"मायबाप" सरकार कोठे आहे?
देशातील विविध समस्यांचं निराकरण का झालं नाही? असा सवाल सरकारच्या मंत्र्यांना केला असता, ते नक्की काय उत्तर देतात तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा संजीव चांदोरकर यांचं विश्लेषण;
अर्थव्यवस्थेत मंदी का आली, तर कोरोनामुळे सर्वच जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे म्हणून (ती कोरोनाआधी देखील गेली अनेक वर्षे होती याबद्दल बोलायचे नाही?) गरिबी, दारिद्र्य का आहे, तर गरीब लोक जास्त मुलांना जन्म देतात म्हणून... (आर्थिक स्थर उंचावला की स्त्री पुरुष कमी मुलांना जन्म देतात. हे वैश्विक आर्थिक सत्य आहे. याबद्दल बोलायचे नाही? )
शहरांमध्ये पाणी का साचते? तर हवामान बदलामुळे पाऊस अति होतोय म्हणून (नागरी नियोजनाचा अभाव, पाणी वाहून जाण्याच्या मार्गात रिअल इस्टेट याबद्दल काही बोलायचे नाही?)
बेरोजगारी का आहे, तर शिक्षण व्यवस्था रोजगाराभिमुख नाहीये म्हणून (शिक्षण सम्राटांना शैक्षणीक संस्था काढू द्यायच्या, ना प्राध्यापक, ना प्रयोगशाळा हे कोणी केले याबद्दल बोलायचे नाही?)
सार्वजनिक उद्योग आजारी का पडतात, तर म्हणे अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार आहे म्हणून (आपल्या मालकीच्या सार्वजनिक उपक्रमांना सवतीच्या मुलांसारखे कोण वागवते याबद्दल बोलायचे नाही?)
गेली काही दशके होतंय काय की शासनाचे प्रवक्ते, ज्यांनी निर्णायक कृती करायची ते मंत्री, प्रश्न का निर्माण झाला याच्या कारणांची जंत्री देत बसतात; सगळे देवाची करणी, निसर्गाची अवकृपा, शत्रू राष्ट्रे यावर बिल फाडतात.
"अहो कारणे आहेत आम्हाला मान्य आहे, तुम्ही काय करणार त्यावर बोला" हे सामान्य नागरिकांनी सांगितले पाहिजे.
कारण मायबाप सरकारला आपण निवडून दिलेले असते आणि आईवडिलांवर जसा मुलांचा हक्क असतो तसा नागरिकांचा आपल्या सरकरवर हक्क असतो म्हणून... आता याचा सरकार भाजपचे आहे. काँग्रेसचे की शिवसेनेचे याच्याशी काहीही संबंध नाही.
संजीव चांदोरकर