धनुष्यबाणावर हक्क कोणाचा? : प्रा. हरी नरके
शिवसेनेतील सत्ता संघर्षात धनुष्यबाण कोणाचा यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. पण हा केवळ कायद्याचा प्रश्न आहे का, देशात सध्या लोकशाहीची तत्व पाळली जात आहेत का याचे परखड विश्लेषण केले आहे प्राध्यापक हरी नरके यांनी...;
१९५२ साली जेव्हा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा देशात शिकलेले लोक फक्त १५ टक्के होते. म्हणून उमेदवाराची ओळख कळण्यासाठी निवडणूक चिन्ह आवश्यक ठरले. (तसे ते मोजक्या लोकांना मताधिकार असतानाही होतेच.) लोकमानसात पक्षाचे चिन्ह शिक्का मारताना किंवा आता बटण दाबताना महत्वाचे ठरत गेले. बैल जोडी, गायवासरू असे करीत काँग्रेस हाताच्या चीन्हाने ओळखली जाऊ लागली. दीपक, कमळ असा जनसंघ, भाजपचा प्रवास झाला. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे असून त्यावर शिंदेगट दावा करतोय. त्यांना ते मिळेल का? मिळावे का?
जरी विधिमंडळ पक्षात २ तृतीयांश बहुमत शिंदे गटाला असले तरी सेनेच्या घटनेप्रमाणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आहेत. राज्यातील व देशातील पक्ष कार्यकारिणीचे ९० टक्के पदाधिकारी त्यांच्यासोबत असल्याने व पक्षात गावपातळीवर ते देशपातळीवर उभी फूट पडली नसल्याने धनुष्यबाण ह्या चिन्हावर त्यांचाच हक्क आहे. राज्यघटना आणि कायद्यानुसार हे चिन्ह शिंदे गटाला मिळूच शकत नाही.
पण चिन्ह कोणाचे याचा निर्णय करणार निवडणूक आयोग. श्री. टी एन शेषन यांच्या काळात हा आयोग स्वतंत्र होता.गेली आठ वर्षे हा आयोग म्हणजे संघ भाजपचे एक बाहुले झालाय. घरात वेठबिगार सालगड्याला किती स्वातंत्र्य असते? तेवढेही या आयोगाला नाही. त्यामुळे हा आयोग काय निर्णय घेईल ते मोदी शहाउपचाणक्य ठरवतील.
निवडणूक आयोग खिशात असताना निष्पक्षपाती आणि खुल्या वातावरणातील निवडणुका आता इतिहासजमा झाल्यात. हे म्हणजे अंपायरच जेव्हा एका टीमला सामील असतो तेव्हा मॅच फिक्सिंग झालेले असते. इथे तर निवडणूक आयोग म्हणजे भाजपची मोलकरीण. तेव्हा निकाल आधीच ठरलेला आहे.
सगळ्या यंत्रणा एकतर सडवल्या गेल्यात किंवा भाजपच्या दावणीला बांधल्यात. लोकशाहीची चेष्टा चालू आहे. आणीबाणीतसुद्धा परिस्थिती इतकी वाईट नव्हती. चीनमध्ये एकपक्षीय सत्ता आहे. पाकमध्ये लष्करशाही आहे तर श्रीलंकेत अराजक. भारतात या तिन्हींचे कॉकटेल केले गेलेय. धन्य हो मोदीशहायोगीभागवत उपचाणक्यसोमय्याराज! : प्रा. हरी नरके