भिडेचे पुन्हापुन्हा बेताल वक्तव्य
डॉ. बाळ गांगल यांनी महात्मा फुले आणि शिवाजी महाराजांबद्दल धादांत खोटी विधाने केली होती तसचं आता मनोहर भिडे ही त्याच पद्धतीची विधाने करत आहेत वाचा प्रा. हरी नरके यांचा सविस्तर लेख
१९८८-८९ साली मी महाविद्यालयात शिकत असताना हिंदुत्ववादी साप्ताहिक सोबतमध्ये डॉ. बाळ गांगल यांचे २ लेख प्रसिद्ध झाले होते. "हे कसले फुले? ही तर फुले नावाची केवळ दुर्गंधी." आणि दुसरा लेख "शिवाजी महाराजांना शिव्या देणाऱ्या या महात्म्याचे महात्म्य तपासून पाहा."
दोन्ही लेख भयंकर होते. धादांत खोटी विधाने, महात्मा फुले यांची वाक्ये विकृत करून त्यांच्या नावावर खपवणे, बनावट वाक्ये तयार करून ती फुले यांच्या तोंडी घुसवणे, असत्यकथन, सत्यापलाप असे अनेक गुन्हे करणारे सराईत गांगल यांच्या या लेखणावर सार्वत्रिक संताप व्यक्त झाला. मोर्चे निघाले, सोबतचे अंक जाळले गेले. विधान परिषदेनेच गांगल यांच्यावर हक्कभंग दाखल केला. तो पुढे सिद्धही झाले. गांगल माफी मागायला तयार नव्हते. गांगल यांचा गुन्हा सिद्ध झाल्याने ते तुरुंगात जाणार होते. पण परिषदेचे सभापती होते जयंतराव टिळक. लोकमान्य टिळकांचे नातू, त्यांनी मागच्या दाराने माफीनामा जोडून गांगलांना मुक्त सोडले.
मी तेव्हा गांगल यांना भेटून तुम्ही असे का केलं? अशी विचारणा केली असता ते मला म्हणाले, " मी वयाच्या ५ व्या वर्षापासून शाखेवर जातो. तिथे मला शिकवले गेले की पूर्वी ब्राह्मणांना लोक देव मानत असत. पण फुल्यांनी त्यांचे ते स्थान नष्ट करून आमच्या जातीची पवित्र आणि श्रेष्ठ गादी हिसकावून घेतली होती. आमची किंमत कमी केले. त्यांच्या या चुकीला माफी नाही. त्यामुळे गेली ५५ वर्षे मी फुले यांच्यावर डूख धरून होतो. लवकरच आमच्या विचारांची सत्ता महाराष्ट्रात येईल असे वातावरण असल्याने मी असे लेख लिहिले. पण अंगलट येते आहे असे बघून संघाने मला डिसओन केले."
मी त्यावर गांगल यांचा खोटेपणा उघड करणारे २२५ पुरावे देऊन " महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन" हे पुस्तक लिहिले. त्याच्या प्रती हातोहात खपल्या. इस्लामपूरचे नागनालंदा प्रकाशन लवकरच त्या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित करीत आहे.
२५ वर्षांपूर्वी सनातन संस्कृती संस्था व सनातन प्रभात यांनी महात्मा फुले यांच्या बदनामीची मोहीम हाती घेतली. पोस्टर्स लावली. पुस्तक छापले. आक्रमक कँपेन चालवले. त्यावेळी त्यांच्याविरोधात पहिली आणि एकमेव पोलीस तक्रार मी दाखल केली होती. ती तडीला लावली. ४ कार्यकर्त्यांना शिक्षाही झाल्या.
१६ वर्षांपूर्वी सनातन प्रभातमध्ये मनोहर कुलकर्णीचे (भिडे) भाषण प्रसिद्ध झाले होते. महात्मा फुले हे देशद्रोही होते असा जाहीर आरोप कुलकर्णीने त्यात केला होता.
मी त्याविरोधात खूप भाषणे दिली. लेख लिहिले.
त्यानंतर भिडे मनूगौरव करणारे व संत ज्ञानोबातुकाराम यांचा अपमान करणारे बोलला. एका वाहिनीवर त्याने बाबासाहेबांच्या तोंडी मनुगौरव घुसवला. त्याचा प्रतिवाद करणारी मुलाखत मी दिली. लेख लिहिले. भाषणे केली.
भिडे पुन्हापुन्हा हेच बोलत असतो. परवा अमरावतीला बोलला.
आता समाजमाध्यमावर भिडेचा निषेध होत आहे. काही राजकीय पक्ष आणि नेते त्याचा निषेध करीत आहेत. पोलिसात तक्रारी दाखल करीत आहेत. समाज जागा होतोय हे चांगले लक्षण आहे. यात सातत्य हवे. पाठपुरावा नी प्रबोधन याला शॉर्टकट नाही. नसावा.
- प्रा. हरी नरके