दादा हे वागणं बरं नव्हं

राजकीय नेते ज्या गोष्टी करतात सामान्य लोक त्याचेच अनुकरण करतात.त्यामुळे सामाजिक भान जपणाऱ्या कृतीची अपेक्षा या नेतेमंडळी कडून केली जाते. मात्र स्त्री-पुरुष समानते बाबत राजकारणी कमालीची असंवेदनशील असल्याचे वारंवार दिसून येते. राजकारण्यांच्या याच वृत्तीवर प्रकाश टाकणारा प्रियदर्शिनी हिंगे यांचा लेख नक्की वाचा…;

Update: 2023-07-29 09:39 GMT

यथा राजा तथा प्रजा हे वाक्य आपल्याकडे राजकीय नेत्यांच्या बाबतीत अनेकदा चपखल बसलेली दिसते. राजकीय नेते ज्या गोष्टी करतात त्याचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण केले जाते त्यामुळे सामाजीक भान जपणाऱ्या कृतीची अपेक्षा या नेतेमंडळी कडून केली जाते. मात्र समानते बद्दलची असंवेदनशीलता हे नेते मंडळी वारंवार दाखवतात. काही दिवसापुर्वी आपल्याला पालकमंत्री पद मिळाव यासाठी आपण पुरुष असल्याचे कारण देतं भरत गोगावले बोले की “पुरुष आहोत तर जास्त कामं करु”. त्यांच्या या वक्तव्यानंतर माध्यमातून त्यांचा समाचार घेतला गेला. तरी पक्षातून मात्र त्यांची कानउघडणी केल्या गेल्याच दिसले नाही.

अनेकदा ही नेते मंडळी बेताल वक्तव्य करताना दिसुन येतात गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य आठवत असेलच. या यादीत अजित पवारही मागे नाहीत याची प्रचिती विधानभवनात पावसाळी अधिवेशना दरम्यान आली. विधानसभेमध्ये तब्बल एक्केचाळीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या या मंजूर झाल्या. या मंजूर होताना अत्यंत मोठा गदारोळ झाला. आक्षेप घेण्यात आला. आरोप आणि प्रत्यारोप करण्यात आले. विभागवार जर मागण्या पाहिल्या तर जवळपास सहा हजार कोटीच्या मागण्या आहेत. पाणी पुरवठा विभाग जवळपास पाच हजार कोटीच्या मागण्या आहेत. कृषी आणि पशुसंवर्धन विमानात जवळपास पाच हजार कोटीच्या मागण्या आहेत. शालेय शिक्षण विभाग पाच हजार कोटी, सामाजिक न्याय, चार हजार कोटी, सार्वजनिक बांधकाम दोन हजार कोटी असं हे जे विभाग आहेत, त्यांच्या मागण्या भरपूर आहेत. या मागण्या सातत्याने करण्यात आलेल्या आहेत, त्या नव्याने मंत्रिमंडळामध्ये शपथविधी घेतलेल्या जे काही पवार अजित पवार यांच्या गटाच्या मंत्र्यांच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला काय समजायचे ते तुम्ही समजलाच असाल मात्र हा सर्व खेळ का ? हे जर पाहिले तर त्याचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरातच आहे ते म्हणतात की “दोन हजार एकोणीस, वीस, एकवीस जो फॉर्म्युला निधी वाटपासाठी राबवला होता.तोच आम्ही आता राबवत आहोत” म्हणजे विरोधकांना कमी निधी आणि सत्ताधाऱ्यांना जास्त निधी त्यामुळे हसत हसत त्यांनी उत्तर दिलं त्यावर सभागृहात जोरदार आक्षेप घेण्यात आला.

विरोधकांना निधी मिळाला नाही ही त्यांची तक्रार होती यावेळी सभागृहात माजी महिला बालविकास मंत्री तसेच आमदार यशोमती ठाकूर यांनी जोरदार आक्षेप नोंदवला या आक्षेपावर उत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले “ ताई ओवाळणी म्हणून मी काही देईल नाराज होवु नका” वास्तविक बघता निधी हा आमदारांना नागरिकांनाचे प्रश्न सोडवण्यासाठी दिला जातो जो वास्तविक बघता एखाद्या आमदाराचा अधिकार असतो. तो अधिकार नाकारून त्याला ओवाळणीचे नाव देणे म्हणजे उपचाराची भाषा आहे ही. महिलांना सतत दुय्यम वागणुक देणाऱ्या या पुरुषसत्ताक व्यवस्थेचे प्रतिक अजित पवार यांनी मांडलं आहे. सहजरित्या अधिकार नाकारायचा नी त्याला नात्याचा मुलामा लावायचा हे काही योग्य नाही. याच पध्दतीच्या भाषा त्यांनी काही दिवसापुर्वी महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठीही वापरलेली आपण माध्यमांतुन पाहिली होती. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान आपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा शरद पवार यांनी केली तर एकदम गदारोळ झाला. कार्यकर्त्यांनी तो अमान्य करत स्टेजकडे धाव घेतली एक तास चालेल्या या सर्व गदारोळात अजित पवार माईक हातात घेत उभे होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना बोलायची विनंती करताच “सुप्रिया तु काहीही बोलायचं नाही” असे फर्माणच काढले याच फर्माणाला वर दादापणाचा मुलांमा देत म्हणाले “मोठा भाऊ या नात्यान मी तिला सांगतोय”. जिथे तिथे महिलांचे अधिकार नाकारायचे नी त्याला नात्यांचा मुलामा चढवायचा हे वागणं पुरुषसत्ताक व्यवस्थेला हवा देणारेच आहे.नेते मंडळीच जर अस वागणार असतील तर कार्यकर्ते अगदी युवा यांना तुम्ही काय आदर्श दाखवणार? महिलांच्या सन्मानाचे फक्त शाब्दिक घोडे नाचवुन कसे जमणार? कृतीत महिला सन्मान केव्हा येणार? ही वरिष्ठ नेते मंडळीच जर असे महिलांशी असंवेदनशीलतेने वागणार असतील तर दादा हे वागणं बरं नव्हं !

Tags:    

Similar News