"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाली भाषेतील योगदान"
"द बुद्ध अँड हिस धम्म" हा ग्रंथ लिहिताना बाबासाहेबांना संपूर्ण त्रिपिटक आणि इतर बौद्ध ग्रंथ वाचावे लागले. त्यावेळेस, त्यांनीच लिहिलेल्या पालि व्याकरण व शब्दकोश या ग्रंथाचा उपयोग त्यांना झाला, महामानवाच्या जयंतीनिमित्त लेणी अभ्यासक आणि संवर्धक अतुल भोसेकर यांचे विश्लेषन;
"कार्लाईलच्या मते सत्य हा थोर पुरुषाचा पाया आहे. मात्र जर सत्यनिष्ठा आणि बुध्दी बरोबरच समाजाच्या गतिमानते बद्दल तळमळ असेल तर हा पुरुष, महापुरुष होत असतो कारण महापुरुष समाजाच्या शुध्दीकरणाचे आणि प्रशासकाचे काम करीत असतो". हे वाक्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "रानडे, गांधी आणि जीना" या भाषणांमधील. हीच कसोटी जर आपण बाबासाहेबांच्या कार्याला लावली तर लक्षात येईल कि बाबासाहेबांना महापुरुष म्हणून का संबोधले जाते!
बाबासाहेबांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक प्रवास हा थक्क करणारा आहे. असमतेने जातीपातीत विभागलेल्या आणि कायम शोषित राहिलेल्या समाजाला स्वातंत्र्य, समतावादी व मानवमुक्ती आणि कल्याणाचा मार्ग असलेल्या बौध्द धम्माची दीक्षा त्यांनी दिली. मात्र केवळ दीक्षा देऊन बाबासाहेब थांबले नाही तर "द बुद्ध अँड हिस धम्म" आणि "पालि व्याकरण व शब्दकोश" सारखे दोन अद्वितीय ग्रंथ लिहिले ज्यामुळे बाबासाहेबांचे पालि भाषेबद्दलचे प्रेम, आदर आणि दूरदृष्टी दिसून येते. या संदर्भात बाबासाहेब लिहितात,"बौद्धधम्माच्या प्रसाराबद्दल लोकांमध्ये ज्या दिवसापासून आतुरता उत्पन्न झाली आहे त्या दिवसापासून बौद्धधम्म म्हणजे काय, व त्याचे वाङ्मय काय आहे, व कोठे काय मिळते यासंबंधाने भारतीय जनतेमध्ये अतिशय मोठे कुतूहल दिसून येते".
१९४० नंतर म्हणजे वयाच्या पन्नाशी नंतर बाबासाहेबांनी "पालि व्याकरण व शब्दकोश" लिहिला. त्यांचे हे काम अद्वितीय होते. हा ग्रंथ, महाराष्ट्र शासनाने १९९८ साली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र लेखन आणि भाषणे या मालिकेतील १६वा खंड म्हणून प्रकाशित केला आहे. जगातील विविध भाषांचे शब्दकोश गेल्या शंभर वर्षात अनेक भाषातज्ञांनी लिहिले आहेत.
