त्याने आ....रे ऽऽ म्हटल्यास तुम्ही का...रे ऽऽ म्हणा असं आंबेडकर आजच्या दिवशी का म्हणाले होते?
भारतातील शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक लढ्यातील कुळ कायद्या विरोधातील खोतीमुक्ती आंदोलनशेतकरी वर्गाच्या भावी चळवळीला दीपस्तंभ ठरले होते. ”१६ मे १९३८" म्हणजे आज च्या दिवशीच ८४ वर्षांपूर्वी खोती आणि कुळ कायद्या विरोधात आंबेडकरांनी नेमकं काय केलं होतं हे, सांगतायहेत कृषी अभ्यासक पंकज दळवी..;
खोती प्रश्नाची सूरवात झाली ती म्हणजे "13 एप्रिल 1929 रोजी रामपूर या चिपळूण तालुक्यातील गावांत शेतकऱ्यांच्या परिषदे मधुन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये अस्पृश्यता व खोतीपद्धतीवर घणाघाती हल्ला करताना म्हणाले होते की, "खोती पद्धतीमुळे दलित व शेतकरी वर्गांचे रक्तशोषण होत आहे व ही पद्धत नष्ट केल्याशिवाय त्यांना माणुसकीचे हक्क मिळणार नाहीत".
बाबासाहेबांनी 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या जाहीरनाम्यात सामाजिक,शैक्षणिक,राजकीय सुधारणे सोबतच जमीनदारांकडून होणारी पिळवणूक त्याविरुद्ध, शेतकरी कुळांचे संरक्षण अश्या स्वरूपाचे कायदे करण्याचा हा पक्ष प्रयत्न करील. असे जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते. बाबासाहेबांनी मुंबई विधानसभेत 17 सप्टेंबर 1937 ला खोती पद्धती नष्ट करण्यासंबंधीचे विधेयक सादर केले आणि विधानसभेचे सभापती जी.व्ही.माळवणकर यांनी विधेयकाला अनुमती दिली.यामुळे खोतीमुक्ती आंदोलनाला अधिक गती येऊ लागली.
"त्याने आ....रे ऽऽ म्हटल्यास तुमची का...रे ऽऽ म्हणण्याची तयारी झाली पाहिजे, व त्याने काठीने मारल्यास तुमची काठी उचलण्याची तयारी असली पाहिजे. प्रत्येक मनुष्यास संरक्षणाचा कायदेशीर अधिकार असतो हे मी तुम्हाला बॅरिस्टर या नात्याने सांगतो...."१६ मे १९३८" म्हणजे आज च्या दिवशीच ८४ वर्षांपूर्वी खोती आणि कुळ कायद्या विरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने चिपळूण येथील शेतकरी कुळांच्या झालेल्या सभेच्या अध्यक्षीय भाषणात म्हटले होते.
बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई इलाख्याचे प्रधानमंत्री बाळासाहेब खेर यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर खोतीमुक्त आंदोलन अधिक गतिमान झालं. भारतातील शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक लढ्यातील खोतीमुक्ती आंदोलन एक गौरवशाली आणि शेतकरी वर्गाच्या भावी चळवळीला दीपस्तंभ ठरले. 1949 साली कोकणातील खोती पद्धती कायद्याने संपूर्णपणे संपुष्टात आली.
बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन लोकशाही मार्गाने लढले गेलं. शेतकरी वर्गाच्या बंधमुक्ततेचा वैभवशाली इतिहास खोतीमुक्त आंदोलनाने घडविला, तरी ही अजून खोती संपलेली नाही, आज ही परिस्थिती थोडी बदलली असली तरी पूर्णता यातून लाखों कुळांची यातून मुक्ती झालेली नाही व बेदखल कुळ म्हणून लाखो शेतकरी प्रलंबित आहेत. खोती विरूद्ध लढणार्यांचें हात अजून बळकट व्हावेत, ह्या लढ्यातून निरंतर प्रेरणा मिळत राहो.
पंकज दळवी, गुहागर.