नेहरूवियन अभिनेता: दिलीप कुमार अमर रहे...
दिलीप कुमार यांच्यावर पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा प्रभाव होता असं बोलतात. मात्र, हे खरं आहे का? पंडीत नेहरु आणि दिलीप कुमार यांचे संबंध कसे होते? पाकिस्तानात जन्म घेतलेल्या युसुफ खानचे दिलीप कुमार नाव कसं झालं ? वाचा राज कुलकर्णी यांचा लेख
भारतीयत्वाचे अस्सल प्रतिक असणारे अभिनेते दिलीप कुमार म्हणजे नेहरू युगातील निव्वळ सिनेरसिकांचे नव्हेतर सर्व सामान्य जनतेचे देखील खरेखुरे हिरो होते. पेशावर इथं १९२२ साली कॉग्रेस कार्यकर्ते गुलाम सरवर खान यांचे अपत्य म्हणजे युसूफ खान! त्यांना त्यांच्या मार्गदर्शक असणा-या देविकाराणी यांनी दिलीपकुमार हे नाव सुचवले आणि दिलीपकुमार हे भारतीयांच्या ह्रद्यात अजरामर ठरले.
नेहरूयुगात भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या नेत्यांबरोबर तीन अभिनेते होते. राज कपूर, देव आनंद आणि दिलीप कुमार! विशेष म्हणजे तिघांचीही जन्मभूमी पाकीस्तान. आणि कर्मभूमी मुंबई. पेशावर येथून मुंबई प्रातांत आल्यावर पुण्यात त्यांनी आर्मी कँटीनमध्ये नोकरी करण्यास सुरूवात केली.
त्याच काळात 'चले जाव' स्वातंत्र्यलढ्याच्या आंदोलनात सहभाग नोंदवून भाषण दिले. दुस-या महायुद्धाचे ते दिवस होते. पोलिंसांनी त्यांना अटक करून त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये झाली. गांधीजींच्या सहका-यासमवेत त्यांनीही कारावास भोगत उपवासही केला. दिलीपकुमार यांच्या ' Dilip kumar- The substance and the shadow' या आत्मचरित्रात याबद्दल विस्तृत माहीती आहे.
दिलीप कुमार यांनी भारतीय समाजकारण, राजकारण, कला नि संस्कृती यावर आपला ठसा उमटवला. ते निवडणूक कधीही लढले नाहीत. पण निवडणूक प्रचारात मात्र काही वेळा भाग घेतला. व्हि.के. कृष्णनमेनन दक्षिण मुंबईतून १९५७ साली लोकसभेसाठी उमेदवार असताना दिलीपकुमार यांनी नेहरूंच्या आग्रहाखातर देव आनंद आणि राज कपूर समवेत कॉग्रेसचा प्रचार केला.
त्यांनी १९९४ साली व्ही.पी. सिंग यांचा आणि १९९९ साली डॉ. मनमोहन सिंग यांचाही प्रचार केला. पी.व्ही.नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात दिलीपकुमार यांना राज्यसभेवर नियुक्त करण्याचे चर्चेत होते. सन २००० साली त्यांची महाराष्ट्रातून कॉग्रेस खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती केली गेली. संसदेत त्यांची उपस्थिती कमी असली तरी ते आरोग्य नि कुटूंबकल्याण विभागाच्या स्थायी समितीचे सदस्य होते.
देव आनंद आणि राज कपूर यांच्याएवढे देखणे व्यक्तीमत्व दिलीपकुमार यांच्याकडे नव्हते. पण त्यांनी अभिनयाच्या जोरावर भारतीय जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. अभिनयातील सहजता, उर्दू नि हिंदी भाषेवरील प्रभुत्व आणि जनसामान्यांतील चेहरा हीच त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या उत्कर्षकाळात त्यांची ओळख 'ट्रॅजेडी किंग' ठरली तरी त्यांच्या अभिनयाने त्यांच्या सदाबहार व्यक्तिमत्वाने जनतेच्या मनावर गारूड केले.
दिलीपकुमार नेहरूंच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित होते. त्यांनी त्यांच्या चित्रपटात केलेल्या विविध भूमिका या नेहरूवियन विचार-तत्वज्ञान आणि आशावादाचे प्रतिक म्हणून पडद्यावर वावरल्या आणि लोकांनी त्यांवर भरभरून प्रेम केले. भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्रीयत्वावरील त्यांच्या निष्ठेतून त्यांची ओळख एक 'नेहरूवियन' कलाकार अशी आपसुकच बनली.
ब्रिटीश पार्लमेंटेरियन लॉर्ड मेघनाद देसाई यांनी दिलीप कुमार यांचे चरित्र लिहीले आहे. त्याचे नांव 'Nehru's Hero - Dilip Kumar in the life of India'! या पुस्तकाचे नांव लिहीताना 'in the life of Indian Cinema' असं न लिहीता 'In the life of India' असं लिहीलं आहे, हे खूप सूचक आहे.
दिलीपकुमार हे भारतीयांचे हिरो होते. देव आनंद नि राज कपुर यांच्या बरोबरीने दिलीप कुमार यांचेही नेहरू चाहते होते. पण सामाजिक नि राजकीय अर्थाने नेहरूंचे हिरो होते, अशी मांडणी करताना मेघनाद देसाई लिहीतात. की, नेहरूंनी १९५० साली कॉग्रेस मधील युवा कार्यकर्त्यांच्या संमेलनात मार्गदर्शन करण्यासाठी दिलीप कुमार यांना आमंत्रित केले होते.
दिलीप कुमार यांनी हे आमंत्रण स्वीकारून कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांना देशसेवेसाठी प्रेरित केले होते. त्यावेळी खरे तर युवक कॉग्रेसची स्थापनाही झाली नव्हती. पण ही घटना पुढे युवक कॉग्रेसच्या स्थापनेची आधार बनली.
दिलीप कुमार आज कालवश झाले, भारतीय कला क्षेत्रातील एका युगनेत्याचा अंत झाला हे खरे! पण दिलीप कुमार आणि त्यांचे विचार, त्यांची अदाकारी, त्यांनी केलेल्या भूमिका भारतीयांसाठी आजही चिरंतन आहेत. नेहरूवियन असणारे दिलीपसाब फक्त भारतातच नाही तर सार्या भारतीय उपखंडात सदैव अजरामर आहेत.