इनबॉक्समधील 'आतला आवाज'

एकाच काळात, हिटलर - मुसोलिनी असे विखारवीर निर्माण होत असताना, सत्य, अहिंसा आणि प्रेमाचा धर्म सांगणारे गांधी जन्माला आले. मात्र, या गांधीचा आता उपयोग काय? वाचा संजय आवटे यांचा विचार करायला लावणारा लेख | #MaxMaharashtra

Update: 2020-10-21 07:19 GMT

तरूण मित्र:

सर,

ट्रम्प, पुतिन, जिनपिंग, मोदी यांचीच भाषा जगाला आज समजत असताना, तुमचे गांधी कसे उपयोगाचे ठरणार आहेत? गांधींचा काळ वेगळा होता. आता गांधी आले, तरी ते काही करू शकणार नाहीत. युद्धज्वर हा नव्या जगाचा आजार आहे. विखार हीच जगाची भाषा आहे. त्याला इलाज नाही. प्रेमाच्या भाषेचा उपयोगही होणार नाही.

तुम्हाला हे समजत नाही का?

संजय आवटेः

मित्रा,

हाच तर गांधींसाठी सर्वोत्तम काळ आहे.

गांधींचा काळ काही वेगळा नव्हता.

तो याहून भयंकर होता.

पहिले आणि दुसरे महायुद्ध याच्यामध्ये, अशा युद्धज्वर भयंकर वाढलेल्या काळात जगभरात हिटलर आणि मुसोलिनी जन्माला येत असताना, भारतात मात्र 'गांधी' जन्माला आला!

मुसोलिनी पत्रकारिता सोडून राजकारणात आला १९१२ मध्ये.

हिटलर जर्मनीत आला १९१३ मध्ये.

गांधी भारतात परतले १९१५ मध्ये.

हिटलर जर्मनीचा राष्ट्रीय नेता झाला, तो १९२१ मध्ये.

मुसोलिनी इटलीचा पंतप्रधान झाला, तो १९२२ मध्ये.

गांधी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले १९२४ मध्ये.

हिटलर, मुसोलिनी, गांधी हे तिघेही लेखक, पत्रकार, अत्यंत प्रभावी कम्युनिकेटर!

हिटलरने आत्मचरित्र - माइन काम्फ - लिहिले ते १९२३ मध्ये.

गांधींनी त्यांचे आत्मचरित्र- माझे सत्याचे प्रयोग- लिहिले ते १९२७ मध्ये.

मुसोलिनीचे आत्मचरित्र - माय ॲटोबायोग्राफी - आले ते १९२८ मध्ये.

एकाच काळात, हिटलर - मुसोलिनी असे विखारवीर निर्माण होत असताना, सत्य, अहिंसा आणि प्रेमाचा धर्म सांगणारे गांधी जन्माला आले.

हिटलर आणि मुसोलिनी संपले, पण गांधी आजही मरत नाही.

त्यामुळे गांधींच्याच रस्त्याने आपल्याला जावे लागणार आहे.

*

क्या बोलता/ ती तू?

(संजय आवटे यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Similar News