"मी स्वतःच घटना जाळेल" असं बाबासाहेब म्हणाले होते का?
जयंती अथवा संविधान दिन आला की बाबासाहेब "मी स्वतःच घटना जाळेल" असे म्हणाले होते अशी टिमकी वाजवणे एखाद्या गोटातून सुरू होते. मुळात विरोध प्रश्न विचारण्याला नसून त्या मागील संदर्भ न तपासता सोयीचे वाक्य घेऊन कुत्सितपणे ट्रोल करण्याला आहे.या विषयावरील सत्य मांडले आहे लेखक जय यांनी...;
काल एकाशी चर्चा करताना,त्याने विचारले की, बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले होते का? की मी घटना जाळेल म्हणून? मी विचारलं तू हे कोठे वाचलेस? तर म्हणाला, एक मित्र मला सांगत होता, मी विचारले, बरं मग हे कोठे लिहिले आहे किंवा बाबासाहेब असे कोठे म्हणाले याची काही नोंद आहे का? किंवा तुझ्या ज्या मित्राच्या तोंडून ऐकले त्याला ह्या बद्दल माहिती आहे का? तर त्याने उत्तर दिले की,माझ्या मित्रालाही हे कोणीतरी सांगितले होते. पण घटना लिहिणारे घटना जाळण्याची भाषा कशी करू शकतात? हा विचार मला अस्वस्थ करीत होता,परंतु माझा अभ्यास,वाचन कमी असल्याने मला उत्तर द्यायला जमलं नाही.
मुळात हा प्रश्न समोर आल्यावर बऱ्याच जणांनी अशीच स्तिथी होते, असो या विषयावरील सत्य आज आपण जाणून घेऊ.
जयंती अथवा संविधान दिन आला की बाबासाहेब "मी स्वतःच घटना जाळेल" असे म्हणाले होते अशी टिमकी वाजवणे एखाद्या गोटातून सुरू होते. मुळात विरोध प्रश्न विचारण्याला नसून त्या मागील संदर्भ न तपासता सोयीचे वाक्य घेऊन कुत्सितपणे ट्रोल करण्याला आहे. काहीजण धनंजय किर लिखित, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्राचा दाखला देतात, मुळात धनंजय किर यांच्या वरील ग्रंथात प्रकरण २४ मध्ये पान नं. ४५२/४५३ वर हा विषय आला आहे. परंतु त्या ग्रंथातील फक्त बाबासाहेबांचे " महाराज मला लोक म्हणतात, मी राज्यघटना केली,परंतु माझी अशी म्हणायची तयारी आहे की,राज्यघटना मीच प्रथम जाळून टाकीन,मला ती नको आहे,ती कोणाच्याच सोयीची नाही" हे सोयीचे वाक्य घेऊन फिरवले जाते,परंतु त्या भाषणाचा संदर्भ, विषय काय आहे हे जाणीवपूर्वक लपविले जाते.
यासाठी प्रत्येकाने बाबासाहेबांनी राज्यसभेत 2 सप्टेंबर 1953 मध्ये केलेले भाषण वाचावे. ते "आंध्र प्रदेश स्टेट बिल" यावर होतं. (अधिक माहितीसाठी BAWAS vol:- 15 page no. 856,861,862 वाचावे, तसेच "जनता" वृत्तपत्रात दिनांक ५-०९-१९५३ वरील भाषणाचा मजकूर छापला होता ) बाबासाहेब म्हणाले, भारतातील सामाजीक परिस्थितीत हिंदू बहुसंख्य लोकांचे वर्चस्व आपोआप स्थापित होते,कारण भारतीयांना धर्म,जात,भाषा,पोशाख आणी धर्मशास्त्राच्या आधाराने तो एकवटतो, मग अल्पसंख्यांकांचे काय? त्यांची तरतूद काय? त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम इथल्या बहुसंख्यांकांनी केले,म्हणून अल्पसंख्याकांसाठी तरतूद करावी लागेल,पण जेव्हा आम्ही तरतुद मागतो तेव्हा आम्हाला म्हटलं जातं, ohh, to recognize you, is to harm democracy". बाबासाहेब म्हणतात, भारतीय अल्पसंख्यांकांचे अस्तित्व तुम्हाला मान्यच करावे लागेल,अल्पसंख्यांकांना सत्ता व संपत्तीत समान वाटा मिळायलाच हवा, ते उदाहरण देताना म्हणाले, कॅनडा मध्ये सेक्शन 93 नुसार अधिकार देण्यात आले,तेथे दोन वर्ग आहेत 1) रोमन कॅथलिक ज्यांची भाषा फ्रेंच होती व ते अल्पसंख्यांक होते 2) प्रोटेस्टंट ज्यांची भाषा इंग्रजी होती, तरीही सेक्शन 93 नुसार अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्यात आले. दुसरे उदाहरण इंग्लड चे देताना बाबासाहेब म्हणाले,स्कॉटलंड,आयर्लंड आणि इंग्लंड मिळुन युनायटेड किंगडम झाले,हे एकत्र असले तरी यांचे कल्चर वेगळे आहे, तरी त्यांच्या संविधानाने त्यांना अधिकार दिले. भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या संरक्षणाचे खास अधिकार राज्यपालाला नसल्यामुळे त्यांचे योग्य संरक्षण झाले नाही आणि होऊ शकणार नाही, जर घटनेत फक्त बहुसंख्याकांच्या हक्कांचा विचार होऊन,अल्पसंख्यांकांच्या हक्कांची पायमल्ली होत असेल तर अशी घटना जाळणाऱ्यांच्या रांगेत मी सर्वात पुढे असेल, या वाक्याचा संदर्भ असा आहे, याचा ही पुरावा मी खाली जोडत आहे.