झुंडमधील सौंदर्यशास्त्र : डॉ. श्रीमंत कोकाटे

झुंड चित्रपटातील भाषा जनमानसाची भाषा आहे. चित्रपट हिंदी आहे. हिंदी चित्रपसृष्टीतील मराठी थीम हा कदाचित पहिलाच प्रयत्न असेल. अधून-मधून मराठी शब्द हा मराठीचा गौरवच आहे. दाक्षिणात्यांची नवनिर्मिती महाराष्ट्राकडे सरकत आहे ही बाब अभिमानाची आहे. याचे श्रेय नागराज यांच्या कल्पकतेला आणि परिश्रमाला द्यावे लागेल, सांगाताहेत इतिहासाचे अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे....;

Update: 2022-03-06 09:22 GMT

 नागराज मंजुळे यांच्या सैराट नंतर झुंड हा बहुचर्चित हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील एक कलाकार माझे जिवलग मित्र, नामवंत वक्ते, अभिनेते, अभ्यासक डॉ. संजय चौधरी यांनी प्रीमियर शोसाठी पास पाठवून आग्रहाचे निमंत्रण दिले आणि निर्माते, दिग्दर्शक,कलाकारांसह झुंड चित्रपट पाहण्याचा योग आला.

नामवंत पत्रकार संपादक प्रसन्न जोशी यांनी नागराज मंजुळे यांचे वर्णन फिल्मी दुनियेतील नेमाडे असे केलेले आहे आणि ते एकदम सार्थ असे आहे. डॉ भालचंद्र नेमाडे यांनी ज्याप्रमाणे मराठी साहित्यातील कादंबरीचा आयाम बदलला, त्याप्रमाणे नागराज यांनी फिल्मी दुनियेतील चित्रपटाचा आयाम बदलला. किमान मराठी चित्रपटाचा तर निश्चितच बदलला. ख्या ख्या हसणे, अंग वाकडे-तिकडे करणे आणि नाकातून उच्चारत बोलणे म्हणजे अभिनय नाही, तर सहजता व त्या पात्राशी एकरूप होणे म्हणजे अभिनय होय, हा अस्सल निकष नागराजने दिला. झुंडमधील आदिवासी आर्चीच्या वडीलामध्ये तो ओतप्रोत दिसतो. झुंडला चौकट मोडणारे अजय-अतुल यांचे संगीत आहे.

चित्रपटात जायचे म्हणजे गोरापान रंग, सरळ नाक आणि उंच ध्येययष्टी पाहिजे अशी एक अंधश्रद्धा भारतीय परिप्रेक्ष्यात आहे. अर्थात हिरो-हिरॉईन हे उंच, गोरेपान आणि सरळ नाकाचे असावेत, असे अनेकांना वाटते, यालाच ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र म्हणतात. याला नागराज सुरुंग लावतात. नागराज यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींना घेवून चित्रपट बनवले. कला, अभिनय ही कोणाची मक्तेदारी नाही, हे त्यांनी दाखवून दिले.

नागराज यांनी झुंडमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या व्यथा आणि वेदना मांडल्या आहेत. तेथील गरिबी, आरोग्याच्या समस्या, व्यसनाधीनता, निरक्षरता, त्यांच्या जगण्याची कोंडी, लैंगिक समस्या, त्यांची गळचेप, महिलांच्या समस्या, शिक्षणाच्या समस्या, त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी, गँगवार हे प्रकर्षाने दाखवले आहे. आपल्याकडे परिणामाची चर्चा होते परंतु कारणे शोधून त्यावरती उपाय दिले जात नाहीत. झुंड उपाय देतो.

सर्वहारा वर्गाच्या उद्रेकाला रानटी, गुंड, झुंड म्हणून हिणवले जाते, याचा प्रत्यय भांडारकर प्रकरणी महाराष्ट्राने घेतला आहे. तेव्हा प्रामाणिक शिवप्रेमिना गुंड, तालिबानी, रानटी, गुंड म्हणून प्रथितयश माध्यमांनी हिणवले होते. नागराज यांनी झुंडीमध्ये काय सामर्थ्य असते हे दाखवून दिले आहे. झुंड म्हणून तुम्ही कोणाच्या कर्तुत्वावर - गुणवत्तेवर नकाराची फुली मारू शकत नाही. ते सामाजिक आणि राष्ट्रीय स्वास्थ्यासाठी हानीकारक असते. झुंडला सकारात्मक दिशा देणारा हा चित्रपट आहे.

