समाजवादी, कम्युनिस्टांना आवाहन…
समाजवादी आणि कम्युनिस्ट नेत्यांना अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांनी समाजवाद, आदर्श समाज वगैरे शब्द वापरण्यासंदर्भात आवाहन केलं आहे. नक्की काय आहे हे आवाहन नक्की वाचा...;
काही दिवस "समाजवादी समाजरचनेशिवाय आपल्याला पर्याय नाही" अशा अर्थाची वाक्ये वापरणे बिलकुल बंद करा. बिलकुल म्हणजे बिलकुल. समाजवाद हा शब्द देखील उच्चारू नका.
भारताच्या समाजवादी बोलतात की "ते" तुम्हाला "इतिहासात" अडकवतात उदा : रशियात काय झाले आणि चीनमध्ये काय चालू आहे? याबद्दल तुम्हाला जाबदायी धरतात.
कशाचं काय आणि नाकात पाय! त्यांचा अजेंडा तुमचे साध्या प्रश्न लोकांच्या कानावर पडूच नये हा असतो.काही दिवस भविष्याबद्दल न बोलता फक्त वर्तमानाबद्दलच बोला.
तुम्ही "त्यांच्या"शी बोलूच नका. ज्यांना कशाचे काही देणे घेणे नसते, अभ्यास नसतो, फक्त शिव्या द्यायच्या असतात. तुम्ही साध्या सुध्या बाया बापड्यांशी बोला; त्या साध्या माणसांच्या साध्यासुध्या भौतिक प्रश्नांबद्दल त्यांच्याशीच बोला.
कोरोना लस आजच्या आज / लवकरात लवकर तुम्हाला सरकारतर्फे मिळाली पाहिजे की नाही? कोरोना काळात सरकारने रोजगाराला चालना देणारी धोरणे अमलात आणावी की नाही?
तुमच्या लहान मुलामुलींनी भरपूर शिकावे असे तुम्हाला वाटते की नाही? मग आताच्या खाजगी शाळा तुम्हाला परवडणार नाहीत; म्हणजे सरकारने शाळा कॉलेजवर भरपूर खर्च केले पाहिजेत असे तुम्हाला वाटतं की नाही?
ग्रामीण भागात शेतीवर, शहरात सार्वजनिक वाहतुकीवर, पिण्याच्या पाण्यावर, आरोग्यव्यवस्थेवर, म्हातारपणातील असुरक्षिततेबद्दल चांगले किमान शंभर प्रश्न तयार ठेवा…
सरकारने हे खर्च करायचे तर सरकारकडे कर रूपाने पैसे गोळा झाले पाहिजेत; मग त्यांना आपल्या देशाच्या टॅक्स / जीडीपी रेशो सर्वात कमी आहे ते सांगा? मग कर संकलनाबद्दल प्रश्न विचारा.
तुम्ही पैसे खर्च करायला तयार आहात, तर तुमचे मासिक उत्पन्न पुरेसे हवे? नाहीतर मुलांना शिक्षण सोडून पैसे कमवणे भाग पडेल. म्हणजे मग किमान वेतन बरे हवे आणि तुमचा स्वयंरोजगार चांगला हवा.
शासनाकडे नागरिकांनी भीक / पैसे मागण्याची भाषा न करता शासकीय धोरणे, अर्थसंकल्पीय तरतुदी यावर बोला.
आपण निवडून देतो सरकाराला आणि लोकशाहीत आपल्या मायबाप सरकारकडे आपण नाही मागणार तर कोण मागणार यावर बोलाय
समाजवाद, आदर्श समाज वगैरे शब्द वापरणे काही दिवस बंद करा; कारण तुमचे राजकीय विरोधक त्याचा बरोबर उलटा वापर करतात.
संजीव चांदोरकर (११ ऑगस्ट २०२०)