सार्वजनिक ठिकाणी धर्म - एक हलकटपणा !!
अझानसाठी application चा वापर शक्य आहे का? वाचा डाॅ. विनय काटे यांचा लेख;
भाग -१: लाऊडस्पीकर वरून अझान
मशिदीवर भोंगा लावून दिली जाणारी अझान हा एक तद्दन टुकार प्रकार आहे. अझान म्हणजे नमाजसाठी लोकांना पाठवलेलं बोलावणं. जुन्या काळात जेव्हा घड्याळ नव्हती तेव्हा मुल्ला लोक प्रार्थनेच्या वेळेला मशिदीच्या वर उभा राहून तोंडी अझान देऊन सगळ्यांना बोलावत. पण आता प्रत्येक माणसाला घड्याळ उपलब्ध आहे, नमाजच्या वेळा माहित आहेत, मग आता मशिदीवर भोंगा कशासाठी? लाऊडस्पीकरचा शोध काय मोहम्मद पैगंबरांच्या जन्माआधी लागलाय का? लाऊडस्पीकर नव्हते त्या काळात काय ईस्लाम बुडला होता का? का लोक त्या काळात नमाज पढत नव्हते?
जवळपास 10 वर्षांपूर्वी माझ्या एका हिंदू मित्राच्या फोन मध्ये अझानचे App होते. त्याने असेच डाउनलोड केले होते काय माहित नसताना, आणि पहाटे 3-4 वाजता अंधारात फोनमधून अझान आल्यावर भीतीने फाटली होती बिचाऱ्याची. त्याला जाम हसलो होतो मी तेव्हा! आता तर ढिगाने तशी app आहेत. ज्याला पढायचा आहे नमाज तो पढेल की App ने आठवण करून दिल्यावर! पण नाही! बळजबरी लोकांचे कान किटवल्याशिवाय धर्माला, धर्मगुरूंना किंमत कशी राहणार! मानवी शरीरात कान कुणालाही काहीही झाले तरी बंद करता येत नाही, अगदी बोळे घातले तरी कवटीच्या हाडामुळे ऐकू येतेच! म्हणून करा मग कानावाटे ईश्वरी हल्ला!!
शेकडो वर्षांपूर्वी संत कबीर म्हणून गेलेत -
कंकर पत्थर जोड के,
मस्जिद लयी बनाय,
ता चढ मुल्ला बाग दे,
क्या बहरा भयो खुदाय!
(अर्थ: दगडवाळू जोडून मशीद बनवलीय आणि तिच्यावर चढून मुल्ला अझान देतोय. खुदा काय बहिरा झालाय का?)
माझे एक मानलेले आजोबा दस्तगीर अण्णा सांगायचे,"चिंटीके कदमों की आहट भी खुदा सून लेता हैं।" मग त्याच खुदाला बोलवायला हे लाऊडस्पीकरचं सोंग कशाला? नमाज पढताना तर कुणी बोलत नाही, मनातल्या मनात प्रार्थना म्हणतात सगळे, मग अझानलाच का भोंगा पाहिजे? ह्या अवेळी वाजणाऱ्या कर्कश्श भोंग्याने लोकांना त्रास होतो, झोप मोडतेय याची काळजी अल्लाहचे बंदे करत नाहीत का कधी? पैगंबरानी एके ठिकाणी सांगितलंय "हुतात्माच्या रक्तापेक्षा विद्वानांची शाई जास्त पवित्र आहे". एवढा छान विचार मांडणाऱ्या पैगंबरांचे अनुयायी एवढे का कट्टर झालेत मग?
जर मशिदीवर भोंगा लावणे हे शास्त्रीय मार्गाने पुढे जाणे असेल, तर मला वाटते मुल्ला लोकांनी अजून थोडे पुढे जावे. आपल्या मशिदीच्या भागात राहणाऱ्या लोकांचा फेसबुक किंवा Whatsapp वर group बनवून सगळ्यांना online अझान पाठवून द्यावी! अगदी थेट संभाषण ज्याला बोलवायचे आहे त्याच्याशी! आणि जर वारंवार बोलावून तो माणूस मशिदीत नाही आला तर त्याला काफिर वगैरे घोषित करायचा फतवा काढावा! हसताय काय?? तुम्हाला SMS वर तलाक चालत असेल तर Whatsapp, Facebook वर अझान चालायलाच पाहिजे, हो ना???
- डॉ. विनय काटे
(नम्र विनंती - वरील लेख वाचून मी फक्त मुस्लिमांच्या बाबतीतच लिहितो असे समजून बाकीच्या धर्मियांनी वाईट वाटून घेऊ नये! मी तुमच्याही धर्माबद्दल असच छान छान लिहिणार आहे या मालिकेत. लोभ असावा!)
१८ एप्रिल २०१७ ची पोस्ट
--------------------------------
ताजा कलम - खास इंजिनवाल्यांसाठी
मशिदीच्या भोंग्याला मंदिराच्या भोंग्याने उत्तर देणे हा दुप्पट मूर्खपणा आहे!
#ReligionInPublic