कोरोना' हे अजिबातच सोपे प्रकरण नाही
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढत असताना आजही काही जण बेदरकारपणे कोरोना वैगरे सब झुठ है अशा बाता मारत आहेत. पण कोरोनाचे संकट असे दुर्लक्षून चालणार नाही, याबाबत सांगत आहेत पत्रकार संजय आवटे....;
तो आजार आहे सामान्य, पण त्याचा संसर्गाचा झपाटा मोठा आहे. त्याचा इथला मुक्काम किती युगे असणार आहे, याविषयी कोणाकडे काही माहिती नाही. मुख्य म्हणजे, तो कमालीचा 'अनप्रेडिक्टेबल' आहे.
लक्षणे, परिणाम, आजाराचे स्वरूप आणि कोरोनानंतरचे गुंते याबद्दल खात्रीने काहीही 'जनरल' भाष्य वा भाकित करता येऊ नये, असे विचित्र वर्तन या विषाणूचे आहे. डॉक्टरांनाही अद्याप त्याच्या वर्तनाचे गूढ उकललेले नाही.
त्यामुळे काही जणांच्या वाट्याला आजारांची जी मालिका आली आहे, ती भयावह आहे.आता तर स्थिती अशी आहे की, प्रत्येकाच्या अगदी जवळचे असे कोणी ना कोणी 'कोरोना'च्या चरकातून गेले आहेच. किंवा, जात आहेत.
'कोरोना'चा बाजार मांडला जातोय, हे शब्दशः खरे आहे. तसे ही, फार्मा कंपन्या जगाची इकॉनॉमी चालवतात, असे म्हटले जाते. 'कोरोना'ने त्यावर शिक्कामोर्तब केले. पण, म्हणून 'कोरोना' हा प्रकार खोटा नाही. तो आहे. आणि, अत्यंत भयावह आहे. आपल्या सरकारांना 'लॉकडाऊन'शिवाय दुसरी अक्कल नाही. वर्ष उलटले तरी युद्धाची व्यूहरचना, शस्त्रसज्जता नाही. संवेदनशीलता नाही. पायाभूत संरचना नाही. सरकारांवर विसंबून राहून चालणार नाही. पण, आपल्याला स्वतःला जपावे लागेल.
तुम्ही लस घेतली असेल तरीही एवढे कराच:
१. मास्क, सॅनिटायझर (साबणही चालेल) आणि सुरक्षित अंतर याला पर्याय नाही.
२. दररोज वॉक घ्या.
३. किंचित व्यायाम करा.
४. पौष्टिक आहार घ्या.
५. शक्य तेव्हा गरम पाणी प्या.
६. सोईनुसार वाफ घेत राहा.
एकूण काय, प्रतिकारशक्ती वाढवा. खंबीर व्हा.
शंका असल्यास, तज्ज्ञ डॉक्टरांशी बोला.
काळजी करू नका. पण, काळजी घ्या. बेदरकार राहू नका.
येणारे काही दिवस आणखी कठीण असणार आहेत.
तेव्हा, जपा स्वतःला आणि आपल्या माणसांनाही.
PLEASE...!