देशाचा स्मशान घाट झालाय

देशातील कोरोना व्यवस्थापनावरून आंतरराष्ट्रीय माध्यमं देशाच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण करत असताना देशाचा स्मशान घाट तयार झाल्याचे चित्र आहे. तरी मोदी सरकार जागे व्हायला तयार नाही असं म्हटलं आहे लेखक रवींद्र पोखरकर यांनी..;

Update: 2021-05-04 04:33 GMT

..जवळपास आख्ख्या देशाचा स्मशान घाट होण्याची वेळ आलीये.तरीही केंद्रातले निर्बुद्ध सुधरायला तयार नाहीत.परवा पुन्हा एकदा देशातील नामवंत १०० तज्ज्ञांनी केंद्राला आवाहन केलंय कि ऑक्सिजन-रेमडेसिवीरसारख्या औषधांचा पुरवठा,आवश्यक ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला उपलब्ध होणे,करोनासंदर्भात जागतिक संशोधनाबाबत देशाला अपडेट राखणे आदी सगळ्या महत्वपूर्ण बाबींमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी एक तज्ज्ञ समिती निर्माण करण्यात यावी.ही समिती सरकारला योग्य सल्ले देण्याचे काम करील.परंतु मोदींकडून तज्ज्ञांच्या या आवाहनाला काहीही प्रतिसाद मिळालेला नाही.ते स्वतः ब्रह्मज्ञानी असल्याचा त्यांचा स्वतःचा आणि त्यांच्या तमाम भक्तांचा विश्वास असल्याने असा इतरांचा सल्ला घेणे त्यांना कमीपणाचे वाटत असते.

नोटबंदी-जीएसटी-परदेश नीती-लॉकडाऊन-कोरोना-लसनिर्मिती कंपन्यांशी कॉन्ट्रॅक्ट आदी सगळ्याच विषयांत मोदींची पीएचडी असल्याने अर्थातच त्यांना अन्य कुणाच्या सल्ल्याची गरज नव्हतीच !असो..आज वाचनात आलेला प्रकार आणखी गंभीर आहे.

जगातील सर्व देश आपल्या नागरिकांसाठी मिळतील तिथून लस मिळवण्यासाठी आटापिटा करीत असताना आपल्याकडे याबाबतीत कसा आनंदीआनंद राहिला आणि त्याचेच दुष्परिणाम आता संपूर्ण देश कसा भोगतोय ते आपण सर्वच पाहतोय.आणखी संतापजनक बाब अशी कि या सर्व पार्श्वभूमीवर जगातील नामवंत लस निर्मिती कंपन्यांना आपल्या देशाची दारे अजूनही पूर्ण न उघडता चीनला मात्र मोदी सरकारने याबाबत पूर्ण झुकते माप दिल्याचं उघड झालंय.हो..हो..तोच चीन..ज्याने काही महिन्यांपूर्वी आपल्या अनेक सैनिकांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.ज्याने भारतीय हद्दीत कित्येक किलोमीटर बिनदिक्कतपणे अतिक्रमण केलंय..त्याच चीनच्या सिनॉफार्म कंपनीच्या केवळ पन्नास टक्के करोना प्रतिबंधाची खात्री असलेल्या लसीला भारतात येण्यासाठी तातडीने मान्यता दिलीय.इतकेच नाही तर अन्य काही चिनी कंपन्यांच्या लसींच्या आगमनालाही मान्यता देऊन टाकलीय.म्हणजे एकीकडे जगभरात करोना प्रतिबंधासाठी ९० टक्क्यांहून अधिक यशस्वी असलेल्या फायझर, बायोइन्टेक, नोव्हॅक्सिन आदी अनेक लसींना भारतात येण्यापासून आडकाठी आणायची आणि चिनी बनावटीच्या तुलनेने कमी यशस्वी लसींना मात्र मुक्तद्वार देण्याचे धोरण मोदींनी राबवलेले आहे.काही दिवसांत या चिनी लसी भारतीयांना टोचणे आता वेगाने सुरु होईल.रशियन स्फुटनिकला मान्यता दिलीय.परंतु त्यासाठी डॉ.रेड्डीज लॅबोटरीला आणखी आवश्यक ते सहकार्य मात्र केंद्राकडून पूर्णपणे मिळत नाही.

आपल्या सैनिकांची क्रूर हत्या केली तेव्हाही,आपली शेकडो किलोमीटर जमीन गिळंकृत केली तेव्हाही आणि आता लसींच्या बाबतीतही मोदी सरकार चीनपुढे पूर्णपणे झुकलंय हे लज्जास्पद आणि वेदनादायी चित्र पाहणं आपल्या नशिबी आलंय..!

(विशेष सूचना :- भक्तांनी या सगळ्याचे संदर्भ स्वतः शोधावेत आणि वाचावेत. अजूनही ज्यांनी आपलं इमान विकलेलं नाही अशा निष्पक्ष मीडियात उपलब्ध आहेत.इथे लिंक मागत बसू नये.मिळणार नाहीत.तितका वेळ नाही.आम्हाला उपजीविकेसाठी अन्यही कामे करावी लागतात.पोस्टमागे तुमच्यासारखे पैसे मिळत नाहीत !)

Tags:    

Similar News