टीव्ही पत्रकारितेतला ओरिजनल गुरु
अदानी समूहाने NDTV च्या शेअर्सवर ताबा मिळवल्यामुळे डॉ. प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला. मात्र डॉ. प्रणव रॉय यांच्या राजीनाम्यानं नेमकं काय बदलणार आहे? याविषयी ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.;
डॉ. प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी एनडीटीव्हीच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याची बातमी अजिबात अनपेक्षित नाही. अदानी समुहाने एनडीटीव्हीवर ताबा मिळवायला सुरूवात केल्यापासूनच रॉय पतीपत्नीला एक दिवस जावं लागणार हे स्पष्ट होतं.
आज राजीनाम्यानंतरही एनडीटीव्हीचे ३२ टक्के शेअर्स रॉय कुटंबियांकडे आहेत. मायनॅारिटी शेअर होल्डर म्हणून ते रहातीलही कदाचित, पण एनडीटीव्हीच्या निर्णय प्रक्रियेवर त्यांचा अधिकार रहाणार नाही. अदानी समूहाने संजय पुंगलिया किंवा सेन्थिल चेंगलवेरियन यांच्यासारखी त्याची खास माणसं आणून बसवली आहेत. या दोघांनाही मी चांगलाच ओळखतो. नेटवर्क 18 मध्ये हे आमचे सहकारी होते. अंबानीने आमचं नेटवर्क ताब्यात घेतलं तेव्हा या दोघांनी महत्वाची भूमिका बजावली हेती.
डॉ. प्रणव रॉय यांच्या एनडीटीव्हीच्या अशा राजीनाम्याने टीव्ही पत्रकारितेतल्या एका सुवर्णयुगाची समाप्ती झाली आहे. डॉ. रॉय हे या क्षेत्रातले माझे ओरिजनल गुरु असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्यांच्याकडे पाहून मी टीव्ही पत्रकारिता शिकलो, ज्यांच्याविषयी आजपर्यंत आदर टिकला, ज्यांचे पाय मातीचे निघाले नाहीत असे द्रोणाचार्य. त्यांची शैली मी कधी उचलली नाही, पण गाभा समजून घेतला. पुढे राजदिप सरदेसाईमुळे एनडीटीव्ही कुटुंबाचा भाग झालो. बिग फाईटपासून त्यांच्या असंख्य कार्यक्रमात भाग घेतला. पण डॅा रॅाय यांच्या ऋजुतेची छाप मनावर कायम राहिली.
१९८० पासून आजपर्यंत डॉ. रॉय यांनी ॲंकर केलेले बहुसंख्य कार्यक्रम मी पुन्हापुन्हा पाहिले आहेत. विनोद दुआंसोबत केलेल्या निवडणूक विश्लेषणापासून परवाच्या अमर्त्य सेन किंवा रघुराम राजन यांच्या मुलाखतीपर्यंत. डॉ. रॉय यांच्या तालमीत तयार झालेले पत्रकार आज भारतीय मिडियात इतिहास घडवत आहेत. मग तो राजदिप असो की बरखा दत्त किंवा श्रीनिवासन जैन. आजच्या भारतीय न्यूज टीव्ही उद्योगाची पायाभरणी डॉ. रॉय आणि राधिका रॉय यांनी केली आहे.
डॉक्टर रॉय यांना मी पहिल्यांदा भेटलो १९८० साली, इंडिया टुडेच्या निवडणूक पहाणीमधून. माझ्या पत्रकारितेला जेमतेम दोन-तीन वर्ष झाली होती. जनता पक्षाचं सरकार पडलं होतं. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांचं पुनरागमन होईल हे भाकीत डॉक्टर रॉय यांनी केलं होतं ते सेफॅालॅाजीच्या आधारे. तोपर्यंत हे नवं तंत्र भारतीयांना ठाऊक नव्हतं. डॅाक्टर रॅाय यांच्यासोबत होते जगप्रसिद्ध सेफॅालॅाजिस्ट डेविड बटलर. दोघांनी मिळून भारतीय निवडणुकांवर एक पुस्तकंही लिहिलं आहे.
डॅा. रॅाय आणि विनोद दुआंच्या निवडणूक विश्लेषणाच्या शैलीने भारतीय प्रेक्षकांना मोहिनी घातली. इंडिया टुडेपुरती असलेली ही निवडणूक पहाणी सरकारी दूरदर्शनवर अवतरली आणि घराघरात पोहोचली. इथूनच योगेंद्र यादव, महेश रंगराजन, दोराब सुपारीवाला वगैरे निवडणूक तज्ज्ञ उदयाला आले. सुहास पळशीकर यांच्यासोबत आयबीएन लोकमतने केलेल्या निवडणूक विश्लेषणाच्या कार्यक्रमाच्या यशाची पायाभरणी डॅा. रॅाय यांच्या या शाळेतच झाली होती.
१९८४ च्या सुमाराला डॅा.रॅाय दूरदर्शनवर वर्ल्ड धिस विक करायचे. दर शुक्रवारी रात्री जगभरातल्या घडामोडींचा आढावा ते घ्यायचे. एनडीटीव्हीचा प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचलेला असायचा. वृत्तसंस्थांच्या बातम्यांवर पोसल्या गेलेल्या भारतीय पत्रकारितेला ही चैन नवी होती. या इंग्रजी कार्यक्रमाने नवमध्यमवर्गाला आपलंसं केलं.
पुढे याच कामाच्या जोरावरNDTV 24x7 चं विश्व आकाराला आलं. एक विश्वासार्ह आणि पारदर्शक जग. या जगाचे कप्तान होते डॅा. रॅाय. या जगाचा एक छोटासा भाग मी होऊ शकलो हे माझं भाग्य. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजकीय विश्लेषकांना चांगलं मानधन देण्याची प्रथा एनडीटीव्हीनेच पाडली. आज सगळ्यांनी ती धाब्यावर बसवली आहे.
एनडीटीव्ही असा डॅा. रॅाय यांच्या हातून जायला नको होता. कारण डॅा. रॅाय पाठीशी होते म्हणूनच रवीश कुमार किंवा श्रीनिवासन जैन ताठ मानेने सत्याचा शोध घेऊ शकले. पण चॅनल चालवताना अनेक तडजोडी कराव्या लागतात आणि भांडवलदारी जगाला आपल्या फायद्याशिवाय काही दिसत नाही. त्यातून सत्ताधारी आणि बदमाश भांडवलदार यांची युती घातकच. मोदी,अंबानी, अडानी असे तीन महत्वाचे कलाकार या युतीत सध्या उघडपणे दिसताहेत.या अभद्र युतीने डॅा. रॅाय यांच्या चार दशकांच्या तेजस्वी पत्रकारितेचा बळी घेतला आहे. एनडीटीव्हीचा आवाज बंद करण्यासाठी ही चाल आहे.
डॅा. रॅाय, तुम्हाला अलविदा म्हणायला मन धजावत नाही. तुम्ही एनडीटीव्हीचे संचालक नसाल आता, पण आमच्या मनावर तुमचंच राज्य आहे. कृपया पत्रकारिता सोडू नका. कारण पुढच्या पिढ्यांना या ओरिजनल गुरुची प्रेरणा हवी आहे. तुमचं मंद स्मित एखाद्या दिपस्तंभासारखं वाट दाखवत राहील.