झुंडचे वेगळेपण हे आहे की यामध्ये केवळ तेथील गुन्हेगारीवर चर्चा नाही तर त्यांच्यामध्येही प्रचंड गुणवत्ता असते. त्यांच्या गुणवत्तेकडे झुंड सकारात्मकतेने पाहतो. झोपडट्टीतील म्हणून कोणाला तुच्छ लेखणे हा सुसंस्कृतपणा नाही, तर व्यवस्थेने त्यांच्या गुणवत्तेचे दमण केलेले आहे. झोपडट्टीतील गुणवत्तेला संधी दिली पाहिजे हा महत्त्वूर्ण संदेश झुंड देतो. गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही, खरी गुणवत्ता ही कष्टकरी, कामकरी, शेतकरी, मजूर, उपेक्षित, वंचित वर्गाकडे आहे, परंतु त्यांच्याकडे संधी आणि साधनांचा अभाव आहे. त्यांना संधी मिळाली तर ते जगज्जेते होतील हा संदेश झुंड देतो.

चोरीचे समर्थन होणार नाही. परंतु एखादा व्यक्ती चोरी का करतो? त्याच्या जगण्याच्या सर्व वाटा बंद केल्या, तर एक तर तो आत्महत्या करेल किंवा चोरी करेल? चोरी फक्त गरीबच करतात असे नाही, अनेक उद्योजक, मंत्री कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करतात ही चोरी नाही काय? जन्मतः कोणीही चोर नसतो. जन्मतः कोणीही गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला तसे बनविते. याबाबतचे विजय बोराडे (अमिताभ बच्चन) यांचे न्यायालयातील युक्तीवादाचे विवेचन महत्त्वपूर्ण आहे.

विजय बोराडे हा अत्यंत दयाळू, प्रेमळ, तळमळीचा सद्ग्रस्थ झोपडपट्टीतील व्यसनाधीन भरकटलेल्या मुलांच्या जीवनाला दिशा देतो. त्यांना स्वखर्चाने फुटबॉल देवून त्यांना खेळाच्या नादी लावून त्यांना व्यसनापासून दूर करतो. त्यांच्यात फुटबॉलबदल गोडी निर्माण करतो. झोपडट्टीतील मुलांना उत्तम ग्राउंड नसते, त्यांना प्रॉपर डाएट, ड्रेस, स्पोर्टशूज नसतो, तरी ते कॉलेजमधील कसलेल्या टीमबरोबर झुंज देतात आणि विजय खेचून आणतात. ही झुंड नाही तर टीम आहे हे बच्चन यांचे उद्गार महत्वपूर्ण आहेत. "दगड मारणाऱ्या हातात जर चेंडू दिला तर विश्वकप जिंकतील आणि पोलिसांना चुकविण्यासाठी वेगाने पळणारांना संधी दिली तर ऑलिम्पिक जिंकतील" हे झुंडमधील उद्गार व्यवस्थेला मोठा रपाटा आहे.

आपण स्त्रीपुरूष समानतेच्या गप्पा मारत असतो, पण आजही मुलींच्या स्वतंत्र शाळा, मुलींचे स्वतंत्र वर्ग. मुलींना मुलांबरोबर खेळायला पाठवायचे नाही, ही मानसिकताच मुलींना दुबळे बनविते आणि नव्या पिढीत विकृती निर्माण करते, परंतु झुंडमधील फुटबॉल टीममध्ये मुलांबरोबर मुलीही आहेत. मुलगा-मुलगी असा भेद बाळगू नये. मुलाप्रमाणे मुलगीही सक्षम असते, हा संदेश झुंड देतो, यासाठी नागराज यांचे कौतुक केले पाहिजे.

