राजकीय स्वार्थ असेल तर तो चुलीत घाला

महाराष्ट्राच्या,मराठ्यांच्या आणि श्री शिवछत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तुमचा राजकीय स्वार्थ असेल तर तो चुलीत घाला. आम्ही प्रामाणिकपणे आमची मते मांडतच राहणार. इतिहासाशी प्रामाणिक राहून मत मांडणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी करणारच : सज्जच सत्यम !!! इंद्रजित सावंत;

Update: 2023-06-04 00:30 GMT

श्री शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला 1974 मध्ये 300 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्रिशत संवत्सरी राज्याभिषेक महोत्सव महाराष्ट्र राज्याने साजरा केला होता. हा महोत्सव सन १९७४ च्या जून महिन्यामध्ये दुर्ग रायगडावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला गेला. या महोत्सवासाठी म्हणून तत्कालीन पंतप्रधान माननीय इंदिराजी गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या होत्या. शिवमुद्रा व लोकराज्य म्हणून अंक काढला गेला त्या अंकामध्ये छापल्या गेलेल्या आहेत. (लोकराज्य हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत मुखपत्र आहे). सन 1974 ला जर 300 वा राज्याभिषेक दिन आपल्या शहाण्या सुरत्या माणसांनी साजरा केला असेल तर 350 वा शिवराज्याभिषेक दिन आपण 2024 लाच साजरा करणे हे उचित होईल असे माझे स्पष्ट मत आहे. काही लोक अंकगणिताचा खेळ करून 2023 ला शिवराज्याभिषेक 350 वर्षाचा झाला असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण शिवाजी महाराजांचे 300 वे जन्मोत्सव, राज्याभिषेक आणि पुण्यस्मरण दिन साजरे केलेले आहेत. जर असे 300 वे दिन आपण 1927, 1974, 1980 ला साजरे केले असतील तर शिवाजी महाराजांचा 2023 ला 350 वा राज्याभिषेक कस काय म्हणू शकतो? असा माझ्या मनात प्रश्न आहे! एवढेच नाही तर शिवाजी महाराजांचा त्रिशत संवस्तरी जन्मोत्सव 1927 ला साजरा करणारे इतिहास संशोधक इतिहासाचे अभ्यासक होते तर 1974 ला शिवराज्याभिषेकचा त्रिशत संवत्सरी राज्याभिषेक महोत्सव साजरा करणारे हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम केलेले आणि साहित्य व इतिहासाची जाण असणारे यशवंतरावजी चव्हाण होते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वसंतरावजी नाईक यांच्यासारखे अभ्यासू व्यक्ती त्यावेळेला महाराष्ट्र राज्यावर काम करत होते. अशा व्यक्तींकडून 300 वा शिवराज्याभिषेकदिन जर सन 1974 ला साजरा होत असेल तर आज 350 वा शिवराज्याभिषेक हा 2023 ला साजरा करून आजचे महाराष्ट्र शासन काय सिद्ध करत आहे. याचाही विचार केला पाहिजे.

मी ज्यावेळी शिवराज्याभिषेक दिन हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत नव्हता, त्यावेळी पासून या चळवळीत आहे. रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक महोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी जी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती स्थापन झाली, त्या शिवराज्याभिषेक समितीचा मी संस्थापक अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर 2014 पर्यंत सलग मी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सन 2008-9 मध्ये दुर्ग रायगडावर असणाऱ्या मेघडंबरीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची मोहीम सुद्धा मी अध्यक्ष असतानाच यशस्वीपणे पार पाडली गेली होती. त्याचबरोबर 2006 पासून कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सुरू असणारा शिवराज्याभिषेक दिन महोत्सव ही सुरू करण्यामध्ये माझा थोडाफार वाटा आहे. या वेळेपासून म्हणजे जवळजवळ दोन दशके या शिवराज्याभिषेक चळवळीशी मी निगडित आहे. जेव्हापासून आम्ही ही मोहीम सुरू केली त्यावेळी पासून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाची पत्रक काढा, बातम्या काढा या सगळ्या बातम्या या शिवराज्याभिषेक म्हणजे 2006 ला 333 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. त्यानंतर 2022 पर्यत सलग म्हणजे 2022 ला 348 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला तर 2023 ला कितवा शिवराज्याभिषेक दिन आपण साजरा केला पाहिजे ? याची उत्तरे या विषयावर 350 वा राज्याभिषेक 2023 ला साजरा करणाऱ्यांनी दिली पाहिजेत.




 


या पोस्टसोबत त्यावेळच्या लोकराज्याच्या अंकाचे मुखपृष्ठ त्यावर स्पष्ट त्रिशत संवत्सरी शिवराज्याभिषेकाचा उल्लेख आहे. त्याचबरोबर यशवंतरावजी चव्हाण तत्कालीन भारताचे अर्थमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या उपस्थितीत रायगड किल्ल्यावरील होळीच्या माळाच्या ठिकाणी असणाऱ्या पुतळ्याचा उद्घाटन समारंभ झाला होता त्याची छायाचित्रे जोडली आहेत.

इंद्रजित सावंत

कोल्हापूर 

Tags:    

Similar News