राज ठाकरे यांना नक्की कोणता जातीयवाद संपवायचा आहे?
राज ठाकरे यांच्या भाषणात जातीयवादाचे मुद्दे अलीकडे सातत्याने समोर येत आहेत. राज ठाकरे यांना नक्की कोणता जातीयवाद संपवायचा आहे? यावर मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी केलेले विश्लेषण नक्की वाचा...;
राज ठाकरेंना उच्च वर्णीय वर्गाला त्यांच्या जातीभेद पाळण्यावरून त्यांच्या ब्राम्हणवादी प्रवृत्तीच्या बाबतीत सातत्याने मिळणारी जातीयवादी वागणूक थांबवायची आहे. या जातीयतेचा त्यांना सर्वात जास्त त्रास होतो. बाकी राष्ट्रवादीच्या जन्माअगोदर जातींचा अभिमान वाटायचा. दुसऱ्या जातीचा द्वेष केला जात नव्हता हे त्यांचे स्टेटमेंट बाळबोध नव्हे तर जाणीवपूर्वक केलेले आहे. साहेबांना खैरलांजी हत्याकांडावर वाईट वाटत नाही. खर्डा केसमध्ये खून झाला आरोपी सुटले याचे कधी वाईट वाटत नाही. चीड येत नाही. महाराष्ट्रात होणाऱ्या जातीय अत्याचारावर त्यांना कधी तांडव करावेसे वाटत नाही.
मात्र पुरंदरे यांचे वादग्रस्त लेखन ते पाठीशी घालतात. त्यांचे जाणीवपूर्वक समर्थन करतात. जेम्स लेन कोण फडतूस लेखक त्याला कोणी विचारत ? त्यावर चर्चा झाल्यानंतर तो प्रसिद्ध झाला. त्याला महत्व देऊ नका अशी भूमिका घेत त्याला पाठीशी घालणाऱ्यांना ते मोकळे सोडतात. त्यावर ते ब्र शब्द देखील काढत नाहीत. या उलट बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे शिवराय घराघरात पोहोचले असे श्रेय त्यांना देऊन मोकळे होतात. या उलट ज्या फुलेनी पोवाडा लिहून शिवरायांची समाधी शोधून शिवराय लोकांसमोर आणले त्या फुलेंचे नाव शरद पवार घेतात पण शिवरायांचे नाव घेत नाहीत असा गोंधळ निर्माण करतात.
राष्ट्रवादी सरकार ज्या मुद्द्यांनी खरंच जातीयवादी ठरेल ते मुद्दे सोडून वेगळ्याच मुद्द्यांवर राष्ट्रवादीवर टीका करतात. राष्ट्रवादी सरकार आल्यानंतर दलितांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढते. ॲट्रोसिटी केसेस चे प्रमाण वाढते. राष्ट्रवादीच्या तालुका गाव स्तरावरील अनेक नेत्यांचा संबंध जातीय अत्याचार घटनांमध्ये दिसून येतो. यावरूनही त्यांना राष्ट्रवादीला घेरता आले असते. खैरलांजी गावाला काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना पुरस्कार मिळतो. यावरून राष्ट्रवादीवर जातीयवादी असण्याची टीका करता आली असती. पण तसेही त्यांनी केलेले नाही. हा मुद्दा त्यांना समोर आणायचाच नाही.
राष्ट्रवादीच्या भूमिकेत नावाला तरी असलेल्या उरल्या सुरल्या पुरोगामी भूमिकेवर त्यांनी कडाडून हल्ला केला आहे. त्यांना कदाचित नावापुरते असलेले ते पुरोगामित्व पण संपावे असे वाटते. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मुळे राज्यातल्या दलीत मराठा प्रखर विरोधाची धार कमी झाली. या संघटनांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठा समूहात पसरले. मराठा तरुण जागे होत आहेत. याची चिंता साहेबाना भेडसावते आहे असे दिसते. हे दोन समूह सातत्याने एकमेकांसमोर उभे ठाकले पाहिजेत. अशी एक व्यवस्था काम करताना दिसते. राज ठाकरे एका बाजूला मराठा संघटनांवर टीका करतात तर दुसरीकडे भोंगा हटाव ची भूमिका पुढे आणतात. या भूमिकांमुळे राज ठाकरे कुणासाठी पोषक वातावरण निर्माण करत आहेत याचा अंदाज घेता येईल.
शाहू फुले आंबेडकर विरुद्ध छ.शिवाजी महाराज असा गोंधळ निर्माण करणारे वाक्य त्यांनी शरद पवार यांच्या निमित्ताने उपस्थित केले. गेल्या निवडणुकांमध्ये हे दंगे घडविण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे आणतील असे सूतोवाच भाजप विषयी करणारे राज ठाकरे स्वतः दंगली घडतील असे वर्तन का करत आहेत. यामागे कोणता राजकीय अजेंडा काम करतोय हे तपासणे महत्त्वाचे आहे. बाकी राज ठाकरे यांच्या भाषणाना मिळणाऱ्या शिट्ट्या टाळ्या यातून या घटनांचा आनंद कोणत्या वर्गाला होतोय. यामुळे कोण चेकाळत आहे. कोणाचे मनसुभे यातून सफल होणार आहेत हे सामान्य जनतेने ओळखायलाच हवे..