बाबासाहेबांच्या या ग्रंथाची तुलना, १७५५ मधे डॉ. स्यामुअल जॉन्सन यांच्या इंग्रजी शब्दकोशाशी केली जाते. मात्र त्यात एक मोठा फरक आहे. डॉ.जॉन्सनने जेव्हा इंग्रजीचा शब्दकोश लिहिला तेव्हा इंग्रजी ही जागतिक भाषा होऊ पाहत होती तर बाबासाहेबांनी जेव्हा पालि शब्दकोश लिहिला तेव्हा पालि जवळपास एक मृत भाषा होती. आणि मृत भाषा प्रवाहात नसल्यामुळे त्यातील वेगवेगळे शब्द शोधून, त्यांचे अर्थ व वाक्य रचना करणे हे महाकठीण काम बाबासाहेबांनी केले. या ग्रंथाचे चार प्रमुख भाग असून पहिल्या भागात, पालि इंग्रजी शब्दकोश आहे, दुसऱ्या भागात पालि मराठी, इंग्रजी, गुजराथी आणि हिंदी या भाषांचा विस्तारित शब्दकोश आहे तर तिसऱ्या भागात पालि व्याकरण आणि चौथ्या भागात बौद्ध पूजापाठ आहे. एवढंच नव्हे तर पालि भाषेतील वाक्य रचना कशी करावी व दोन व्यक्तींमधील घरगुती अथवा व्यावसायिक संवाद पालि मधे कसा असावा हेही बाबासाहेबांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे हा शब्दकोश जगातल्या इतर सर्व शब्दकोशांपेक्षा वेगळा ठरतो. चाईलडर्सने पालि इंग्रजीमधे शब्दकोश लिहिला होता पण सर्वसामान्य भारतीयांसाठी त्याचा उपयोग नव्हता. पालिमधे कच्चायन व्याकरण सर्वात जुने आहे. पालि व्याकरणासह वाक्यरचनेवर, त्याच्या धातू आणि प्रत्येयावर अनेक प्राचीन ग्रंथ आहेत. त्यामुळे पालिभाषेचे व्याकरण लिहीत असताना बाबासाहेबांना प्रचंड अभ्यास करावा लागला. या सर्व ग्रंथांचा अभ्यास करून, त्याची अतिशय सोप्या पद्धतीने मांडणी करून, सर्वसामान्यांना देखील समजेल असे व्याकरण आणि त्याची वाक्यरचना असे विलक्षण काम बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात केले आहे. त्यामुळे पालि भाषा व तिचे व्याकरण शिकताना सोयीचे जाते. भविष्यात भारतात बौध्द धम्माचे आकर्षण वाढेल आणि बुध्दविचार समजून घेण्यासाठी लोक पालि भाषा शिकतील हा दूरदृष्टीपणा ठेऊन बाबासाहेबांनी पालि शब्दकोश व व्याकरण हा ग्रंथ लिहिला जो आजही पालि भाषा शिकण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
सम्राट अशोक यांनी महिन्द आणि संघमित्ता यांना श्रीलंकेत बुद्धविचारांचा प्रसार करण्यास पाठविले. भन्ते महिन्द यांनी त्यांच्याबरोबर पालि त्रिपिटक आणि त्याच्या अठ्ठकथा घेऊन गेले. कालांतराने त्यांनी ते सिंहली भाषेत भाषांतर केले. काही कारणास्तव मूळ पालि अठ्ठकथा नष्ट झाल्या. त्यावेळेस इ.स. ५व्या शतकात, अत्यंत विद्वान, बौद्ध आचार्य बुद्धघोष यांनी श्रीलंकेत जाऊन या सर्व सिंहली अठ्ठकथांचे भाषांतर पालि भाषेत केले. चाईल्डर्सच्या म्हणण्यानुसार, आचार्य बुद्धघोष यांच्या सारख्या विद्वान, पालिभाषेच्या आचार्यांनी लिहिलेल्या अठ्ठकथा पुन्हा पालिभाषेत लिहून संपूर्ण जगावर, विशेषतः बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांवर मोठे उपकार केले आहेत.
कालांतराने बुद्धविचार जसे शेजारील देशांत पोहचले तसे पालि त्रिपिटक आणि अठ्ठकथांच्या प्रति थायलंड, बर्मा व इतर देशांत पोहचल्या. बुद्धघोषांनी लिहिलेले मूळ अठ्ठकथा आणि अर्हत महिन्द यांच्या सिंहली भाषेतील पालि त्रिपिटक हे श्रीलंकेतील अनुराधापुर येथील विहारात ठेवल्या होत्या. १२व्या शतकात श्रीलंकेवर आक्रमण केलेल्या चोला राजांनी अनुराधापुर लुटले. ते बुद्धविचारांचे विरोधक असल्याने त्यांनी सर्व बौद्ध ग्रंथ नष्ट केले. यात अर्हत महिन्द यांचे सिंहली भाषेतील त्रिपिटक आणि बुद्धघोष यांच्या पालि अठ्ठकथा नष्ट करण्यात आल्या. मात्र हे पालि ग्रंथ इतर देशांत सुरक्षित असल्याने नंतरच्या काळात त्यांचा प्रसार जगभर झाला.