झोपडट्टीतील मुलगा विचारतो "इंटरनॅशनल म्हणजे काय? परदेश - देश, नॅशनल म्हणजे काय?. भारत म्हणजे काय?" प्रखर राष्ट्रवादाच्या गप्पा मारल्या जात असताना पोटासाठी झगडणाऱ्या लोकांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय याची कल्पनाही नाही. गरिबीचा प्रश्न न सोडविता राष्ट्रवादाच्या गप्पा मारणे योग्य आहे का? हा प्रश्न झुंड व्यवस्थेला विचारतो. हा प्रश्न जगभरातील सर्व अविकसित-विकसनशील राष्ट्राला लागू आहे.

जे या देशाचे मूलनिवासी आहेत, परंतु त्यांना व्यवस्थेने सर्व हक्क अधिकारापासून वंचित ठेवले आहे. विशेषतः आदिवासी वर्गाला शिक्षण, आरोग्य सुविधा यापासून वंचित ठेवले आहे. त्यांना रहिवासी दाखला मिळविण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो, हे वास्तव झुंडमध्ये मांडलेले आहे. खेळासाठी विदेशात जाणाऱ्या आदिवासी मुलीला दाखला मिळविण्यासाठी तिच्या वडीलाला किती पायपीट आणि संघर्ष करावा लागतोय हे झुंड प्रकर्षाने दाखवतो. हा प्रसंग म्हणजे शासनाच्या एनआरसी, सीएए, एनपीआर धोरणाला मोठी चपराक आहे.

अमिताभ बच्चन फिल्मी दुनियेतील महानायक आहे, याबाबत दुमत नाही, परंतु इतर कलाकारांनी केलेल्या भूमिका अप्रतिम आहेत. अमिताभ यांनी आयुष्यात अनेक चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका केल्या, परंतु आयुष्याच्या सायंकाळी झुंडमधिल अमिताभ यांची भूमिका त्यांची प्रतिमा अधिक उंच करणारी आहे. अमिताभ हे उत्तम अभिनेते आहेत, पण त्यांची विनयशीलता, प्रगल्भता पदोपदी जाणवते.

सेवानिवृत्तीनंतर देखील आपण सतत उत्तम काम करत राहिले पाहिजे. कर्तृत्ववान लोक कधीही सेवानिवृत्त होत नसतात, हा संदेश झुंड देतो. अमिताभ रुपेरी पडद्यावरील महानायक आहेत, परंतु खरे महानायक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्यापुढे अमिताभ नतमस्तक होतात. झुंडमधील हा प्रसंग अमिताभ यांची उंची वाढविणारा आहे. आंबेडकर जयंतीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने होते, हा महाराष्ट्राचा वास्तविक सांस्कृतिक वारसा झुंडमध्ये मांडला आहे.

झुंड गुन्हेगाराच्या व्यथा मांडतो, पण गुन्हेगारीचे समर्थन करत नाही. बोराडे सर अंकुशला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला देतात. झोपपट्टीत प्रचंड गुणवत्ता आहे, तेथे अनेक बोराडे सरांची गरज आहे. खेळाडूंना घेवून विमान ज्यावेळेस हवेत उड्डाण करते तेंव्हा विमानतळाच्या व शेजारील झोपडट्टीच्यामध्ये असणाऱ्या भिंतीवरील सूचना ठळकपणे दाखवलेली आहे की strictly prohibited to cross this wall. नागराज मात्र ही आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषमतेची भिंत सतत तोडत राहतो. प्राच्यविद्याविद शरद पाटील यांनी अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र मांडले. कलेच्या क्षेत्रात ते नागराज मांडत आहेत, ही बाब अभिमानास्पद आहे.

ज्या नागराज मंजुळे यांना बालपणी अमिताभ बच्चन यांचा दीवार पिक्चर पाहण्यासाठी तिकिटाला पैसे नव्हते, म्हणून त्यांनी खिडकीतून चोरून चित्रपट पाहिला. त्याच नागराज मंजुळे यांनी अमिताभ बच्चन यांना सोबत घेऊन झुंड चित्रपट काढला. महत्वाकांक्षा आणि कष्टाच्या बळावर सामान्य व्यक्ती देखील असामान्य होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. संकटं आणि संघर्ष माणसाला बलवान बनवतात, हा संदेश झुंड आणि नागराज देतात!

Tags:    

Similar News