ती शर्वरी दीक्षित, मी शर्मिष्ठा भोसले आणि रिव्हर्स कास्टिझमचं माया मोहजाल
कधी कधी एखाद्या समाजावर आपण ज्या जातीत जन्माला आलो आहोत. त्या जातीतील लोक अन्याय करतात. अशा वेळी आपण काय करावं. तथाकथित उच्च जातीचा अभिमान बाळगावा की, जातीची कुंचले फेकून देऊन अन्यायाच्या विरोधात उभं राहावं? वाचा शर्मिष्ठा भोसले यांचा डिकास्ट होण्याचा प्रवास... तुम्हालाही खूप काही शिकून जाईल.;
दलित नितीन आगेची हत्या झाली होती. आरोपी मराठा. मी जर्नालिझम करत होते. एफटीआय आणि आम्ही रानडेच्या मुला-मुलींनी मिळून पुण्यात निषेध मार्च काढला होता. पुणे ते खर्डा लॉंग मार्च पण काढला पुढं. खर्डा संसद. तिकडंपण गेले होते मी... तर, पुण्यातला मार्च.
या मार्चमध्ये चालताना एकाएकी मला माझ्या 'भोसले'असण्याची जाणीव झाली. गिल्ट आला. सोबत केशव वाघमारे होता. केशवदाला मी गिल्ट बोलून दाखवला. म्हणलं, 'तिकडे आमचेच लोक नितीन आगेला मारणार, इकडं मी पुण्यात निषेध मार्चमध्ये चालणार. मी माझ्या मराठा असण्याचं काय करू? मला ते टोचतंय, गिल्ट आलाय...' खूप काय काय. केशवनं ऐकून घेतलं. म्हणला,
'हे बघ, तू तुझं मराठा असणं काही ठरवून जन्माला घातलं नाहीस. त्याचा अभिमान बाळगत नाहीस ना? मग तसाच गिल्टही बाळगू नको. ते तसं आहे तर आहे. एकदा हे स्वीकार मग त्याला ओलांडून जाण्याचा प्रवास सुरू होईल, मग तो सतत सुरूच राहतो...'
असं काय काय तो बोलला होता. आता शब्द नीट आठवत नाहीत. पण आशय असा होता.
केशवदा, तुला जाहीर थँक्स!
एका तुलनेनं प्रिव्हिलेज्ड जातीत जन्मलेल्या मला तू खोट्या व्हिक्टिमहूडमध्ये जात, 'माझं दुःख कसं मोठं, मलाही जात टोचते, मी काय करू...' असं म्हणत तुलनेनं कमी प्रिव्हिलेज्ड असलेल्या किंवा नसलेल्या असंख्य समूहांच्या गडद दुःखाकडे कळत-नकळत दुर्लक्ष करण्यापासून वाचवलंस. आज त्या शर्वरीच्या निमित्तानं हे सगळं आठवलं.
मी डिकास्ट-डीजेंडर होत आले, तोच माझा प्रयत्न असतो. अगदी झाले असंही मी किंवा इतर कुणी म्हणतो तेव्हा त्याची प्रामाणिकता नाकारण्याचं कारण नाही.
पण तुम्ही डीक्लास-डीजेंडर झालात तरी भवताल तसा झालेला नसतो. त्याला तसं न होण्यातले फायदे हवे असतात. तुम्हाला नको असले तरी. मी स्वतः माझं वूमन कार्ड किंवा मराठा कार्ड कधीच कळत-नकळत वापरत नाही. मात्र, समोरच्याच्या मनात अनेकदा माझं मराठा असणं, स्त्री असणं जागतं असतं. याला मी कसं रोखणार? त्या व्यक्तीनं किंवा व्यवस्थेनं मला ते तसं जोखण्याचे फटके मला बसतात तसे सटल लेव्हलला किंवा थेट असो पण फायदेही मलाच मिळतात.
ही आत्मस्तुती आहे, पण खरोखर सांगते, मला जाणीव आहे, मी स्त्री, जरा नाकीडोळी बरी दिसणारी स्त्री आणि मराठा असण्याचे फायदे या भारतीय व्यवस्थेत, इव्हन पत्रकारितेत अनेकदा मला नको असतानाही झालेले आहेत. मग जेव्हा केव्हा मी माझ्या समग्र प्रगती-प्रवास, वाढ, जडणघडण सगळ्याबाबत बोलते, तेव्हा ही कन्फेशन्स मी द्यायला नकोत का? की केवळ सहजसोपं 'बहुजन कार्ड' आणि 'वूमन कार्ड' व्हिक्टीमहूडसाठी वापरण्याचा मोहच मी केला पाहिजे?
अर्थात हा व्यक्ती म्हणून ज्याचा त्याचा विवेक आणि सच्चेपणा आहे. शिवाय प्रागतिक-पुरोगामी असण्याची परीक्षा 'हे केलं आणि संपलं' अशी नाही ना! तो विवेक क्षणाक्षणाला जोखला, तपासला जात असतो. आणि जाणारच. कारण तुम्ही 'जातीयवादी, लिंगविषमतावादी' नसाल. पण आसपासची सगळी व्यवस्था तशी ऑपरेट व्हायली ना! आणि सामाजिक सांस्कृतिक भांडवल, सुरक्षितता. ते सगळं दृश्य नसलं तरी मरेपर्यंत ती समृद्ध अडगळ असतेच की तुमच्यासोबत...
एकूण, मला वाटतं, जातीबाबत कुणाला काही चिकित्सक आणि बदलाकडे नेणारं लिहायचंच असेल तर सुरवात आपापल्या जातीय, सांस्कृतिक लोकेशनच्या, जे पुन्हा सतत बदलत असतं, कन्फेशनपासून केली पाहिजे.
#तेरीकमीजमेरीकमीजसेसफेदहोसकतीहै
शर्मिष्ठा भोसले