"द बुद्ध अँड हिस धम्म" हा ग्रंथ लिहिताना बाबासाहेबांना संपूर्ण त्रिपिटक आणि इतर बौद्ध ग्रंथ वाचावे लागले. त्यावेळेस, त्यांनीच लिहिलेल्या पालि व्याकरण व शब्दकोश या ग्रंथाचा उपयोग त्यांना झाला.
द बुद्ध अँड हिस धम्म हा ग्रंथ लिहिताना बाबासाहेबांनी संपूर्ण पालि त्रिपिटकाचा अभ्यास केला होता याची साक्ष या ग्रंथाच्या प्रत्येक पानावर दिसते. त्याकाळी अस्पृश्य म्हणून हिणवले गेलेल्या समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा द्यायची हे बाबासाहेबांनी निश्चित केलेच होते, मात्र नवदीक्षित झालेल्या समाजाला तसेच ज्यांना बुद्धविचार समजून घ्यायचेत त्यांच्यासाठी सोप्या भाषेतील ग्रंथ त्यांना लिहायचा होता. १९५० ते ५६ या कालावधीत, बाबासाहेबांनी प्रकृती साथ देत नसतानाही अतिशय सखोल आणि तार्किकरित्या हा ग्रंथ निर्माण केला. पालि त्रिपिटकामधे काही विरोधभासी वाक्यांवर बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित केले व भ.बुद्धांच्याच पालिवचनांचा आधार घेत स्पष्टीकरणही दिले. या ग्रंथात बाबासाहेबांनी तळटीप न दिल्यामुळे अंतराष्ट्रीय स्तरावर काही जणांनी या ग्रंथावर शंका घेतली, मात्र १९६१ मधे डॉ.भदन्त आनंद कौसल्यायन यांनी बाबासाहेबांच्या ग्रंथातील कोणते वाक्य त्रिपिटक मधील कोणत्या सुत्तातील आहेत हे शोधून काढले व बाबासाहेबांनी लिहिलेला द बुद्ध अँड हिस धम्म या ग्रंथाला पालि त्रिपिटकच आधार असल्याचे सिद्ध केले. पालि त्रिपिटक हे तुलनेने प्रचंड आहे. बायबल पेक्षा ११ पटीने मोठे आहे. पिढी दर पिढी मौखिक रूपाने बुध्द वचनांचा प्रसार होत होता. त्यामुळे नकळतपणे त्यात काही अघटीत घटनांचा उल्लेख आला आहे. बाबासाहेबांनी अशा प्रत्येक घटनेचे खंडन केले आहे व सर्वसामान्यांना बोध होईल असा बुध्दांचा इतिहास आणि त्यांचा धम्म लिहिला.
महापंडित राहुल सांकृत्यायन यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास 'बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात, बौध्द धम्म पुनर्जीवित करताना असा खांब रोवला आहे कि कोणी तो हलवू शकणार नाही'.
बौध्द धम्म आणि बौध्द समाजासाठी जे योगदान बाबासाहेबांनी नागपूर येथे दीक्षा देऊन केले त्यापेक्षा कैक पटीचे योगदान बाबासाहेबांनी हे दोन ग्रंथ लिहून दिले आहे'. डॉ.बाबासाहेबांना १३१व्या जयंतीदिनी "खरी आदरांजली" अर्पण करायची असेल, तर पालि भाषा आणि बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करून, आपण ती द्यायला हवी तरच या महापुरुषाच्या कष्टाचे चीज होईल!
अतुल भोसेकर