'कोरोना' फ्रॉड आहे का?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट वाढत असताना समाजमनामध्ये गप्पांचा सुकाळ असतो. कोरोनापेक्षा अपघातात किती अधिक बळी जातात, वॅक्सिन हे फ्रॉड आहे, राजकारण्यांनी आणलेला हा स्कॅम आहे, अशा चर्चांचा खरमरीत शब्दात समाचार घेतला आहे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पोखरकर यांनी...;
श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत असताना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यात अडचणी येवून रुग्णवाहिकेतच जीव गमावलेले अनेक पेशंट मागच्या लाटेत आम्ही पाहिलेत.आता बेड्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असली आणि एकूणच आरोग्य व्यवस्था सुधारलेली असली तरी ज्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढतेय ते पाहिल्यावर ही व्यवस्थाही लवकरच अपुरी पडेल यात शंका नाही.बेजबाबदारीने वागणारे लोक अजूनही शहाणे झाले नाहीत तर लवकरच पुन्हा एकदा मागच्यासारखी भयकारक परिस्थिती इथे उद्भवेल हे सांगायला कोणत्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही.
लॉकडाऊन नको पासून ते इतर अनेक सल्ले सरकारला देणारे हजारो लोक आपल्याला इथे सापडतील पण त्यापैकी कितीजण सरकारने, तज्ज्ञांनी यापूर्वी सांगितलेले नियम पाळत असतील हा संशोधनाचा विषय.या कोरोनाकाळात स्वयंशिस्त आणि जबाबदारीची जाणीव हा प्रमुख भाग आहे.त्यात आपण पूर्णपणे नापास झालेलो आहोत.कामधंद्यानिमित्त बाहेर पडावे लागणं हा कर्तव्याचा आणि मजबुरीचा भाग झाला पण आजही लग्नसोहळ्यांना पाचशे-हजार लोक कसे काय जमतात ? घरातील आणि अगदी जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य लोक फोनवरून नवदाम्पत्याला शुभेच्छा देऊ शकत नाहीत काय ? सोहळा फेसबुकवरून,युट्युबवरून,व्हिडीओ कॉल आणि अन्य मार्गांनी लाईव्ह करता येतो आणि त्यात सहभागी असल्याचा आनंद आपण घेऊ शकतो हे आधुनिक तंत्रज्ञानाने वरदान दिलेलं असतानाही स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालून गर्दीत जाण्याचा अट्टाहास लोक का करतात ? आणखी अशाच अनेक बाबी..असो..!
जवळपास प्रत्येकाने आपल्या नात्यातील किंवा परिचयातील कुणाला न कुणाला गेल्या वर्षभरात कोरोनामुळे गमावलेलं असतानाही अजूनही अनेक लोक परिस्थितीचं गांभीर्य मानायला तयार नाहीत.काय म्हणतात..कोरोनापेक्षा अपघातात किती अधिक बळी जातात,वॅक्सिन हे फ्रॉड आहे, राजकारण्यांनी आणलेला हा स्कॅम आहे..ठीकंय बाबांनो..तुमचा विश्वास नाही ना..नका मानू.पण जे मानताहेत..स्वतःची आणि इतरांचीही आवश्यक काळजी घेताहेत त्यांना तुमचा शहाणपणा (खरंतर मूर्खपणा !) तरी शिकवू नका.तो तुमच्याजवळच ठेवा.तुम्ही मास्क-शारीरिक अंतर वगैरे काहीही पाळू नका..लस घेऊ नका..स्वतःही धोक्यात रहा आणि इतरांसाठीही धोकादायक रहा..त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला..😡