माझ्याकडे बाबांची शेवटची आठवण म्हणून ठेवलेल्या त्या शंभराच्या दोन नोटा होत्या. मी गुपचुप वॉलेट काढले. त्या दोन नोटा थरथरत्या हातांनी त्याच्या हातात ठेवल्या. काही वेळातच ती रुग्णवाहिका निघुन गेली.
आज जेंव्हा जेंव्हा मी नोटा पाहतो तेंव्हा तेंव्हा मला अंथरुनाला खिळलेले माझे आजोबा आणि मी कायमच्या गमावलेल्या त्यांच्या अमुल्य शंभराच्या दोन नोटा दिसतात…